Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वीजतोड मोहिमेविरुद्ध काँग्रेस व भाजप सरसावले
नेवासे, २५ मार्च/वार्ताहर

वीजबिल वसुलीसाठी ‘महावितरण’ने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेविरुद्ध काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे व भाजपचे नेते विठ्ठलराव लंघे

 

यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भाजपने तहसीलदारांचे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या हलाखीचे व ग्रामीण जनजीवन वीज कंपनीमुळे विस्कळीत झाल्याकडे लक्ष वेधले आहे. ग्रामीण भागात पीठगिरण्या देखील चालत नाहीत. पाणीयोजनाही बंद आहेत. कंदिल व चिमण्यांच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत आहे. विजेअभावी गव्हाची पिके हातातून जाण्याचा धोका असल्याने वीज तोडणे मोहीम थांबवावी; अन्यथा कधीही रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर विठ्ठलराव लंघे, दिनकरराव ताके, डॉ. लक्ष्मण खंडाळे, दिनकरराव गर्जे,
प्रवीण ठोकळे, बाळासाहेब गरुड, बाळासाहेब पवार आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या सह्य़ा
आहेत.
दरम्यान, आजच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनीही ‘महावितरण’च्या कार्यकारी अभियंत्यांना याच विषयावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी अडचणीत असताना वीजबिल वसुली अन्यायकारक भूमिकेतून होत आहे. पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसताना पिके हातातून जात आहेत. एकरकमी वसुली न करता हप्ते पाडून वसुली करावी; अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.