Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

खासदार विखेंच्या भूमिकेकडे लक्ष!
खासदार बाळासाहेब विखे सातवेळा लोकसभेवर निवडून गेले. सन ९८ मध्ये नगर दक्षिणेतून शिवसेनेच्या तिकिटावर लढविलेली निवडणूक अपवाद वगळता त्यांनी अन्य निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावर लढवून जिंकल्या. केंद्रात अर्थराज्यमंत्री व अवजड उद्योगमंत्रिपदही त्यांनी भूषविले.

 

जिल्ह्य़ाच्या राजकारणात त्यांचा नेहमीच प्रभाव राहिला. परंतु आता शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाला. जागावाटपात शिर्डी काँग्रेसच्या, तर नगर राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेले. नगरमधून विखे काँग्रेसकडून उत्सुक होते. जागा अदलाबदलीचा प्रस्तावही त्यांनी पुढे ठेवला होता. काँग्रेसश्रेष्ठीही अनुकूल होते. पूर्वी पंढरपूर राखीवमधून खासदार रामदास आठवलेंनी दोन निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या. परंतु पंढरपूर खुला झाल्याने आठवलेंनी मोर्चा शिर्डीकडे वळविला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व आठवले यांची गेल्या २० ते २५ वर्षांंपासूनची राजकीय मैत्री सर्वश्रुत आहे. आठवलेंनी शिर्डीतून लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने जागेच्या अदलाबदलीला पवार राजी होतील, असा अंदाज होता. परंतु पवारांनी आठवलेंना वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे त्यांना काँग्रेसचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली!
आठवलेंच्या उमेदवारीकरिता काँग्रेसनेते अनुकूल होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना साथ दिली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी आठ दिवसांपूर्वीच त्यांना संमती दर्शविली. त्यांच्याकरिता शिर्डी सोडण्याचा निर्णय झाला. परंतु खासदार विखे यांच्या नाराजीमुळे आठवले यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला. नगरची जागा राष्ट्रवादीने सोडली नाही. तेथून शिवाजी कर्डिले यांची उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे विखे नाराज झाले. चार-पाच दिवस विखे दिल्लीत असल्याने आठवलेंच्या उमेदवारीबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमंत ओगले, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. नरेंद्र जाधव आणि प्रेमानंद रूपवते यांची नावे पुन्हा चर्चेत आली. विखे यांच्या भूमिकेमुळे आठवलेंची राजकीय कोंडी झाली. आठ दिवसांपूर्वीच आठवलेंचे शिष्टमंडळ लोणीला विखेंना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी आठवले-पवार मैत्री आहे. परंतु त्यांनी पवारांकडे शब्द टाकला नाही. माझा आठवलेंना विरोध नाही. परंतु त्यांनी पवारांकडे आग्रह धरला नाही, अशी रिपब्लिकन कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. विखेंचे पाठबळ नसेल तर आपण अडचणीत येऊ, म्हणून आठवले यांनी विखेंना नगरमधून लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला. राष्ट्रवादीचे नेते पवारांशीही त्यांनी बोलणी केली. परंतु उपयोग झाला नाही. राष्ट्रवादीने ताठर भूमिका घेतली. त्यामुळे आठवलेंना दिल्लीतच ठाण मांडून बसावे लागले. त्यातच रूपवते, ओगले यांनीही दिल्लीत तळ ठोकून नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे आठवलेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे. विखे यांची नाराजी दूर व्हावी म्हणून आठवले यांनी हायकमांडमार्फत दिल्लीत प्रयत्न केले. विखे यांचीही भेट घेतली. अहमद पटेल यांनी विखे यांची समजूत घातली आणि आठवलेंना मदत करण्यास सूचविले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने आज सोनिया गांधी यांची आठवले भेट घेणार आहेत. काँग्रेसचे समर्थन मिळाले नाही, तर आपली डाळ शिजणार नाही याची जाणीव त्यांना आहे. आजच्या भेटीनंतरच आठवलेंच्या उमेदवारीबद्दल संभ्रम दूर होईल.
आठवले यांनी अहमद पटेल, ए. के. अ‍ॅण्टोनी व मलिक्कार्जुन खरगे या दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन विखेंना राज्यसभेवर पाठवावे, अशी सूचना केली आहे. आठवले आता काँग्रेस कोटय़ातील उमेदवार असून त्यांच्याकरिता काही अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, विखेंचा झटका त्यांना बसला. उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला. आठवलेंना विरोध नसल्याचे विखे यांनी जाहीर केले असले, तरी त्यांची राष्ट्रवादीवर नाराजी आहे. त्यांच्या भूमिकेकडे राष्ट्रवादीचे लक्ष लागले आहे. नगरला राष्ट्रवादीच्या जिल्ह्य़ातील नेत्यांची ऊर्जामंत्री दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात विखेंच्या राजकीय भूमिकेबद्दल चर्चा झाली. विखे येत्या शनिवार व रविवारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विखे काय करणार, ही चर्चा होत आहे.
बित्तंबाज