Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कृषी विज्ञान केंद्रांनी कृतिआराखडा तयार करावा - देशमुख
राहुरी, २५ मार्च/वार्ताहर

कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या केंद्रांनी जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्याच्या पीक पद्धती, पाऊस, हवामान, जमिनीचा प्रकार, शेतकऱ्यांच्या गरजा याचा कृति-आराखडा तयार करावा, अशी सूचना कुलगुरू

 

डॉ. राजाराम देशमुख यांनी केली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित कृषी विज्ञान केंद्राच्या कृति-आराखडा कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे विभागीय प्रकल्प संचालक डॉ. एन. सुधाकरन, अधिष्ठाता डॉ. अंकुश जाधव, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. हरी मोरे, डॉ. सुधाकर वराडे उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी नियंत्रणाऐवजी समन्वयाची गरज आहे. बीजोत्पादन कार्यक्रम विद्यापीठ व कृषी विभागाने यशस्वीपणे राबविला. कृषी विज्ञान केंद्रानेही यामध्ये सहभागी व्हावे. कृषी विज्ञान केंद्राकडून दर्जेदार कामाची अपेक्षा करताना तेथील विषय विशेषज्ज्ञ व कर्मचारी यांचे वेतन व आनंददायी जीवन याकडेही स्वयंसेवी संस्थांनी प्राधान्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
माती परीक्षणानुसार खत व पाणी व्यवस्थापन, फळबाग लागवड, पशुसंवर्धन, जलपुनर्भरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर कृषी विज्ञान केंद्रांनी लक्ष केंद्रित करावे. माती परीक्षणासाठी नमुना घेताना प्रत्येक जमिनीच्या सव्‍‌र्हेनुसार तो घ्यावा. संपूर्ण गावाचा एकच नमुना घेणे ही पद्धत शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पंडित खर्डे यांनी केले. आभार डॉ. आनंद सोळंके यांनी मानले.