Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जि. प. सदस्य कार्ले यांचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम
नगर, २५ मार्च/वार्ताहर

दहावी-बारावीच्या निकालानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची तहसील कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले गोळा करण्यासाठी तारांबळ होते. सामान्य लोकांना सरकारी योजनांची माहिती नसते. यासंदर्भात जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी मार्गदर्शन पुस्तिका काढून तिचे वाटप केले.

 

त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत होत आहे.
बाबुर्डी येथील राजे शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब परभाणे यांच्या संकल्पनेतून ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी काही प्रायोजकांचीही मदत घेतली. रहिवासी, उत्पन्न, जातीचा, नॉनक्रिमिलेअर, तसेच शिधापत्रिका, जन्म-मृत्यूची नोंद, रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, सरकारच्या विविध योजनांसाठी कोणती कागदपत्रे लागतात याची या पुस्तिकेत माहिती आहे.
जून महिन्यात विविध परीक्षांचे निकाल लागतात. त्यामुळे निकालानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडते. त्यातच प्रवेशासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात. हे दाखले गोळा करताना विद्यार्थी व पालकांच्या नाकीनऊ येतात. तसेच तहसील कार्यालयातही गर्दी वाढल्याने दाखले मिळण्यास उशीर लागतो. मानसिक त्रास, पैशाचा व वेळेचा अपव्यय होतो.
काहीजणांना तर हे दाखले कोठे मिळतात, त्यासाठी काय करावे लागते हे माहिती नसते. ग्रामीण भागातील या अज्ञानीपणाचा काहीजण फायदा घेतात. हे ओळखून जि. प. सदस्य कार्ले यांनी याबाबतची माहिती पुस्तिका तयार केली आहे. कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून वाळकी, अकोळनेर, मेहेकरी, रूईछत्तिशी येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ती वाटप करण्यात आली.
सर्वश्री. गणेश गोरे, दादा गोरे, प्रवीण गोरे, संदीप भोर, दत्ता गोडवे, शशी पालवे, अनिल लांडगे, प्रमोद गहिले आदी कार्यकर्ते ही माहिती पुस्तिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अधिक माहिती व अडचणीसंदर्भात संदेश कार्ले (९४२२२२०८४३) किंवा बाळासाहेब परभाणे (९९७०३३५१७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.