Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दुरावलेली मने सांधण्यासाठी उद्या बैठक
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

विविध कारणांनी दुरावलेली पदाधिकाऱ्यांची मने सांधल्याशिवाय निवडणुकीत काही खरे नाही, हे ओळखून भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी (दि. २७) जिल्ह्य़ातील सर्व आघाडय़ांचे पदाधिकारी,

 

तसेच प्रमुख नेते, कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक आयोजित केली आहे.
उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांच्या बाजूने स्पष्ट कल दर्शवणाऱ्या व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचीच उमेदवारी पक्की होत आहे हे लक्षात येताच त्यांना समर्थन देणाऱ्या जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनीच या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. ‘व्यक्ती नाही तर पक्ष महत्त्वाचा’, हे सूत्र समोर ठेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नगर दिग्वीजयासाठी कार्यान्वित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
गांधी यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांचे राजकीय विरोधक असलेले दुसरे इच्छुक उमेदवार आगरकर यांनी लगेचच कर्जत तालुक्याचा दौरा केला. तेथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ‘उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण उपोषण, आंदोलन करणार नाही’ असे म्हणत अप्रत्यक्षपणे गांधी यांच्यावर संधान साधल्याने पक्षातील अनेकांबरोबरच ढाकणे यांच्याही भुवया उंचावल्या. ‘असे चालणार नाही’, हे लक्षात येताच त्यांनी बैठकीसाठी पुढाकार घेतला. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेनेच प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांने काम करणे अपेक्षित आहे. एकदा उमेदवारी निश्चित झाली त्याबरोबर वाद, मतभेद, दुरावा संपला असेच प्रत्येकाने मानले पाहिजे. आपण स्वत त्या भावनेनेच गांधी यांच्याबरोबर कामाला लागलो असून, इतरांनीही तसेच करावे असे आपले मत असल्याचे ढाकणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
आगरकर यांनीही ‘अडवाणी यांना पंतप्रधान करणे ही आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रचारात सक्रिय राहणार’ असे सांगितले. कर्जतच्या दौऱ्यात पत्रकारांनी ज्या पद्धतीने प्रश्न विचारले, त्याला त्याप्रमाणेच आपण उत्तरे दिली. त्यात कोणालाही ‘टार्गेट’ करण्याचा हेतू नव्हता, असे ते म्हणाले. प्रचारातील सहभागाविषयी आपल्याला अद्यापि काहीच सांगण्यात आलेले नाही. मात्र, बैठक आयोजित केली असल्याचे समजले, असे ते म्हणाले.
दीक्षित मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी ही बैठक होईल. त्यात प्रचाराचे नियोजन, नेत्यांच्या सभा आदी बाबींची चर्चा होणारच आहे. मात्र, सर्वप्रथम नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातील मनोमिलनाचा कार्यक्रम होईल. एकदा सेनेच्या व एकदा भाजपच्या ताब्यात असलेला नगर मतदारसंघ यावेळी पुन्हा काबीज करायचाच असे ‘मिशन’ पदाधिकारी व कार्यकर्त्यांपुढे ठेवण्यात येणार आहे.
विनोद तावडे यांचा ३ एप्रिलला दौरा
उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गरज जाणून घेण्यासाठी रघुनाथ कुलकर्णी व विनोद तावडे हे ३ एप्रिलला मतदारसंघात येणार आहेत. दिलीप गांधी व जिल्ह्य़ातील अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ते घेतील. त्यातच राज्य व केंद्रस्तरावरील नेत्यांच्या सभांच्या तारखा ठरवण्यात येणार आहेत.