Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

(अब!) हम साथ साथ है!
श्रीगोंदे, २५ मार्च/वार्ताहर

आपसांतील राजकीय वैर विसरून वनमंत्री बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे व बाबासाहेब भोस यांनी आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचार नियोजनासाठी श्रीगोंदे कारखान्यावर एकत्रित बैठक घेतली. एकमेकांवर कायमच चिखलफेक, कुरघोडी करणाऱ्या नेत्यांच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे का होईना, या ‘तुझ्या गळा..’मुळे राजकारणासाठी एकमेकांची

 

डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र कपाळावर हात मारून घेतला!
कर्डिले यांच्यासाठी आज पाचपुते-नागवडे-भोस राजकीयदृष्टय़ा एकत्र आले. तालुक्यातील राजकारणात गेल्या ३० वर्षांपासून कडवे विरोधक असणारे नागवडे व भोस यांच्या भेटीसाठी वनमंत्री पाचपुते आज थेट कारखान्यावर नागवडे यांच्या दालनात गेले. सोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव काकडे, साईकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष सदाशिवराव पाचपुते होते. नागवडे यांच्यासह भोस, कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, गणपतराव जंगले, माजी संचालक भाऊसाहेब कोळपे आदी दालनात उपस्थित होते.
पाचपुते व नागवडे एकमेकांशेजारी खुर्चीवर बसले होते. कर्डिले यांच्या तालुक्यातील प्रचाराबाबत नियोजनाची चर्चा रंगली. कुठे अडचणी आहेत, किती गाडय़ा लागतील, कुठे जोर लावायचा याविषयी अतिशय खेळीमेळीत चर्चा झाली. अध्र्या तासानंतर सर्व नेते बाहेर आले. मंत्र्यांच्या मोबाईलवरून कर्डिलेंबरोबर नागवडे बोलले. ‘दि. १ एप्रिलला अर्ज भरण्याच्या दिवशी तालुक्यातील कार्यकर्ते घेऊन येतो’, अशी चर्चा सुरू असताना बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना पाहताच सर्व नेत्यांच्या कपाळावर रेषा उमटल्या! तालुक्यातील एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगासाठी कधीच एकत्र न येणारे नेते राजकारणासाठी लगेच एकत्र आल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी दबक्या आवाजात चर्चा करीत अक्षरश कपाळावर हात मारला!