Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अंध, अपंग विद्यार्थ्यांचा अनोखा कलाविष्कार!
राहाता, २५ मार्च/वार्ताहर

अंध, अपंग, मूकबधीर, विकलांग विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या बळावरच स्पर्धेमध्ये उत्तम

 

कामगिरी करीत उपस्थितांची मने जिंकली.
अपंगांच्या नॅशनल अ‍ॅबिलिंपिक विभागीय स्पर्धेचे आज शिर्डीत उद्घाटन झाले. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, गुजरात या तीन राज्यांतील १५ वर्षांवरील सुमारे ४५० स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन नॅशनल अ‍ॅबिलिंपिक असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष एअर मार्शल एस. जी. इनामदार यांच्या हस्ते झाले. या वेळी असोसिएशनच्या महाव्यवस्थापक डॉ. उमा तुली, विभागाचे उपाध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, संग्राम संस्थेचे सचिव डॉ. अरविंद रसाळ, सूर्यकांत शिंदे, डॉ. ए. के. दत्ता, डॉ. फडतरे, राणीप्रसाद मुंदडा, दत्ता आरोटे उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये अपंगांनी बुद्धिबळ, वीणकाम, मातीकाम, शिवणकाम, संगणक, भरतकाम, नक्षीकाम आदीमध्ये अपंगत्वावर मात करीत अनोखा कलाविष्कार सादर केला. या आगळ्या वेगळ्या स्पर्धामधून अपंगांचा आत्मविश्वास व स्वबळावर उभे राहण्याचा प्रयत्न सफल झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. उपस्थितांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. आजच्या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे गुजरात राज्यातील ३२ वर्षीय इलाबेन संचानी हिने दोन्ही हात नसताना पायांनी सुईच्या आधारे उत्कृष्ट वीणकाम केले, तर अंध मुलांनी बुद्धिबळामध्ये करामत दाखविली. मतिमंद मुलांनी उत्कृष्ट वीणकाम केले. मूकबधीर मुलांनी लाकडावर कोरीव नक्षीकाम केले.
या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष एअर मार्शल एस. जी. इनामदार म्हणाले की, स्पर्धाच्या माध्यमातून अपंगांच्या पंखांना बळ येईल. त्यातून त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावला जाईल.
डॉ. तुली म्हणाल्या की, डॉ. तांबे यांनी तीन राज्यातील अपंगांच्या स्पर्धा शिर्डी येथे घेऊन नवीन आदर्श समाजासमोर उभा केला. सूर्यकांत शिंदे यांनी स्वागत, तर संग्राम संस्थेचे सचिव डॉ. अरविंद रसाळ यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक राजेंद्र कोहकडे, मुख्याध्यापक एन. पी. वाणी, चांगदेव खेमनर, कवडे परिश्रम घेत आहेत.