Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

पापड, कुरडय़ा, सांडगे आणि शेवयांची लगबग सुरू
नागपूर, २५ मार्च / प्रतिनिधी

नामांकित कंपन्यांनी तयार केलेल्या पापड, कुरडय़ा, सांडगे आणि शेवयांना शहरात मोठी मागणी असली तरी, ग्रामीण भागात मात्र महिला घरीच हे पदार्थ तयार करतात. महिलांनी घरी तयार केलेल्या या पदार्थानाही बाजारात चांगली मागणी आहे. उन्हाळ्यामध्ये पापड, कुरडय़ा, सांडगे आणि शेवया हे पदार्थ तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. पुढील महिन्यात येणाऱ्या अक्षय तृतीयेला घरोघरी या पदार्थाचा बेत असतोच. शहरांमध्ये हे सर्व पदार्थ रेडिमेट मिळत असले तरी, घरी तयार केलेल्या पदाथार्ना वेगळीच चव असते. दुपारच्यावेळी वस्तीतील महिला एकत्र येऊन घरोघरी शेवया, पापड तयार करतात.

तिसऱ्या दिवशी ९ अर्ज, प्रमुख राजकीय पक्षाचा कुणीही नाही!
नागपूर, २५ मार्च/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी विदर्भातील दहा मतदारसंघातून ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.आज प्रमुख राजकीय पक्षांच्या एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि यवतामळ -वाशीम मतदारसंघातून एकही अर्ज आला नाही. तीन दिवसात एकूण २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शुक्रवारी गुढीपाडवा असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

मिहान प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील १५० तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण
नागपूर, २५ मार्च/ प्रतिनिधी

मिहान प्रकल्पग्रस्त गावांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे १ हजार ८०० प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५० तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सरकारच्या वतीने मिहान/कार्गो हब आणि विशेष आर्थिक क्षेत्रासाठी नागपुरातील वर्धा मार्गावरील ‘हजारो’ एकर जमीन ताब्यात घेतली आहे. यात अनेक शतेजमिनी तसेच राहत्या घरांची जमीन आहे. स्थानिक लोकाधिकार समितीने मिहान प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ८० टक्के आरक्षण देण्याची मागणी जून २००८ मध्ये एम.ए.डी.सी.कडे केली होती.

तंटामुक्त समित्यांना धनादेश वितरित
कुही, २५ मार्च / वार्ताहर

कुही पोलीस ठाण्यांतर्गत १३ गावातील तंटामुक्त समित्यांची उत्कृष्ट म्हणून शासनतर्फे निवड झाली आहे. यापैकी १२ समित्यांसाठी २८ लाख रुपयांचे धनादेश कुही ठाण्यासमोरील पटांगणावर झालेल्या समारंभात वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुही तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवीदास देशमुख होते. ठाणेदार कोळी उपस्थित होते. कुही विभागातून नऊ तंटामुक्त समित्या, उमरेड तालुक्यातील एक, नागपूर विभागातील तीन अशा एकूण १३ गावातील समित्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. मांढळ तंटामुक्त समितीने उत्तम कामगिरी केल्यामुळे ८ लाख ५० हजारांचा पुरस्कार पटकावला आहे.

मार्चअखेरीस तीन सुटय़ा; तरीही कामाचा बोजा
नागपूर, २५ मार्च/प्रतिनिधी

मार्च महिना सुरू झाला की वर्षभर संथपणे कामकाज चालणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्येही कर्मचाऱ्यांची कामासाठी लगबग सुरू होते. मार्च अखेपर्यंत आर्थिक वर्षांचा सर्व ताळेबंद तयार करून ठेवावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांचीही धावपळ सुरू असते. मात्र, यंदा मार्च अखेरीस सुटय़ा आल्याने सध्या कर्मचाऱ्यांवर कामाचे ओझे आहे. त्यातच निवडणुका असल्याने कामाचा ताणही वाढला आहे. मात्र, ऐन मार्च महिन्याच्या शेवटीच तीन दिवस सुटय़ा आल्याने कर्मचाऱ्यांना या कामातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मार्च महिना आर्थिक वर्षांचा शेवटचा महिना असल्याने शासकीय कार्यालये, बँका, कंपन्या, उद्योजक आणि व्यावसायिक या सर्वाच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्वाचा असतो. वर्षभरातील कामकाजाचा ताळेबंद तयार करून कार्यालयात सादर केला जातो. त्यामुळे मार्च महिना सुरू झाला की वर्षभर अगदी संथपणे कामकाज करणारे शासकीय कर्मचारीही खडबडून जागे होऊन कामाला लागतात. यंदा महिन्याच्या शेवटी सुटय़ा आल्याने कर्मचारी सध्या कामाच्या ओझ्याखाली दबल्यासारखे वाटत आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात शुक्रवारी गुढीपाडव्याची सुटी आली आहे. याला लागूनच चवथा शनिवार आणि रविवारची सुटी आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उद्यापर्यंतच बहुतेक कामे पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. गुढीपाडव्याला निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार नसली तरी शनिवारी ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.

