Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जिल्हा परिषदेचे साडेसहा कोटींचे अंतरिम अंदाजपत्रक मंजूर
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या पुढील वर्षांच्या (सन २००९-१०) ६ कोटी ४६ लाख रुपयांच्या अनिवार्य तरतुदी असलेल्या अंतरिम अंदाजपत्रकास मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी आज

 

मंजुरी दिली.
सन २००८-०९च्या १२ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकासही या वेळी मान्यता देण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव करपे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय शहा या प्रसंगी उपस्थित होते.
आचारसंहितेमुळे मार्चअखेरीस जि. प. सभागृहास अंदाजपत्रक सादर करणे व त्यास मान्यता देणे बंधनकारक होते. त्यामुळे सरकारने याबाबतचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केले होते. हे अधिकार वापरून माने यांनी अंदाजपत्रकास मंजुरी दिली. आचारसंहिता १६मेपर्यंत आहे. त्यानंतर जूनमध्ये सर्वसाधारण सभा होईल. या सभेपुढे सन २००८-०९चे सुधारित अंदाजपत्रक माहितीसाठी आणि सन २००९-१०चे मूळ अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करावे लागणार आहे.
पुढील वर्षांचे अंदाजपत्रक ६ कोटी ४६ लाखांचे आहे. त्यात केवळ जूनपर्यंतच्या प्रशासकीय स्वरूपाच्या व अनिवार्य खर्चाच्या तरतुदी आहेत. त्यातील सुमारे १ कोटी ९६ लाखांच्या तरतुदी पंचायत समिती स्तरावरील, तर सुमारे अडीच कोटी ग्रामपंचायतींना मुद्रांक शुल्कापोटी देय असलेले आहेत. उर्वरित सुमारे १ कोटी ९० लाख रुपये जिल्हास्तरावरील नियोजनाचे आहेत. त्यात ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी संबंधित सर्पदंश, श्वानदंश, साथीचे रोग यासाठी २० लाख ८० हजार व अशाच स्वरुपासाठी पशुसंवर्धन विभागास १२ लाख रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत. इतर तरतुदी सामान्य प्रशासन विभागाकडील आहेत.
सन २००८-०९चे १० कोटी ६० लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. ते आता सुधारित १२ कोटी ४३ लाख रुपये खर्चाचे झाले. बांधकाम विभागाकडील (उत्तर) १ कोटी ५३ लाखांची तरतूद असताना २ कोटी ४१ लाख रुपये खर्चाची कामे प्रस्तावित झाली. तर दक्षिण विभागाकडे १ कोटी ६५ लाख रुपये प्रस्तावित असताना २ कोटी ७७ लाख रुपये खर्चाची कामे घेतली गेली. याशिवाय लघुपाटबंधारे विभागाकडील खर्च ७१ लाखांवरून ९८ लाख रुपये वाढला, तर आरोग्यावरील खर्चातही सुमारे ४ लाख रुपये (एकूण ५४ लाख ७० हजार) वाढ झाली.