Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

रुग्णांची लूट, कर्मचाऱ्यांचे शोषण रोखण्यासाठी संघटना स्थापन
नगर, २५ मार्च/प्रतिनिधी

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून रुग्णांची होत असलेली लूट आणि कर्मचाऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी ‘रुग्ण मित्र’ व ‘वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मित्र’ या दोन सामाजिक संघटनांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती नागरी हक्क संरक्षण

 

समितीचे प्रमुख मिलिंद मोभारकर व सहकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
खासगी वैद्यकीय क्षेत्रात सध्या ‘कट प्रॅक्टीस’, तसेच अनावश्यक चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णांची लूट केली जात आहे. अनेकदा आजार नसतानाही रुग्णांना भीती घालून गंडविले जाते. वैद्यकीय क्षेत्राला संघटित गुन्हेगारीचे स्वरूप आले आहे. रुग्णालये ही पांढरपेशांच्या भ्रष्टाचाराची केंद्रे झाली आहे, असे ते म्हणाले.
मोठ-मोठी रुग्णालये बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस. प्रॅक्टीसनर्स, पारिचारिका, विविध विभागाचे तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांच्या जीवावर चालतात. मात्र, या सर्वाना अत्यंत तुटपुंज्या पगारात दररोज १२-१४ तास राबवून घेतले जाते. रुग्णालयांचे प्रमुख असलेले उच्चविद्याविभूषित डॉक्टर काही वर्षांत कोटय़वधी रुपये कमवतात. दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजा भागविण्याइतकाही पगार त्यांना देत नाहीत.
सामान्य नागरिक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या अपप्रवृत्तींविरुद्ध संघटित व्हावे, कुठल्याही दबावाला बळी पडू नये. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९४२२२२११०४/९४२३१७३८२७/९३२६०२२३१०वर संपर्क साधावा, असे आवाहन मोभारकर यांनी केले. पत्रकार परिषदेला अप्पासाहेब कुल्हट, सलमान आर्मेचरवाला, अल्ताफ जहागीरदार, सुनील टाक, प्रशांत वाव्हळ, सुरेश पिल्लई, श्याम साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.