Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नेत्यांची बलस्थाने आठवलेंच्या पथ्यावर!
एकीकडे कोल्हे यांची राष्ट्रवादीची मजबूत फळी, विखे-परजणे गटाची ताकद, दुसरीकडे शिवसेनेतील अंतर्गत वाद, भाजपची नगण्य स्थिती या राजकीय पाश्र्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवणुकीत काँग्रेस आघाडी पुरस्कृत रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले आणि

 

शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे या दोन प्रमुख उमेदवारांमधील लढत होत आहे. आमदार अशोक काळे यांची भूमिका अजूनही संदिग्ध आहे. ते काय करतात, याकडेही सर्वाचे लक्ष आहे. निवडणूक लोकसभेची असली, तरी त्याला संदर्भ आगामी विधानसभा निवडणुकीचे आहेत. तेच प्रमाण मानून प्रमुख राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
कोपरगाव तालुक्याने अपवाद वगळता सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादीची पाठराखण केली. मागील निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब विखे यांना (५७ हजार ९५ मते) प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार भानुदास मुरकुटे (४८ हजार ७१० मते) यांच्यापेक्षा ८ हजार ३३५ मते जास्त मिळाली. अर्थात, सेनेला मिळालेली मते लक्षणीयच होती. त्यानंतर विधानसभेत या पक्षातर्फे उतरलेल्या अशोक काळे यांना ती पूरक ठरली आणि प्रथमच सेनेचा आमदार कोपरगावमधून निवडून गेला. मधल्या काळात काळे यांची बदललेली राजकीय भूमिका, अलीकडे सेनेतील अंतर्गत वाद पाहता तालुक्यात सेनेचे लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांची वाट सध्या खडतर असली, तरी रिपब्लिकन उमेदवार रामदास आठवले त्याचा कसा लाभ उठवतात, त्यावर त्यांचे कोपरगावमधील मताधिक्य अवलंबून असेल.
पुनर्रचनेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पुणतांबे सर्कलची १० गावे नव्याने समाविष्ट झाली. या गावांमध्ये विखे-पिता-पुत्रांचे वर्चस्व असून, ३० हजारांपेक्षा अधिक मतदारांचा हा टापू लोकसभेसाठी महत्त्वाचा व निर्णायक ठरू शकतो. शिर्डी राखीव झाल्याने विखे आता मैदानात नसले, तरी सत्तेच्या किल्ल्या कोणाकडे द्यायच्या, हे मात्र त्यांच्याच हातात आहे. दुसरीकडे आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार बिपीन कोल्हे यांच्या दृष्टीने लोकसभेचे मैदान पाणी जोखण्याची संधी ठरणार आहे. आमदार काळेंची बदललेली भूमिका आणि सेनेतील अंतर्गत वाद (आता मिटल्याचे सांगितले गेले असले तरी!) यामुळे सेनेची वाटचाल कशी राहते, ते जसे महत्त्वाचे तसेच या स्थितीचा आणि आपल्या वर्चस्वाचा काँग्रेस व राष्ट्रवादी डंका कसा वाजविणार, मताधिक्य किती वाढविणार याचीही तालुक्यात उत्सुकता आहे.
आठवले यांनी काँग्रेसचे ‘पंजा’ हे चिन्ह घेऊन निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे राष्ट्रवादीतर्फे विधानसभेच्या मैदानात पक्षाच्या ‘घडय़ाळ’ चिन्हावर उतरले आणि त्यांच्या प्रचारयंत्रणेने ते मतदारांपर्यंत व्यवस्थित पोहोचविलेही. तालुक्यातील सध्याचे राजकीय चित्र पाहता आठवलेंचा मार्ग खडतर नसला, तरी सेनेच्या वाकचौरे यांनाही व्यक्तिगत संपर्क व पक्षाचा प्रभाव यामुळे तालुक्यात बऱ्यापैकी संधी आहे. किंबहुना तालुक्यात आठवले व वाकचौरे
दोघेही किती मते मिळवितात, त्याचीच खरी उत्सुकता आहे. सेनेतच राहायचे की वेगळा सवतासुभा, ते आमदार
काळेंनी अजून ठरविले नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे वाकचौरेंसह आठवलेंचेही लक्ष राहील. सध्याचे चित्र
पाहता वाकचौरेंना तालुक्यात बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे लोकसभेतील
‘कोपरगाव’ ची ओळख संपुष्टात आली आहे. गेली ४०
वर्षे कोपरगाव याच नावाने हा मतदारसंघ ओळखला गेला. त्याला विखेंचीही जोड होती. मात्र, आता शिर्डी या नावाने हा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसची पाठराखण करणाऱ्या कोपरगावात आताही तीच परंपरा चालू राहणार की नव्या प्रवाहात नवे काही घडणार, त्याची मतदारांत उत्सुकता आहे. किंबहुना लोकसभेत जी काही पेरणी होईल, त्याचीच कापणी विधानसभेच्या मैदानात करण्याच्या इराद्याने दिग्गज मंडळी तयार झाली आहेत.
महेश जोशी