Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकान जळून खाक
५ लाखांचे नुकसान
पारनेर, २५ मार्च/वार्ताहर

येथील नवीपेठेतील प्रशांत अ‍ॅटोमोबाईल या दुकानास शॉर्टसर्किटमुळे आज (बुधवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. आगीमुळे सुमारे

 

पाच लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बाजार समितीचे संचालक सखाराम औटी यांचे अळकुटी रस्त्यावर नवीपेठेत प्रशांत अ‍ॅटोमोबाईल हे वाहनांचे सुट्टे भाग, विविध वाहनांच्या बॅटऱ्या, विविध कंपन्यांच्या ऑईलच्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास धूर येत असल्याचे जवळच काम करीत असलेले विशाल हार्डवेअरचे मालक भास्कर बोरुडे यांच्या निदर्शनास आले.
श्री. बोरुडे यांनी दुकानाशेजारीच राहत असलेले प्रशांत अ‍ॅटोमोबाईलचे मालक औटी यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानात ऑईल, तसेच इतर ज्वालाग्राही वस्तू असल्यामुळे आगीने थोडय़ाच वेळात रौद्र रूप धारण केले.
औटी, बोरुडे यांच्यासह मुकादम पोपट औटी, पत्रकार प्रमोद गोळे यांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पारनेर पोलिसांनी नगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण केले.
अग्निशमनपथकातील संजय शेलार, सादिक शेख, जालिंदर घोरपडे, पांडुरंग आडगे यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सुमारे एक तासाने आग आटोक्यात आली. पथकातील जवानांनी जीव धोक्यात घालून दुकानाचे पत्रे उचकटून आग विझविली.
जुन्या घटनेची आठवण
सुमारे बावीस वर्षांपूर्वी श्री. सखाराम औटी यांच्या पेट्रोलसाठय़ास आग लागली होती. त्या वेळी औटी गंभीररित्या भाजले होते. त्या वेळी पेट्रोलसाठा ठेवलेल्या वाडय़ाचेही नुकसान झाले होते. आज पुन्हा बावीस वर्षांनी श्री. औटी यांच्या दुकानास आग लागल्यामुळे अनेकांना जुन्या घटनेची आठवण झाली.