Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कार्यवाहीची माहिती सचिव आज देणार
मंत्री थोरात-हजारे चर्चा
पारनेर, २५ मार्च/वार्ताहर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वर्षभरात केलेल्या विविध मागण्यांबाबत सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी संबंधित खात्याचे सचिव उद्या (गुरुवारी) राळेगणसिद्धीला येणार आहेत. मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २७) राज्यात आंदोलन सुरू करण्याचा इशारा हजारे यांनी दिला. या पाश्र्वभूमीवर कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

 

यांनी आज रात्री राळेगणसिद्धीत हजारे यांच्याशी चर्चा केली.
हजारे यांचे सध्या मौन आंदोलन सुरू आहे. त्यांनी थोरात यांच्याशी लिखित स्वरूपात संवाद साधला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने सध्या ठोस निर्णय घेता येणार नाही. आचारसंहिता संपल्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या ३ महिन्यांत मागण्यांबाबत सरकार निर्णय घेईल, असे थोरात यांनी हजारे यांना सांगितले. मात्र, त्यापूर्वी झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत आचारसंहितेची अडचण कशी येते, असा सवाल करीत हजारे यांनी थोरात यांचा आंदोलन मागे घेण्याचा प्रस्ताव फेटाळला. थोरात यांनी मनधरणी केल्यानंतर हजारे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शविली. मात्र, आंदोलनाच्या आदल्या दिवशी सरकार हालचाल करते. त्याआधी दखल घेतली जात नाही, याबद्दल हजारे यांनी नाराजी व्यक्त केली.
नद्यांमधील वाळूचा अमर्याद होणारा उपसा थांबवावा, जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर दावा दाखल करण्याबाबत कायदा करावा, भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांची स्थापना करावी, राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर जबाबदारी सोपवावी, माहितीच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करावी, वन खात्याची हजारो हेक्टर जमीन गायब झाली आहे, तिचा शोध घेण्यास उच्चस्तरीय समिती नेमावी, नागरी बँका व पतसंस्थांत अडकलेल्या ठेवी ठेवीदारांना परत मिळाव्यात, सरकारी अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती दरवर्षी वेबसाईटवर जाहीर करावी, दारूबंदी समित्या स्थापन कराव्यात, रॉकेल रेशनिंग व गॅस वितरण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करावे अशा विविध मागण्या हजारे यांनी सरकारकडे केल्या आहेत. त्यासाठी वेळोवेळी सरकारशी पत्रव्यवहार केला. संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी बैठकाही झाल्या. मात्र, मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही नसल्याने हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. चर्चेच्या वेळी समृद्ध गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, ज्ञानदेव वाफारे, बाबासाहेब भोस, गंगाराम बेलकर, हसन राजे आदी उपस्थित होते.
‘मग मुख्यमंत्री कसे?’
चर्चेदरम्यान थोरात यांनी मुख्यमंत्री नवीन आहेत. त्यांना वेळ द्या. या आंदोलनासंदर्भात त्यांना फारसा अनुभव नाही, असे म्हणताच हजारे यांनी ‘अनुभव नाही, मग ते मुख्यमंत्री कसे झाले,’ असा सवाल केला!