Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सहानुभूती आणि प्रतिष्ठेची लढत!
राजकीय पक्ष दुय्यम मानून व्यक्तिकेंद्रीत झालेल्या श्रीगोंद्याच्या राजकारणात लोकसभेची निवडणूक काय व कोणते रंग भरते, त्याची मतदारांत उत्सुकता आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या वनमंत्री बबनराव पाचपुते यांचीच प्रतिष्ठा

 

श्रीगोंद्याच्या राजकारणात आता पणाला लागणार आहे. दिलीप गांधी यांच्या नावाभोवती असलेले सहानुभूतीचे वलय भेदतानाच तालुक्यातील विरोधकांची कर्डिलेंपेक्षा पाचपुतेंना जास्त धास्ती पडली आहे. भाजपपेक्षा गांधींना त्यांच्या कामातून ओळखणाऱ्यांची संख्या येथे मोठी असल्याने कर्डिलेंना येथे अनपेक्षित धक्का बसणार काय, याचीही चर्चा रंगू लागली आहे.
गेली ३० वर्षे तालुक्यात पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण सुरू आहे. विधानसभेत पाच वेळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे वनमंत्री पाचपुते ६ निवडणुकांमध्ये ६ वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुका लढले. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्याभोवती काँग्रेसचे येथील राजकारण चालते. तालुक्यातील प्रचार पाचपुते-नागवडे यांच्याभोवतीच केंद्रीत राहील, असे चित्र आहे. कुकडी कारखान्याचे अध्यक्ष कुंडलिक जगताप, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार यांचेही वेगळे अस्तित्त्व या निवडणुकीत पाहावयास मिळेल.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख यांना ५७ हजार ५१०, तर भाजपचे प्रा. ना. स. फरांदे यांना ५० हजार १८५ मते मिळाली. गडाख यांनी फरांदे यांच्यावर ७ हजार मतांची आघाडी घेतली. त्याआधी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळालेल्या भोस यांना ६९ हजार २१०, भाजपचे गांधी यांना १९ हजार १८७, तर राष्ट्रवादीचे दादापाटील शेळके यांना ५० हजार ४५५ मते मिळाली.
श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून कर्जतमधील २८ गावे काढून नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील व वाळकी मंडले जोडली आहेत. तालुक्यात १ लाख ९३ हजार २४४ मतदार आहेत. नगर तालुक्यातील गावांसह हा मतदारसंघ २ लाख ५३ हजार ८१ मतदारसंख्येचा झाला आहे.
सन १९९९मध्ये भाजपने प्रथम तालुक्यातील नेते घनश्याम शेलार यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, लगेच ही उमेदवारी बदलून गांधींना दिली. त्या वेळी भोस यांची स्थानिक उमेदवारी असतानाही गांधींनीच चांगली मते घेतली. मात्र, खासदार झाल्यानंतर ५ वर्षे तालुक्यातील जनसामान्यांच्या प्रश्नात सहभाग घेताना सभामंडप, सांस्कृतिक भवन, पंतप्रधान सडक योजना, पीकअप शेड, दूरध्वनी जोड अशी कामे करताना लोकांना भिडणाऱ्या प्रश्नांमध्ये जातीने लक्ष दिले. तालुक्यात भाजप विस्कळित असला, तरी गांधींना व्यक्ती म्हणून होणारी मदत काँग्रेस आघाडीला तापदायक ठरू शकते.
कर्डिलेंना उमेदवारी मिळवून देण्यात वनमंत्री पाचपुते यांचा मोठा वाटा आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे रदबदली करून ही उमेदवारी मिळविताना पाचपुतेंनी राजकीय गणित साधले. विधानसभेच्या वेळी नगर तालुक्यातील ५७ हजार मतांची मदत घेण्याचा या मागे डाव असला, तरी जिल्ह्य़ातील प्रस्थापितांना शह देताना कर्डिले यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापाठोपाठ लोकसभेची उमेदवारी, अशी कामगिरीही पाचपुतेंनी करून दाखविली. कर्डिलेंचा या तालुक्याशी संपर्क कमी आहे. मावळते खासदार तुकाराम गडाख यांनी श्रीगोंद्याशी संपर्क ठेवला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. आरोग्य शिबिरे, धार्मिक कार्यक्रम, योगासने अशा कार्यक्रमांना हजेरी लावताना त्यांनी अपंगांना चांगले सहकार्य केले. मात्र, खासदार म्हणून छाप पडली नाही. त्यांची शेलार यांच्याशी मैत्री पाचपुतेंना खटकली. त्याचा परिणाम गडाख व पाचपुतेंच्या राजकारणावर झाला. लोकांवर प्रभाव टाकण्यास गडाख यांची कामे पूरक ठरली नाहीत.
तालुक्यात दोन्ही काँग्रेसभोवती राजकारण फिरत असल्याने कर्डिलेंना अडचण नाही, असा वरिष्ठ नेत्यांचा अंदाज बांधला असेल, तर त्यांचा अपेक्षाभंग होण्याचीच जास्त शक्यता आहे. कारण कर्डिले हे पाचपुतेंचे उमेदवार आहेत. त्यामुळे नागवडे, भोस, जगताप, शेलार त्यांचे काम करतील काय किंवा कसे करणार, त्याचीही उत्सुकता आहे. निवडणूक लोकसभेची असली, तरी त्याला विधानसभा निवडणुकीचे पदर अशा प्रकारे आहेत. श्रीगोंद्यात कर्डिलेंना मिळणारे मताधिक्य पाचपुते यांचे श्रेय असेल हे गृहित धरले, तर पाचपुतेविरोधक काय करणार हेही म्हणूनच महत्त्वाचे आहे. गांधींविषयी लोकांमध्ये सहानुभूती भाजपसाठी जमेची बाब ठरणार आहे. ‘खासदार व निधी काय असतो, ते गांधींमुळे समजू लागले. दादा-बापू-तात्या-बाबा-अण्णा यांचे काय ते विधानसभेला पाहू’, अशी मार्मिक प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदारांमध्ये ऐकावयास मिळते.
तालुक्यातील दोन महत्त्वाच्या भागांत प्रभाव असणारे कुंडलिकराव जगताप व बाबासाहेब भोस यांची या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पक्षीयदृष्टय़ा हे दोन नेते आज कोणालाच निष्ठेने बांधलेले नाहीत. विधानसभेच्या तयारीला लागलेले हे दोन नेते विजयी होणाऱ्या उमेदवारालाच मदत करतील, अशी चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव काकडे, ज्येष्ठ नेते सदाशिवराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर मात्र कर्डिलेंना मताधिक्य देताना पाचपुतेंच्या राजकारणासाठी आटापिटा करतील.
तालुक्यात पाचपुते-नागवडे यांच्या टोकाच्या राजकीय संघर्षांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते जडले आहे. लोकसभेसाठी या दोन नेत्यांची वरकरणी व निवडणुकीपुरतीच असणारी युती दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कितपत पचनी पडते, यावरच कर्डिलेंची भिस्त राहील.
संजय काटे