Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मतदान केंद्रांवरील गडबड रोखण्यासाठी ‘सेक्टर ऑफिसर’
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

मतदान केंद्रांवर कोणी कसली गडबड करू इच्छित असेल, तर सावधान..! ‘सेक्टर

 

ऑफिसर’कडून त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल.
निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी १२ ते १५ मतदान केंद्रांमागे हे ‘सेक्टर ऑफिसर’ पद निर्माण करण्यात आले आहे. या सेक्टर ऑफिसर्सना मतदानाचा दिवस व त्यापूर्वी ७ दिवस तालुका दंडाधिकारीपदाचे अधिकार देण्यात आले
आहेत.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी ही माहिती दिली. मतदारांसाठी सुरू केलेल्या ‘हेल्पलाईन’चा विस्तार करून ती आता सर्व तालुक्यांमधूनही सुरू करण्यात आली आहे. त्याशिवाय ‘एसएमएस’द्वारेही आपला मतदार ओळखपत्र क्रमांक पाठवून मतदार आता त्यांचा मतदानयादीतील क्रमांक, मतदान केंद्र ही माहिती मिळवू शकेल, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘१०००’ या टोल फ्री क्रमांकावरून मतदार आवश्यक ती माहिती मिळवू शकतील. याशिवाय ‘२३२०२७०’ हा क्रमांकही उपलब्ध आहे. प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात या सेवेसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक देण्यात आला असून, त्याचा दर लोकल कॉलइतकाच आहे. मतदाराने आपले नाव व विधानसभा मतदारसंघ सांगितला की, केवळ अध्र्या मिनिटात त्याला संपूर्ण माहिती दिली जाईल. एसएमएससाठी ‘५४६४६’ हा क्रमांक असून त्यावर ‘गेट एनजीआर’ व पुढे मतदार ओळखपत्राचा क्रमांक टाईप करून पाठवला की लगेचच त्या मोबाईल क्रमांकावर संबंधित मतदाराची माहिती देण्यात येणार असल्याचे डॉ. अन्बलगन यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर मतदान कसे करायचे याची ४ मिनिटांची सीडी तयार केली आहे. ज्या ठिकाणी मागील निवडणुकीत ५० टक्क्य़ांपेक्षा कमी मतदान झाले, तेथे ही सीडी प्रामुख्याने जाहीर कार्यक्रमाद्वारे मतदारांना दाखवली जाणार आहे. तसेच अन्य गावांमध्येही तिचे प्रदर्शन करण्यात येणार आहे, असे डॉ. अन्बलगन म्हणाले.
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे, नियंत्रण कक्षप्रमुख प्रदीप पोतदार, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे उपस्थित होते. जिल्ह्य़ात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. २८ लाखांपैकी २३ लाखांपेक्षा अधिक मतदारांकडे आता मतदार ओळखपत्र आहे. मतदानाकरता नाव नोंदवण्याची, मतदार ओळखपत्र तयार करून घेण्याची मुदत ४ एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी ओळखपत्रे तयार करून घ्यावीत, असे आवाहन सोनवणे यांनी
केले.
हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक
मतदारांसाठीच्या हेल्पलाईनचे तालुकानिहाय दूरध्वनी क्रमांक याप्रमाणे (कंसात एसटीडी कोड) - पारनेर - (२४८८) २२२२९९, शेवगाव - (२४२९) २२१८३५, पाथर्डी - (२४२८) २२१११०, कर्जत - (२४८९) २२२७९६, जामखेड - (२४२१) २२१११४, श्रीगोंदे - (२४८७) २२०२७२, श्रीरामपूर - (२४२२) २२३५३२), नेवासे (२४२७) २४१४२५, राहुरी - (२४२६) २३३२२०, राहाता - (२४२३) २४२७३३, संगमनेर - (२४२५) २२०५०८, कोपरगाव (२४२३) २२३९००, अकोले (२४२४) २२२०४६. जिल्ह्य़ासह या सर्व हेल्पलाईन सध्या कार्यालयीन वेळेत खुल्या असून, २० ते २३ एप्रिलदरम्यान २४ तास खुल्या राहतील.