गुन्हेगार पलायन, दोन शिपाई निलंबित
नागपूर, २५ मार्च / प्रतिनिधी

कुख्यात गुन्हेगार राजा कलसीच्या शोधासाठी पोलिसांची पथके जिवाचे रान करीत असून त्याच्या पलायनप्रकरणी दोन शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. सहपोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले व अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर गावित यांनी आज शहरातील पोलीस ठाण्यात जाऊन कोठडींची पाहणी केली. कोठडीसमोर किती पहारेकरी तैनात असतात, त्यांचे वेळापत्रक यासंबंधी विचारपूस करून सजग राहण्याच्या सूचना दिल्या. पोलीस ठाण्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या बसण्याच्या जागा बदलवण्याबाबतही सांगण्यात आले. राजा प्रीतपालसिंह जसवंतसिंह कलसी हा मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास धंतोली पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पळून गेला. या प्रकरणाची सहायक पोलीस आयुक्त के.एस. बहुरे यांनी काल चौकशी केली. पोलीस ठाण्यातील निरीक्षकापासून शिपायापर्यंत सर्वाची जबानी घेतली. चौकशीअंती बाबाराव जानोजी बोदडे व संजय रूपराव कोटांगळे हे दोघे दोषी आढळले. तसा अहवाल सहायक पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तांना सादर केला. पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी त्या दोघांना निलंबित केले. दरम्यान, राजा कलसीचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकासह धंतोली व अजनी पोलिसांची विविध पथके राजाच्या शोधासाठी फिरत आहेत. त्याची संभावित ठावठिकाणे शोधली जात आहेत.

अश्विन गौरखेडे, प्रज्ज्वल साठे यांचा शाळेतर्फे सत्कार
नागपूर, २५ मार्च/ प्रतिनिधी

सातवीतील अश्विन सुरेश गौरखेडे आणि पाचवीतील प्रज्ज्वल डेव्हिड साठे या विद्यार्थ्यांनी मॅथेमॅटिक ऑलिंपियाड परीक्षेत अनुक्रमे पहिला व तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल सी.पी. अ‍ॅण्ड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयच्या रविनगर शाळेने त्यांचा सत्कार केला. यावेळी विक्रिकर निरीक्षक अनिल झनके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षक पराते व टाकळकर यांचाही सत्कार करण्यात आला. पाचवी ते सातवीमधून रितेश्वरी विकास भलावी हिचा आदर्श विद्यार्थिनी म्हणून गौरव झाला. संचालन कुमारी शिंदे आणि कुमारी बरमदे यांनी केले तर कुमारी वसावे हिने आभार मानले.

नाभिक समाजाचा वधूवर मेळावा
नागपूर, २५ मार्च / प्रतिनिधी

महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे नुकताच भगवती सभागृहात वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माधवराव दादीलवार, ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर, राजाभाऊ चिटणीस, माजी महापौर विकास ठाकरे, प्रभाकरराव फुलबांधे उपस्थित होते.
यावेळी रामकृष्णदादा बेलुरकर म्हणाले, प्रत्येकाने ग्रामगीतेचा अभ्यास करावा. ग्रामगीतेने जीवनाचा उद्धार होईल. सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने परिस्थितीचा विचार करून विवाह सोहोळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन बेलुरकर यांनी केले. या मेळाव्यात ५२ मुलगे ६५ मुलींनी नावे नोंदवून परिचय करून दिला. यावेळी स्वयंवर या स्मरणिकेचे प्रकाशन रामकृष्णदादा बेलुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. हेडगेवार रक्तपेढीतर्फे आयोजित शिबिरात १७ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. प्रभाकर फुलबांधे यांनी प्रास्ताविक केले तर, संचालन श्याम आस्करकर व शोभा चौधरी यांनी केले. अंबादास पाटील यांनी आभार मानले.

