Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

माजी केंद्रीय मंत्र्यांची गळाभेट!
पाथर्डी, २५ मार्च/वार्ताहर

भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी आज माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांची भेट घेऊन तालुक्यात प्रचाराला प्रारंभ केला. चर्चेचा तपशील समजला नसला, तरी प्रचारात सहभागी व्हा, अशी गळ गांधी यांनी ढाकणेंना घातली. भेटीसंदर्भात ढाकणेंना विचारले असता त्यांनी विविध क्षेत्रांतील लोक आपल्याला नेहमीच भेटतात. त्याच पद्धतीची ही भेट असून, त्यात वावगे नसल्याचे

 

मत व्यक्त केले.
गांधींची उमेदवारी जाहीर होताच दुसऱ्या दिवशी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे पाथर्डीत दाखल झाले व गांधींच्या प्रचाराला सुरुवात केली. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचाराचे नियोजन केले. काल शहरात फिरून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या पाश्र्वभूमीवर आज पहाटेस गांधी यांनी मोहटादेवीला अभिषेक करून सकाळीच ज्येष्ठ नेते ढाकणे यांची तासभर भेट घेऊन चर्चा केली. ढाकणे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय प्रवाहापासून दूर असून, मागील विधानसभेला प्रताप ढाकणे उमेदवार असतानाही ते तटस्थच राहिले. तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग असून, त्यांनी राजकीय आखाडय़ात उतरून पुन्हा दुसरी इनिंग सुरू करावी, अशी गळ आतापर्यंत अनेकांनी घातली. आज गांधी यांनीही ढाकणेंची भेट घेत ‘माझ्यासाठी तरी प्रचारात उतरा, तालुक्याची सूत्रे हाती घ्या’ अशी गळ घातली. गांधींच्या आवाहनाला ढाकणे कसा प्रतिसाद देतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले, तरी ढाकणेंनी आज तरी या भेटीविषयी फार काही सांगण्याचे टाळल्याने ढाकणे प्रचारात सहभागी होणार की नाही याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. गांधींनी प्रताप ढाकणे यांचीही भेट घेतली.