Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सोबत
‘सोबत’ हा सर्वानाच येणारा अनुभव. तसं सारं आयुष्यच या ना त्या सोबतीच्या संगतीत जात असल्यामुळे आणि त्यामुळे आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्यामुळे सोबतीचं अनन्यसाधारण महत्त्व कोण नाकारेल? खरं तर कालचक्रात माणूस स्वतच्या अस्तित्वासारखं सोबतीचंही कुणाच्या अस्तित्व धरत असतो गृहित. तरीही जीवनात सदैव घडणाऱ्या नाटय़मय आणि अकल्पित योगायोगात ‘आज अचानक गाठ पडे’ या रूपात कुणाची अवचित सोबत मिळाली तर? किंवा ‘जागुनी ज्याची वाट पाहिली’ त्या स्वप्नागत सुखाच्या सोबतीलाच मुकावे लागले तर? तर ‘आज रोना पडे तो समझे हसने का मोल क्या है’ अशीच त्या मनाची अवस्था होणार. होय, अशा सोबतीतच सुख दडलं असल्यामुळे त्या सोबतीबरोबर तेही हरवलं तर मन सैरभैर होणारच.
मानवी जीवनात पहिल्या श्वासाबरोबरच लाभलेली सोबत पुढील साऱ्या आयुष्यातच या ना त्या रूपात अवतरत असते. पण वास्तवात ही खरोखरच पहिल्या श्वासाबरोबरच येणारी (खरं तर त्या

 

पूर्वीपासूनही?) ही सुखद आणि आश्वासक सोबत असते परमेश्वराचं प्रतिरूप असणाऱ्या आणि प्रेमस्वरूप आणि वात्सल्यसिंधू या सार्थ प्रतिरूप गौरविलेली आईची. भाग्यशालीच म्हणवितात ज्यांच्या दैवी ही सोबत अपार मायेची आणि होतात पोरकेच त्या छत्राच्या सोबतीविना. आपल्या अद्भुत नातेसंबंधात नात्यांच्या विविध पदरी वीणेशिवाय निर्माणही होत असतात एकसे बढकर एक अशा नात्यांच्या अफलातून सोबती.. नियतीनेच ‘मेड फॉर इच अदर’ अशी एकमेकांसाठीच मुळात संकल्पना केलेली सोबत अपूर्व पती-पत्नींची. इथं धरलं जातं नातं दोघातलं जन्मजन्मांतरीचं. नातं तसं दोघांचं, पण त्यातही पतीसाठी जीवनात आणि मरणातही सोबत करणाऱ्या आणि पतिव्रता हा दीपाशिखेगत गौरव प्राप्त करणाऱ्या पत्नीमुळेच या सोबतीला इथं अलौकित्व प्राप्त झालंय. इथल्या कुटुंबात आपसूक रूजवलेल्या आणि बहुतांश स्नेहबंधात जोपासलेल्या इतरही नात्यातील सोबतीची रूपंही अशी की देवानेही हेवा करावा.
सोबत अशीच एक कुटुंबातील भावा-बहिणीच्या इथं मुद्दाम गौरविलेल्या पवित्र नात्याची. राखी पौर्णिमा आणि भाऊबीज या दोन सणांमुळे या नात्याचे अनोखेपण अधोरेखित होतं. बहिणी विषयीची कर्तव्यनिष्ठा आणि बंधूरायाचं आंतरिक प्रेम यामुळे ही सोबत लक्षणीय ठरते. पिता आणि लाडकं कन्यारत्न यांच्या नात्यातील सोबत असते दुहेरी जाणिवांची. एकीकडे पित्याच्या अतूट नात्याबरोबरच सतत गुंतवून ठेवणारं माहेर आणि दुसरीकडे कन्या सासुराशी जाताना कण्वऋषिगत झालेली पित्याची चिंब अवस्था गदगदलेली. लहरी नियतीच्या साक्षीने श्वास घेणाऱ्या इथल्या नात्यातील सोबतींच्या मेळाव्यात राम-लक्ष्मणाचा किंवा भरताचाही आदर्श गिरवत वाट सोबतीच्या जिव्हाळ्याची होतेही कधी कधी काटेरी भाऊबंदकी कलहात आणि दिसतं घडलेलं अपेक्षित महाभारतही दर्शवित कधी प्रेम, तर कधी द्वेष. अशी ही दुधारी नात्याची सोबत.
कौटुंबिक परिघाच्या आतील नात्यांच्या सोबतीशिवाय सारं जीवनचं व्यापणाऱ्या सोबतीत ‘बालपणीचे सखेसोबती’ नेहमीच दिसतात आठवणींशी झोंबताना. निरागस ठरलेल्या आणि सबकुछ खेल असणाऱ्या बालपणीच्या सोबतीत शेवटी म्हणजे वार्धक्यीही आठवतात त्यावेळचे सवंगडी पेंद्यागत श्रीकृष्णाचे आणि पुढील आयुष्यात वास्तवात येणारी, पण इथं निखळ नाटय़ात गुंफलेली भातुकली. आयुष्याच्या पुढच्या वळणावरील आपसूक भेटणारी सोबत असते.
