Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
नवनीत

जी व न द र्श न
आचार्य पूज्यपाद व आयुर्वेद

 

प्रथम र्तीथकर ऋषभनाथांनी (आदिनाथ) आयुर्वेदाची सुरुवात केली. त्यानंतर शेकडो जैनाचार्यानी त्यात भर घातली. प्रचंड संशोधन केलं. कन्नड, प्राकृत, अर्धमागधी, पाली, तमीळ, संस्कृत अशा अनेक भाषांमधून त्यांनी ग्रंथरचना केली आणि निरोगी जगण्याचा मंत्र, औषधी जगाला सांगितल्या. आ. पूज्यपाद यांनी इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिलेल्या ग्रंथांचा अतिशय महत्त्वपूर्ण उल्लेख अनेक आयुर्वेद-ग्रंथकारांनी केलेला आहे. त्यांनी ‘जैनेंद्र व्याकरण’ ‘समाधी तंत्र’, ‘सर्वार्थसिद्धि’, ‘जैन अभिषेक’, ‘सिद्धिप्रिय’ स्तोत्र व वैद्यसार हा आयुर्वेदावरील अमूल्य ग्रंथ लिहिला. सर्व प्रकारच्या वातरोगांवर उपयुक्त ‘अग्नितुंडी’ नावाचे औषध सर्वप्रथम त्यांनी शोधले. औषधांसाठी वृक्षांची तोड करू नये, ती हिंसाही होऊनये म्हणून समंतभद्र आचार्यानी वीस हजार फुलांपासून औषधं तयार करण्याचं तंत्र कन्नड भाषेत लिहिलं. त्याचा संस्कृत अनुवाद पूज्यपादांनी केला. मूच्र्छा, भ्रमरोग, कावीळ, प्रमेह, पित्तज्वर यावर, तसेच मृतसंजीवनीवटी, रंग गोरा करण्याची औषधी अशी कितीतरी औषधे शोधून त्यांनी वैद्य-सार हा ग्रंथ लिहिला. सर्वप्रथम त्यांनी माणसाला रोगच होऊनये यासाठी काही पथ्यं सांगितली व साधे-हलके अन्न खावे, संयमित खावे, मांसाहार करू नये आनंदी राहावे, दानधर्म करावा, कुठलेही काम विचारपूर्वक करावे, विषयवासनेत फसू नये, संयम पाळावा, शृंगारिक दृश्ये पाहू नयेत, वासना चाळवतील असे अश्लील साहित्य वाचू नये, पाच व्रतांचे (अहिंसा, सत्य, अचौर्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य) पालन करावे, क्षमाभाव धारण करावा, मन:शांती ढळू देऊनये, निष्कपटी असावे, कुणाशीही वैर करू नये, मृदू बोलावे.. म्हणजे रोगच होणार नाही. हा मंत्र अगदी हजारो वर्षांपूर्वी ऋषभनाथांनी सांगितला. तोच त्यांच्या अनुयायांनी सांगितला. किशोरवयात त्यांनी एका बेडकाला साप गिळतोय हे दृश्य पाहिलं, तेव्हाची ती बेडकाची तडफड बघून त्यांना एकदम वैराग्य आलं. जीवन असं क्षणभंगुर असतं म्हणत त्यांनी नग्न दीक्षा घेतली. पुढे जीवनभर अनेक विषयांवर, अध्यात्मावर ग्रंथ लिहिले. ‘वैद्यसार’ हा आयुर्वेदावरील मौल्यवान ग्रंथ त्यातलाच एक!
लीला शहा

कु तू ह ल
जीवसृष्टी
विश्वात इतरत्र जीवसृष्टी सापडण्याची शक्यता आहे का? ही शक्यता किती असावी हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे का?

