Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शरीर सुदृढ असल्यास मनही सुदृढ - डॉ. कांडेकर
जामखेड, २५ मार्च/वार्ताहर

आपल्या दैनंदिन कामात आर्थिक उन्नतीसाठी घोडदौड करत असताना आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपण आजाराला बळी पडतो आणि नैराश्य पदरी पडते. शरीर सुदृढ असेल, तर आपले आचार-विचार आणि मनही सुदृढ राहणार असल्याचे विचार नोबेल हॉस्पिटलचे

 

व्यवस्थापकीय संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी व्यक्त केले.
आचार्य आनंदऋषीमहाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील (कै.) सुवालाल कोठारी सामाजिक प्रतिष्ठान व नोबेल हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर (नगर)च्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. अजय कोठारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बन्सीलाल कोठारी, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे उत्तमचंद श्रीश्रीमाळ, संजय कोठारी उपस्थित होते.
डॉ. कांडेकर म्हणाले की, आरोग्यसेवा सर्व स्तरांतील लोकांना मिळतेच असे नाही. कारण ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते, त्या गरजू लोकांना अशा शिबिरांची आवश्यकता आहे. हे काम कोठारी प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष संजय कोठारी गेली अनेक वर्षांपासून करत आहेत.
यावेळी डी. एन. बी. आर्थो परीक्षेत भारतात प्रथम आल्याबद्दल डॉ. अजय कोठारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नगरसारख्या ठिकाणी रुग्णालय उभारून गरिबांची सेवा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. शिबिरात ५१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक मिठूलाल नवलाखा यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. श्रीधर जगदाळे यांनी केले, तर आभार प्रशांत बोरा यांनी मानले.