११ गरीब कुटुंबांना मनपाकडून शौचालये
नागपूर, २५ मार्च / प्रतिनिधी

वॉर्ड क्रमांक १०५ मधील दारिद्रय़ रेषेखालील अकरा कुटुंबांना स्वस्त दरात शौचालये बांधून देण्याच्या कामाला नगरसेवक किशोर गजभिये यांच्या प्रयत्नाने सुरुवात झाली. या नागरिकांनी महापालिकेकडून शौचालयाचे बांधकाम करून देण्याची मागणी नगरसेवकाकडे केली होती. नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन वॉर्डातील अकरा कुटुंबांना शौचालये बांधून देण्याच्या कामाला महापालिकेने मंजुरी दिली. या बांधकामाची पाहणी वरिष्ठ अभियंता राजू खानोरकर, कनिष्ठ अभियंता पी.एस. पांडे व कंत्राटदार शैलेश घोराडकर यांनी केली. यावेळी नगरसेवक गजभिये यांच्यासह संध्या मेश्राम, विमल गडपायले, पपिता ढोबळे, चंद्रभागा ढोबळे, उषा सोमकुंवर, रुपेश नागदिवे प्रामुख्याने उपस्थित होते.

अनुरक्षण कमान मुख्यालयातील महिलांची कॅन्सर रुग्णालयाला भेट
नागपूर, २५ मार्च / प्रतिनिधी

वायुसेना महिला कल्याण संस्थेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयातील महिलांनी अलीकडेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाला भेट दिली. यादरम्यान त्यांनी रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णालयाची विस्तारीत शाखा ‘स्नेहाचल’लाही त्यांनी भेट दिली. डॉक्टर तथा
कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी त्यांनी रुग्णांना फळवाटप केले. रुग्णालयासाठी डाळ, साखर, किराणा तसेच चादर आदी वस्तूंचे वाटपसुद्धा त्यांनी केले.

विदेशी भाषांमधील रोजगाराच्या संधींवर परिसंवादाचे आयोजन
नागपूर, २५ मार्च / प्रतिनिधी

मिहान प्रकल्पात मोठय़ा संख्येने विदेशी कंपन्या येत असून येथील युवकांना परदेशातील कंपन्यामध्ये रोजगारही मिळत आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘विदेशी भाषांमध्ये रोजगाराच्या संधी’ या विषयावर वसुंधरा समाज दर्पण अकादमीतर्फे २९ मार्चला सायंकाळी ६ वाजता निशुल्क परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्रनगरातील अरविंद अकादमी, यु-३१ रिंग रोड, नागपूर या ठिकाणी होणाऱ्या या परिसंवादात ज्येष्ठ समुपदेशक प्रा. युगल रायलू, डॉ. नितीन विघ्ने आणि प्रा. प्रीती छाब्रा यांची भाषणे होईल. यावेळी पॉवर पॉईंट प्रेझेटेशनही करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ नानासाहेब खारपाटे राहणार आहेत. हा परिसंवाद विद्यार्थी, त्यांचे पालक आणि व्यावसायिकांसाठी खुला आहे. परिसंवादात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व नोंदणीसाठी २८ मार्चपर्यंत अरविंद अकादमीच्या कार्यालयात किंवा ९९२२०६७१०५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विद्यापीठ अभ्यासक्रम अद्ययावत करणार, निकषही निश्चित
नागपूर, २५ मार्च/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासंदर्भात योग्य पावले उचलली जात असून विद्या विभागाने नवीन अभ्यासक्रमांसाठी काही निकष ठरवले आहेत.
विद्यापीठाच्या जुन्याच अभ्यासक्रमाच्या संदर्भात राज्याचे प्रधान सचिव सहारिया यांनी काही दिशादिग्दर्शन करून विद्यापीठांनी जुने अभ्यासक्रम बाजूला सारून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी साधम्र्य राखणारे अभ्यासक्रम तयार करण्याचे आवाहन केले होते. त्यादृष्टीने विद्यापीठात प्रक्रिया सुरू झाली असून विद्यापीठाच्या विद्या विभागाने या संदर्भात काही निकष ठरवले आहेत. मात्र, विद्यापीठातील इंटरनेट सुविधा, ग्रंथालय, विद्यापीठ अनुदान कायदा, विद्यापीठ कायद्यात वेळोवेळी झालेले बदल तसेच, अभ्यासक्रमात झालेले बदल याची दखल अभ्यास मंडळे घेत नाहीत. अभ्यासक्रम बदलल्यास नक्की काय बदल झाला, याची नोंद अभ्यासक्रम खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती पडत नाहीत. तेव्हा हे बदल विद्यार्थ्यांच्या लक्षात यावेत, यादृष्टीने अभ्यास मंडळांनी तयारी करावी आणि बैठकीत यासंदर्भात चर्चा करावी, असे कुलगुरूंचे म्हणणे पडले.