Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

नगर-औरंगाबाद राज्यमार्गाच्या चौपदरीकरणातील प्रवरासंगम येथील गोदावरी नदीवरील मोठय़ा पुलाची उभारणी पूर्ण झाली आहे. आचारसंहितेमुळे उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम लांबण्याची शक्यता असली, तरी रहदारीला हा पूल खुला करण्यात आला आहे.

दुरावलेली मने सांधण्यासाठी उद्या बैठक
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

विविध कारणांनी दुरावलेली पदाधिकाऱ्यांची मने सांधल्याशिवाय निवडणुकीत काही खरे नाही, हे ओळखून भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी (दि. २७) जिल्ह्य़ातील सर्व आघाडय़ांचे पदाधिकारी, तसेच प्रमुख नेते, कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक आयोजित केली आहे. उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांच्या बाजूने स्पष्ट कल दर्शवणाऱ्या व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचीच उमेदवारी पक्की होत आहे हे लक्षात येताच त्यांना समर्थन देणाऱ्या जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनीच या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.

थोरातांवरील टीका आदिकांनी रोखली
श्रीरामपूर, २५ मार्च/प्रतिनिधी

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक देशमुख यांनी कृषिमंत्री थोरातांवर टीका केल्यानंतर आदिकांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. मात्र, शिर्डीकरिता निरीक्षक नेमण्याचे सूतोवाच केले. नंतर घरचा मामला सांगत त्यांनी पुन्हा माघारही घेतली! राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे निवडणूक समितीचे प्रमुख झाल्याबद्दल आदिक यांचा काँग्रेस भवनमध्ये झालेला स्वागत समारंभ माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थितीने गाजला. आता दोघे एकाच पक्षात असल्याने ३२ वर्षांनंतर मुरकुटे काँग्रेस भवनमध्ये आले. दोघांनी एकमेकांना पेढा भरविला.

सोबत
‘सोबत’ हा सर्वानाच येणारा अनुभव. तसं सारं आयुष्यच या ना त्या सोबतीच्या संगतीत जात असल्यामुळे आणि त्यामुळे आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्यामुळे सोबतीचं अनन्यसाधारण महत्त्व कोण नाकारेल? खरं तर कालचक्रात माणूस स्वतच्या अस्तित्वासारखं सोबतीचंही कुणाच्या अस्तित्व धरत असतो गृहित. तरीही जीवनात सदैव घडणाऱ्या नाटय़मय आणि अकल्पित योगायोगात ‘आज अचानक गाठ पडे’ या रूपात कुणाची अवचित सोबत मिळाली तर? किंवा ‘जागुनी ज्याची वाट पाहिली’ त्या स्वप्नागत सुखाच्या सोबतीलाच मुकावे लागले तर?

कार्यवाहीची माहिती सचिव आज देणार
मंत्री थोरात-हजारे चर्चा

पारनेर, २५ मार्च/वार्ताहर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वर्षभरात केलेल्या विविध मागण्यांबाबत सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी संबंधित खात्याचे सचिव उद्या (गुरुवारी) राळेगणसिद्धीला येणार आहेत. मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २७) राज्यात आंदोलन सुरू करण्याचा इशारा हजारे यांनी दिला. या पाश्र्वभूमीवर कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज रात्री राळेगणसिद्धीत हजारे यांच्याशी चर्चा केली. हजारे यांचे सध्या मौन आंदोलन सुरू आहे. त्यांनी थोरात यांच्याशी लिखित स्वरूपात संवाद साधला.

