Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

थोरातांवरील टीका आदिकांनी रोखली
श्रीरामपूर, २५ मार्च/प्रतिनिधी

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक देशमुख यांनी कृषिमंत्री थोरातांवर टीका केल्यानंतर आदिकांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. मात्र, शिर्डीकरिता निरीक्षक नेमण्याचे सूतोवाच केले. नंतर

 

घरचा मामला सांगत त्यांनी पुन्हा माघारही घेतली!
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे निवडणूक समितीचे प्रमुख झाल्याबद्दल आदिक यांचा काँग्रेस भवनमध्ये झालेला स्वागत समारंभ माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थितीने गाजला. आता दोघे एकाच पक्षात असल्याने ३२ वर्षांनंतर मुरकुटे काँग्रेस भवनमध्ये आले. दोघांनी एकमेकांना पेढा भरविला. राजकारणाची दिशा स्पष्ट केली. मुरकुटेंच्या उपस्थितीने हा स्वगात सोहळा गाजला. सोहळ्यात आदिकांचे गुणगाण करण्यात आले. परंतु देशमुख यांनी कृषिमंत्री थोरात यांच्यावर कडाडून टीका केली. आदिकांना डावलण्याचे काम राज्यातून झाले, तसे जिल्ह्य़ातील दोन घरांनी केले. पाच वषार्ंत थोरात यांनी केवळ नातेवाईकांची टोळी वाढविली. अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्य, नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वतच्या नातेवाईकांसाठी हवे. गोतावळा पोसण्याचे काम ते करीत असल्याची टीका त्यांनी केली.
आदिक यांनी देशमुख यांच्या टीकेचा उल्लेख करताच उबेद शेख यांनी देशमुख हे विखेंवर बोलले नाहीत, असे निदर्शनास आणून दिले. तेव्हा थोरातांनी माझ्यावर टीका केली म्हणून बोललो, असा खुलासा देशमुखांनी केला. आदिक यांनी मात्र सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. काँग्रेसबरोबर आघाडी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिर्डीतून रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवलेंसारखा उमदा उमेदवार दिला आहे. मित्रपक्षांवर टीका करू नका. एकोप्याने लढा, असा सल्ला त्यांनी दिला. मात्र, शिर्डीच्या पाठिंब्याची नगर दक्षिणेत गरज आहे. काँग्रेसवाले सच्चे असतात. परंतु जागे रहावे लागेल. देशमुखांना निरीक्षक नेमण्याचा माझा विचार असल्याचे आदिक म्हणाले. नंतर मात्र ही घरातील चर्चा असून पत्रकारांनी दखल घेऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
मेळाव्यात रामदास धुमाळ यांनी आदिकांमुळे आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवार-आदिक एकत्र आल्याने राजकारणाला कलाटणी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी गोपाळराव गुळवे (नाशिक), भानुदास मुरकुटे, वसंत मनकर, वसंत भुईखेडकर (यवतमाळ), विष्णूपंत पाटील, धनंजय जाधव, जावेद चौधरी, अप्पासाहेब कदम, रवींद्र पगार आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन कामगार नेते बबनराव पवार यांनी केले. मेळाव्यास डॉ. भारत ढोकणे, इंद्रनाथ थोरात, रावसाहेब थोरात, राधाकृष्ण वाळुंज, लता डांगे, डॉ. एकनाथ गोंदकर, संपत नेमाणे आदी उपस्थित होते.