Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

विजेसाठी शेवगावला ‘जनशक्ती’चा ‘रास्ता रोको’
शेवगाव, २५ मार्च/वार्ताहर

शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम स्थगित करून त्वरित वीजपुरवठा पूर्ववत करावा, या मागणीसाठी जनशक्ती मंचच्या वतीने आज शेवगाव तहसील कार्यालयासमोर एक तास रास्ता

 

रोको आंदोलन करण्यात आले.
‘महावितरण’ने वीजबिल वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील अनेक गावांतील रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला. उन्हाळ्यातील भुईमूग, ऊस, घास, मका, कांदा आदी पिके ऐन भरात असून, या पिकांना पाणी देण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, विजेअभावी ही पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर तहसील कार्यालयात जनावरांसह येऊन शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा जनशक्ती मंचचे संस्थापक शिवाजीराव काकडे यांनी या वेळी दिला. येत्या ३० मार्च रोजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शेवगाव दौऱ्यावर असून, या वेळी त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येतील, असे शेतकऱ्यांनी जाहीर केले.
सहायक अभियंता नितीन घुमरे यांनी चोवीस तासांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ताराचंद लोढे, माजी सभापती अविनाश मगरे, ‘जनशक्ती’चे तालुकाध्यक्ष दिलीप भागवत, जगन्नाथ गावडे यांची भाषणे झाली.