जिल्हा परिषदेचे साडेसहा कोटींचे अंतरिम अंदाजपत्रक मंजूर
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या पुढील वर्षांच्या (सन २००९-१०) ६ कोटी ४६ लाख रुपयांच्या अनिवार्य तरतुदी असलेल्या अंतरिम अंदाजपत्रकास मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी आज मंजुरी दिली. सन २००८-०९च्या १२ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकासही या वेळी मान्यता देण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव करपे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय शहा या प्रसंगी उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------------

नेत्यांची बलस्थाने आठवलेंच्या पथ्यावर!
एकीकडे कोल्हे यांची राष्ट्रवादीची मजबूत फळी, विखे-परजणे गटाची ताकद, दुसरीकडे शिवसेनेतील अंतर्गत वाद, भाजपची नगण्य स्थिती या राजकीय पाश्र्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवणुकीत काँग्रेस आघाडी पुरस्कृत रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले आणि शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे या दोन प्रमुख उमेदवारांमधील लढत होत आहे. आमदार अशोक काळे यांची भूमिका अजूनही संदिग्ध आहे. ते काय करतात, याकडेही सर्वाचे लक्ष आहे. निवडणूक लोकसभेची असली, तरी त्याला संदर्भ आगामी विधानसभा निवडणुकीचे आहेत. तेच प्रमाण मानून प्रमुख राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

सहानुभूती आणि प्रतिष्ठेची लढत!
राजकीय पक्ष दुय्यम मानून व्यक्तिकेंद्रीत झालेल्या श्रीगोंद्याच्या राजकारणात लोकसभेची निवडणूक काय व कोणते रंग भरते, त्याची मतदारांत उत्सुकता आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या वनमंत्री बबनराव पाचपुते यांचीच प्रतिष्ठा श्रीगोंद्याच्या राजकारणात आता पणाला लागणार आहे. दिलीप गांधी यांच्या नावाभोवती असलेले सहानुभूतीचे वलय भेदतानाच तालुक्यातील विरोधकांची कर्डिलेंपेक्षा पाचपुतेंना जास्त धास्ती पडली आहे. भाजपपेक्षा गांधींना त्यांच्या कामातून ओळखणाऱ्यांची संख्या येथे मोठी असल्याने कर्डिलेंना येथे अनपेक्षित धक्का बसणार काय, याचीही चर्चा रंगू लागली आहे.
गेली ३० वर्षे तालुक्यात पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण सुरू आहे.

खासदार विखेंच्या भूमिकेकडे लक्ष!
खासदार बाळासाहेब विखे सातवेळा लोकसभेवर निवडून गेले. सन ९८ मध्ये नगर दक्षिणेतून शिवसेनेच्या तिकिटावर लढविलेली निवडणूक अपवाद वगळता त्यांनी अन्य निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावर लढवून जिंकल्या. केंद्रात अर्थराज्यमंत्री व अवजड उद्योगमंत्रिपदही त्यांनी भूषविले. जिल्ह्य़ाच्या राजकारणात त्यांचा नेहमीच प्रभाव राहिला. परंतु आता शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाला.

(अब!) हम साथ साथ है!
श्रीगोंदे, २५ मार्च/वार्ताहर

आपसांतील राजकीय वैर विसरून वनमंत्री बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे व बाबासाहेब भोस यांनी आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचार नियोजनासाठी श्रीगोंदे कारखान्यावर एकत्रित बैठक घेतली. एकमेकांवर कायमच चिखलफेक, कुरघोडी करणाऱ्या नेत्यांच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे का होईना, या ‘तुझ्या गळा..’मुळे राजकारणासाठी एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र कपाळावर हात मारून घेतला!