शाळा-कॉलेजात भेटलेल्या मित्र-मैत्रिणींशी जुळलेली, ऋणानुबंधात पुढे कधी फुललेलीही. आयुष्यात मैत्री तशी स्वाभाविक, पण तरीही ‘मैत्र जीवाचे’ भेटतात भाग्यानेच. निस्वार्थ आणि त्याग या जाणिवावरच पोसलेली ही मैत्री म्हणून असते असाधारण आणि दीपस्तंभागत प्रकाशवाट दाखवणारी अंधारबनात. अशा अलौकिक सोबतीचे धनी म्हणून डोळ्यापुढे येतात श्रीकृष्णाचा बालसखा सुदामा आणि धनंजय परमभक्त आणि सखा द्वारकाधिशाचा. एक सत्यही अधोरेखित होऊन जातं इथं. नश्वरच असणाऱ्या जीवनात या मर्मबंधातल्या ठेवीगत सोबती मिलन के संग जुदाई या उक्तीप्रमाणे कधी दिसतात अपूर्व योगात जुळताना, तशा दैव योगात पुन्हा दिसतातही विरतांना वियोगात.
मानवी जीवनातील एकूणच सोबती याही त्या जीवनासारख्याच. रोमांचक हव्या हव्याशा वाटल्या, तरी शेवटी त्याही काळाच्या अधीन काही संपूच नयेत वाटतानाच मध्येच संपणाऱ्या नि काही अल्पजीविच. ‘अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती’ या गीतातल्या पक्ष्यासारखीच या सोबतींचीही अधुरी एक कहाणी.
माणसा-माणसांच्या सोबतीसारखी माणूस आणि प्राण्यातील सोबतही लक्षणीय. सकृतदर्शनी मुका म्हणवणारा, पण सोबतीची नवी परिमाणं आपल्या कृतीतून दाखवणारा प्राणी आपल्या सोबतीला येणं ही भाग्याची गोष्ट. आपल्या संस्कृतीत अशा प्राण्यांची केवळ दखलच घेतलेली नाही, तर त्यांच्या सोबतीचं वैशिष्टय़ही अधोरेखित केलेलं दिसतं. कृतज्ञ भावातच व्हावा काही नमुने दाखल पशुमित्रांचा उल्लेख. गौरवितात इथं वृषभाला. दिलं जातं एका राशीला याचंच नाव आणि करतोही लाड पोळ्याला देऊन पुरण-पोळी पूजेनंतर त्याच्या. गायीला गोमाता म्हणत तिच्या पावन स्पर्शात होतो इथला प्रत्येक देह शुचिर्भूत. या दोघांचीही खरी सोबत भूमिपुत्रांनाच. चतुष्पादांच्या आजन्म सोबतीत सोबत अश्वाची आणि सोबत श्वानाची लाक्षणिक आणि लखलखती. कथा कैक अश्वाच्या (जशी चेतकाची) आणि श्वानाच्या (जशी भालूची) माणसाने शिकाव्यात अशाच स्वामीनिष्ठेच्या आणि विश्वासाच्या.
आता अमर झालेला शूर मराठावीरांचा युद्धभूमीवरील इतिहास नेहमीच घडला. अश्वाच्याच टापांच्या अद्भूत साक्षीने. इथं साऱ्यांनाच भावलेली अशीच मऊशार आणि ऊबदार सोबत असते वाघाच्या मावशीची अर्थात आपणा सर्वाच्या मनिमाऊची. मनिमाऊ असो की मनिमाऊच बाळ असतात दोन्ही छानंच. आपण दूध पितांना कोणी पहात नाही अशीही नितीशास्त्रात शिकवण देणारीही मांजर सर्वाना ठाऊक.
तसे इतरही बरेच प्राणी असतात इथं आमच्या सोबतीला आलेली अप्रतिम साहित्य रचनांतून. पण त्यातही छोटय़ांचं अपूर्व मनोरंजन करणारी ही मंडळी ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा’ या अफलातून कविता आपापल्या वैशिष्टय़ासह येऊन धम्माल उडवून देतात. आमच्या दैनंदिन जीवनातही प्राण्यांचा संदर्भ किती सहज गुंफला जातो. म्हणतोच आपण कधी मला हत्तीचं बळ आलं अचानक आलेल्या ऊर्मीत. कुणाची चालत असते उंटागत तिरकी. एवढा घोडा झालास तरी - गाढवासारखा वागू नकोस म्हणतात बहुतांश इथं.
तसं सारं जीवनच या ना त्या सोबतीनं व्यापलेलं दिसतं. शेवटी सोबत उरते आपलीच आपल्याला. होतंच असते या वेळी जाणीव एकटेपणाची आणि एकटं राहिलेल्या आपल्या ‘स्व’चीही. एकटय़ानेच आलोत याची नि एकटय़ानेच जायचं कुठं याचीही. हो, आणि सारं आयुष्यभरच आपली सावली बनून राहिलेल्या पण तसं बहुतांश सर्वानाच स्वाभाविक जाणिवेनं नकोशी वाटणारी मृत्यूच्या सोबतीची जाणीव.