Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मढीला आज फुलोरबाग यात्रा
पाथर्डी, २५ मार्च/वार्ताहर

कानिफनाथ यात्रेचा उद्या (दि. २६) तिसरा व शेवटचा टप्पा सुरू होत आहे. उद्या फुलोरबाग यात्रा होणार आहे.

 

नवनाथांपैकी एक कानिफनाथांनी मढीत संजीवन समाधी घेतली. होळी, रंगपंचमी व फुलोरबाग अशा ३ टप्प्यांत यात्रा पार पडते. दोन टप्पे यापूर्वीच झाले. या काळात लाखो भाविकांनी नाथांच्या समाधीचे दर्शन घेतले. मढीत समाधीसाठी कानिफनाथ आले असता, मढी व निवडुंगे गावच्या शिवारात मुख्य मंदिराच्या एक किलोमीटर अलीकडे त्यांनी वनात विश्रांती घेतली. त्या ठिकाणी दवना व सुगंधित फुले प्रगट होऊन फुलांची बाग तयार झाली. तेथे भाविकांची गर्दी होऊन यात्रा भरल्याने त्या यात्रेला फुलोरबाग यात्रा म्हणतात. या दिवशी भाविक पैठणहून गंगेचे पाणी घेऊन आल्यावर बागेत विश्रांती घेतात. कावडींसह गडाकडे कूच केल्यावर गडावरून नाथांची पालखी, पंचधातूचा घोडा, अब्दागिरी व निशाण घेऊन वाजत-गाजत देवस्थानचे विश्वस्त व गावकरी कावडीच्या स्वागतास जातात. पालखी व कावडींची लक्ष्मी मंदिराजवळ भेट होते. या भेटीला निशाण भेट संबोधतात.
या भेटीनंतर कावडीच्या पाण्याने नाथांच्या समाधीला जलाभिषेक केला जातो. जलाभिषेकाचा कार्यक्रम पहाटे चापर्यंत चालतो. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे महापूजा होऊन यात्रेची सांगता होते. उद्याच्या यात्रेसाठी देवस्थान
समिती सज्ज झाली असून, जिल्ह्य़ाच्या सर्व आगारांतून मढीसाठी एस. टी. बसची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थान समितीने दर्शनरांगेची चांगली व्यवस्था
केल्याने मुख्य मंदिरावर
फारसा गोंधळ होत नाही. भाविकांमध्ये या बाबत समाधान व्यक्त होत आहे.