‘नेवासे विधानसभेवर माझाच हक्क’
नेवासे, २५ मार्च/वार्ताहर

राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमातच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकरराव गडाख यांनी आक्रमक इशारा देत नेत्यांबरोबरच पक्षातील इच्छुकांना चाप दिला. याचवेळी विधानसभेच्या स्वतंत्र नेवासे मतदारसंघावर केवळ आपलाच हक्क असल्याचे ठसविण्यातही ते यशस्वी झाले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक, प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील व पालकमंत्री दिलीप वळसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडाख पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीत काल प्रवेश केला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत नेवासे तालुका आपल्याच पाठीशी असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. या प्रवेश सोहळ्याची वकिली प्रदेशाध्यक्ष पाटील स्वत शरद पवारांकडे करणार असून, विधानसभेसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी आता गडाखांना मिळणे अवघड नाही, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. या कार्यक्रमात आमदार गडाख यांनी विधानसभेचे इच्छूक उमेदवार भानुदास मुरकुटे यांचा ‘नवे स्नेही’ म्हणून उल्लेख करीत जवळ बसून घेतले. तेही शंकररावांचा इशारा ऐकत होते. पुढे त्यांची भूमिका काय असेल, याचीही चर्चा आज रंगत होती. अजित पवारांच्या सलग दुसऱ्या कार्यक्रमातील गैरहजेरीचे विरोधक व पक्षांतर्गत विरोधकही भांडवल करणार हेही जाणवले. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये अपेक्षेप्रमाणे खासदार तुकाराम गडाख गैरहजर होते. आमदार गडाखांना विरोध हा राजकारणाचा पाया असल्याने व लोकसभेला राष्ट्रवादीने डावलल्यामुळे विधानसभेच्या रिंगणात खासदार गडाखांच्या भूमिकेला महत्त्व येणार, हे निश्चित!

पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार - आगरकर
कर्जत, २५ मार्च/वार्ताहर

आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून नाराज नाही. कोणाला उमेदवारी दिली हे न पाहता मी पक्षाचेच काम करणार आहे, असे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी आगरकर यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, पक्षाने माजी खासदार दिलीप गांधी यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. यामुळे आगरकर कोणती भूमिका घेतात याकडे भाजप वर्तुळाचे लक्ष लागले होते. येथील प्रसाद ढोकरीकर यांच्या निवासस्थानी आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, भानुदास बेरड, अनिल मोहिते, अनिल शेवते, स्वप्नील देसाई, सचिन सोनमाळी, विनोद दळवी, महेश जेवरे, बंडा मेहेत्रे, सुरेश खिस्ती, नाथा गोरे, नारायण दळवी व विठ्ठल सोनमाळी आदी उपस्थित होते.

कर्डिले यांचा पारनेर तालुक्यात प्रचारदौरा
निघोज, २५ मार्च/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले यांनी पारनेर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन प्रमुख नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, जि. प.चे उपाध्यक्ष सुजित झावरे, मधुकर उचाळे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब कवाद, खासदार विखे यांचे समर्थक मच्छिंद्र वराळ, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संदीप वराळ, सरपंच गीताराम कवाद व मुस्लिम कार्यकर्त्यांशी त्यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. श्री. कर्डिले यांनी मळगंगा देवीचे दर्शन घेतले. यावेळी पारनेर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब लामखडे, निघोज ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात, निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेचे अध्यक्ष रामदास वरखडे, उपाध्यक्ष अमृता रसाळ, सहकारमहर्षी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भिमाशेठ घुले, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब कोल्हे, माजी उपसरपंच उमेश सोनवणे उपस्थित होते. कर्डिले यांच्या प्रचार नियोजनासाठी रविवारी (दि. २९) बैठक बोलविण्यात आल्याची माहिती जि. प. उपाध्यक्ष झावरे यांनी दिली. दि. २९ला सकाळी ८ वाजता भाळवणी, १० वाजता टाकळी ढोकेश्वर, १२ वाजता कान्हूर पठार, २ वाजता पारनेर, ४ वाजता आळकुटी, ६ वाजता निघोज, ८ वाजता वाडेगव्हाण, तसेच १० वाजता सुपे येथे बैठकांचे आयोजन केले आहे.

