Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिक्षिकेस मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांस अटक
राहाता, २५ मार्च/वार्ताहर

शिक्षिकेच्या श्रीमुखात भडकविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली. संगमनेर

 

तालुक्यातील झरेकाठी येथील विद्यालयात हा प्रकार घडला.
झरेकाठी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षिका शैलजा मधुकर अनाप या सातवीची तोंडी परीक्षा घेत होत्या. त्या वेळी एका विद्यार्थ्यांने विद्यार्थिनीची चेष्टा केली. त्यावर अनाप यांनी त्यास शांत बसण्यास सांगितले. तरीही तो गप्प न बसल्याने त्यास वर्गाबाहेर काढले. संबंधित विद्यार्थी शाळेत आला. वर्गशिक्षिकेने त्याला वर्गात न घेता मुख्याध्यापकांकडे पाठविले. मुख्याध्यापक गिरी यांनी त्याला आई-वडिलांना घेऊन येण्यास सांगितले. त्याने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. आई साखरबाई फुलमाळी व वडील गुलाब फुलमाळी हे मुलासह शाळेत आले. दरम्यान, आपल्या मुलाला वर्गाबाहेर का काढले, याचा जाब विचारला.
दरम्यान, या मुलाने केलेल्या गैरवर्तनाचा पाढा शिक्षकासह मुख्याध्यापकांनी आई-वडिलांसमोर मांडल्याने याचा राग या विद्यार्थ्यांला आला. त्याने शैलेजा अनाप यांच्या श्रीमुखात भडकावली. याबाबत अनाप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फुलमाळी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश मिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शेख करीत आहेत.