मतदार ओळखपत्र केंद्रांवर अर्जाचा तुटवडा, गैरसोय
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

मतदारयाद्यांमधील दुरुस्ती, नवीन मतदारनोंदणी, फोटो ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शहरातील विविध केंद्रांत नियोजनाअभावी नागरिक व कर्मचाऱ्यांची कुचंबणा होते आहे. नवीन नोंदणी, स्थलांतर, नावातील बदलासाठी आवश्यक असणारे अनुक्रमे ६, ७, ८ क्रमांकाचे अर्ज पुरेसे उपलब्ध नाहीत. अर्ज कमी पडले की, कर्मचारी स्वखर्चाने झेरॉक्स आणतात. या कामासाठी महापालिकेचे १६८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना भत्ता सोडाच, पण पिण्याचे पाणीही मिळत नाही. मागच्या कामाचे मानधनही अद्याप मिळाले नाही. त्यामुळे ‘बीएलओ’ अधिकाऱ्यांत नाराजी आहे.

-----------------------------------------------------------------
इचरजबाई मुनोत यांचे अल्प आजाराने निधन
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत यांची पत्नी इचरजबाई यांचे आज सायंकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे पती, मुलगा किशोर, मुलगी शोभा कटारिया, नातू, सून असा परिवार आहे.इचरजबाई यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. उद्या (गुरुवारी) सकाळी १० वाजता त्यांची अंत्ययात्रा केशर गुलाब कम्पाऊंड (माळीवाडा बसस्थानकाशेजारी) येथून निघणार आहे. इचरजबाई अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.

कावडीधारकांचे गंगाजल जमा करून घेणार - मोरे
राहाता, २५ मार्च/वार्ताहर

श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींच्या मंगलस्नानासाठी कावडीधारकांनी आणलेले गंगाजल साईमंदिराच्या बाहेर प्रतीकात्मक साई अभिषेक मूर्ती बसवून त्या ठिकाणी जमा करून घेणार असल्याची माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी दिली.मोरे म्हणाले की, श्रीसाईबाबा संस्थानतर्फे २ ते ४ एप्रिल या कालावधीत श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींना कावडीधारकांकडून व साईभक्तांकडून गंगाजलाने स्नान घालण्यात येते. काही साईभक्त लांबूनच प्लॅस्टिकच्या बाटलीतून श्रींच्या मूर्तीवर गंगाजल फेकतात. त्यामुळे मूर्तीला हानी पोहचण्याचा धोका संभावतो, तसेच मंदिरातही पाणी साचते. याबाबत झालेल्या बैठकीत ३ एप्रिल रोजी उत्सवाच्या मुख्य दिवशी कावडीधारकांचे गंगाजल समाधी मंदिराबाहेर साई अभिषेक मूर्ती बसवून तेथे मोठय़ा पातेल्यात जमा करून नंतर हे गंगाजल मंदिरातील विधीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, उपकार्यकारी अधिकारी डॉ. यशवंतराव माने, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी, माजी विश्वस्त रावसाहेब गोंदकर, माजी विश्वस्त शांताराम मिराणे, दिलीप संकलेचा, कमलाकर कोते, विजय जगताप, प्रमोद गोंदकर उपस्थित होते.

बाबासाहेब कुटे यांचा अकोले येथे सत्कार
अकोले, २५ मार्च/वार्ताहर

समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक कार्यात योगदान द्यावे, तसेच समाजातील विकृती दूर करून समाज एकसंध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन समाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कुटे यांनी केले.राज्य नाभिक महामंडळाच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल कुटे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सल्लागार जनार्दन राऊत होते. संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, तर अगस्ती देवस्थानतर्फे ट्रस्टचे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांच्या हस्ते कुटे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सचिन शिंदे, शहराध्यक्ष दत्तात्रेय शेलार, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, विलास शिंदे, रामदास सोनवणे, कैलास शिंदे, गणेश कानवडे, मंगेश शिंदे, केशव कोल्हाळ, किरण चौधरी, गोरक्ष ओव्हाळ आदींची भाषणे झाली. रमेश वाघ यांनी सूत्रसंचालन केले. योगेश भालेराव यांनी आभार मानले.

‘श्रीज्ञानेश्वर दर्शन’चा शनिवारी अमृत महोत्सव
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

मराठी संत साहित्य संशोधनाच्या क्षेत्रातील अद्वितीय मानदंड समजल्या जाणाऱ्या ‘श्रीज्ञानेश्वर दर्शन’ या ग्रंथाचा अमृत महोत्सव शनिवारी (दि. २८) नेवाशाला साजरा होणार आहे.हा ग्रंथ सन १९३४मध्ये वाङ्मयोपासक मंडळाने नेवासे येथे भरलेल्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ विचारवंत ल. रा. पांगारकर यांच्या हस्ते प्रकाशित केला होता. त्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शनिवारी दुपारी १ वाजता नेवाशातील ज्ञानेश्वर मंदिराच्या सभामंडपात मठाधिपती शिवाजीमहाराज देशमुख व नगर वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त सुरेश जोशी यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे.

प्रभाग ३७ व ५८मध्ये दूषित, अनियमित पाणीपुरवठा
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

अनियमित व दूषित पाणीपुरवठय़ाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या गणेश कवडे (प्रभाग ३७) व दिलीप सातपुते (प्रभाग ५८) या दोन नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.स्थानिक नागरिकांसमवेत दोघांनीही मनपा आयुक्त कल्याण केळकर यांना आज याबाबतचे निवेदन दिले. कवडे यांच्यासमवेत अमर शिंदे, प्रकाश देवघडे, गणेश कोरडे, किशोर देवकर, तसेच सातपुते यांच्यासमवेत परिसरातील महिला होत्या.दोन्ही भागातील समस्यांमध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन केळकर यांनी दिले. येत्या आठ दिवसांत सुधारणा झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला.

सावेडी क्रीडा संकुलात आज ‘स्वरधारा’ मैफल
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

येथील रसिक ग्रुपच्या वतीने उद्या (गुरुवारी) गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ‘स्वरधारा’ कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिली. ‘गारवा’फेम मिलिंद इंगळे, सारेगम विजेता अभिजित कोसंबी, ‘होममिनीस्टर’फेम आदेश बांदेकर हे कलाकार या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ आहे.उद्या संध्याकाळी ६ वाजता सावेडीतील क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होईल. ‘सारेगम’फेम अनघा ढोमसे, ज्ञानेश्वर मेश्राम, नेहा कारदरे, अमृता गोखले, सुजित सोमणे, इंडियन आयडॉल पाराशर जोशी यांची सुरेल गाणी आणि चैत्राली राजे यांचा नृत्याविष्कार यामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढेल. तसेच ‘कॉमेडी एक्स्प्रेस’, ‘घडलंय, बिघडलंय’ या मालिकांतील कलाकार अभिजित चव्हाण, भूषण कडू आणि सुहास परांजपे यांचा सहभागही ‘स्वरधारा’मध्ये आहे.या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना रसिक ग्रुपची असून, स्वप्नील रास्ते व प्रज्ञा रास्ते निवेदन करणार आहेत. संगीत संयोजन ओंकार देवस्कर, सागर साठे यांचे असून, पुणे येथील नुपूर संस्था ध्वनिसंयोजन करणार आहे.

कर्जत ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ६५ टक्के मतदान, आज मतमोजणी
कर्जत, २५ मार्च/वार्ताहर

येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग पाचमधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत आज ६५ टक्के मतदान झाले. मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांमध्येच मोठा उत्साह दिसून येत होता. उद्या (गुरुवारी) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.प्रभाग पाचमधील एका जागेसाठी अनिल भोज, आशिष बोरा, रज्जाक झारेकरी व राजेंद्र माने हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळी ७.३० वाजता येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये दोन मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. दुपापर्यंत अवघे ३० टक्के मतदान झाले होते. मात्र, उत्साही कार्यकर्ते घरोघरी जाऊन रिक्षामधून लोकांना मतदानासाठी आणत होते. मतदान केंद्र क्रमांक एकमध्ये ४९७ व दुसऱ्या केंद्रामध्ये ४७१ असे एकूण ९६९जणांनी मतदान केले.

पक्ष्यांचीही तहान भागवा..
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

उन्हाळ्यात फार तहान लागते ना? पक्ष्यांनाही लागते. पण तहान भागविण्यासाठी तुमची व्यवस्था आहे, त्यांची नाही. तीच करावी असे आवाहन निसर्गमित्र मंडळाने केले आहे.त्यासाठी फार काही करावे लागणार नाही. घराच्या, बंगल्याच्या बाल्कनीत, गच्चीत, परसबागेत खापराच्या पसरट भांडय़ात किंवा एखाद्या लहानशा गाडग्यात पाणी भरून ठेवले, तरी पुरेसे आहे. हे पाणी सावलीत राहील इतकी काळजी मात्र घ्यायची.मंडळाचे पदाधिकारी पक्षिमित्र प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, बाळासाहेब कुलकर्णी यांनी सांगितले की, येथे पाणी आहे हे पक्ष्यांना कळणार नाही म्हणून दुसऱ्या एका पसरट भांडय़ात धान्याचे चार दाणे, भाताची शिते किंवा उष्टे, खरकटे असे काहीतरी टाकल्यास पक्षी त्याकडे आकर्षित होतील.फक्त एकच दिवस किंवा कदाचित काही तासच प्रतीक्षा करावी लागेल. नंतर मात्र ओळखीचे व ओळख नसलेलेही अनेक पक्षी भगभगत्या उन्हातून येऊन या मेजवानीचा आस्वाद घेतील व तृप्त होतील. त्यांच्या तृप्तीसाठी हा अनुभव घेऊन पहाच, असे आवाहन डॉ. कुऱ्हाडे व कुलकर्णी यांनी केले आहे.

राहुरी बार असोसिएशनच्या आंदोलनास संघटनांचा पाठिंबा
देवळाली प्रवरा, २५ मार्च/वार्ताहर

राहुरीचे न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) स. रं. ताठे यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ राहुरी तालुका बार असोसिएशनने सुरू केलेल्या बहिष्कार आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तोडगा निघाला नाही. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज होऊ शकले नाही.राहुरी तालुका बार असोसिएशनने सोमवारपासून न्यायाधीश ताठे यांच्यासमोरील कामकाज बंद ठेवून बहिष्कार आंदोलन सुरू केले. दरम्यान, आंदोलन सुरू झाल्यानंतर ताठे काही दिवसांच्या रजेवर गेले आहेत. नेवासे बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. टेमक यांनी आंदोलनास पाठिंब्याचे पत्र पाठवून आज बंद पाळला. शेवगाव बार असोसिएशनसह श्रीरामपूर तालुका बार असोसिएशनने या बंदला जाहीर पाठिंबा दिला. श्रीरामपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. वल्टे यांनी पाठिंब्याचे पत्र पाठविले.बंद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे गुरुवार दि. २६ मार्च रोजी जिल्हा न्यायाधीश पाटील राहुरी न्यायालयास भेट देणार असल्याचे समजते.

अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त १५१जणांचे रक्तदान
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

माजी नगराध्यक्ष अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १५१जणांनी रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढी व मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या रक्तपेढीस या बाटल्या देण्यात आल्या.इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत पाठक यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मर्चंट बँकेचे अध्यक्ष आनंदराम मुनोत, माजी महापौर संदीप कोतकर, नंदलाल मनियार, गुलशन जग्गी, बाळासाहेब गांधी, डॉ. नीलेश शेळके, डॉ. विजय भंडारी आदी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त जगताप यांचे विविध संस्था, संघटना, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी अभीष्टचिंतन केले.