इतरत्र जीवसृष्टी असली तरी तिच्यापर्यंत पोचणे हे ताऱ्यांमधील प्रचंड अंतरांमुळे आज तरी अशक्य आहे. त्यामुळे विश्वात इतरत्र जीवसृष्टी शोधताना फक्त अशा प्रगत जीवसृष्टींचा विचार केला गेला आहे की, ज्या दुरून रेडिओलहरींच्या प्रक्षेपणामार्फत आपल्याशी संवाद साधू शकतील. यासाठी ती जीवसृष्टी मानवाइतकी किंवा त्याहून प्रगत असावी लागेल. विश्वात अशा प्रगत जीवसृष्टींच्या संख्येचा अंदाज देणारे गणिती सूत्र फ्रँक ड्रेक या संशोधकाने १९६० साली मांडले व त्यानंतर अशा जीवसृष्टींचा शोध घेणारी सेटी प्रकल्प सुरू झाला. मात्र अजूनतरी आपल्याला एकच जीवसृष्टी माहीत आहे, ती म्हणजे पृथ्वीवरची!
ड्रेकच्या सूत्राप्रमाणे जीवसृष्टीयोग्य ताऱ्यांचा निर्मितीचा वेग, या ताऱ्यांभोवती ग्रहमालांच्या निर्मितीची शक्यता, ग्रहमालांमधील वसतियोग्य पट्टय़ांमधील ग्रहांची संख्या, अशा ग्रहांवर जीवसृष्टी तयार होण्याची शक्यता, अशा जीवसृष्टी प्रगत होण्याची शक्यता, या प्रगत जीवसृष्टींनी अंतराळात प्रक्षेपण करण्याची शक्यता व प्रक्षेपण करत राहण्याचा कालावधी या सात संख्यांचा गुणाकार म्हणजे प्रगत संस्कृतीची संख्या. या सात संख्यांपैकी दोन संख्या आपल्याला माहीत आहेत. आपल्या दीर्घिकेत साधारणपणे प्रतिवर्षी तीस तारे निर्माण होतात व यातील एकतृतीयांश ताऱ्यांभोवती ग्रह असू शकतात. ड्रेकच्या सूत्रातल्या इतर संख्यांचा नक्की अंदाज आपल्याला नाही. मात्र सध्या घेतल्या जाणाऱ्या परग्रहांच्या शोधावरून तो लवकरच मिळेल. खुद्द ड्रेकच्या १९६१ सालच्या अंदाजाप्रमाणे आपल्या दीर्घिकेत दहा तरी प्रगत संस्कृती असू शकतील. इतर अनेक संशोधकांना काही तार्किक
कारणांमुळे हे अंदाज पटत नाहीत. अर्थातच नवीन शोधांमुळे अजून अचूक अंदाज मिळू शकतील.
सुजाता देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
जेम्स हटन

जेम्स हटन यांच्याकडे भूगर्भशास्त्राच्या अभ्यासाचे जनकत्व दिले जाते. जेम्स हटन यांचा जन्म ३ जून १७२९ रोजी स्कॉटलंड येथे झाला. पेशाने डॉक्टर असूनही ते शेती करत. अठरावे शतक उजाडले तरी अजूनही भूशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास झाला नव्हता. वेर्नर या प्राध्यापकाने याच काळात पृथ्वीच्या स्वरूपाबाबतचा सिद्धांत सांगितलेला होता. या सिद्धांतानुसार सागरतळी खडक निर्माण झाले. मुख्य म्हणजे हा सिद्धांत तेव्हा प्रचलित होता. जेम्स हटन यांनी या सिद्धांताला मूठमाती देण्याचे ठरविले. खडकांचा अभ्यास करून त्यांनी असे सांगितले की, खडक सागरतळी नसून ग्रेनाईट हा पृथ्वीवरचा प्राचीन खडक असून, तो थंड झालेल्या शिलारसापासून तयार झाला. खडकांचा अभ्यास करताना त्याच्या असे लक्षात आले की, ऊन, वारा, पाऊस यामुळे खडकाची झीज होते. ही प्रक्रिया लाखो वर्षे चालत राहिली असेल तर भूभागही बदलतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी असेही मत मांडले की, सागरतळी जमलेले अवसाद दबले जाऊन उच्च तापमानामुळे भूपृष्ठावर येतात. थंड होताच त्यांच्यात ज्या भेगा पडतात त्यात शिलारस घुसतो व थंड होतो आणि मग नव्या भूभागाची प्रस्थापना होताच त्यावर नैसर्गिक प्रक्रिया चालू होते. यानंतर ऊन, वारा, पाऊस यांनी पुन्हा त्या खडकांचा भुगा होतो. ही प्रक्रिया युगानुयुगे चालू असल्याने पृथ्वीचे वय प्रचंड आहे. यावर आधारित पृथ्वीच्या वयाचा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यावर त्यांनी ‘थिअरी ऑफ दि अर्थ विथ प्रुप्स अँड इलेस्ट्रेशन’ हे पुस्तक लिहिले. हटन यांच्या योगदानामुळेच खनिज व पुराजीवशास्त्र जन्माला आले. दिनांक २६ मार्च १७९७ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
मधुरिमाचा आनंद

मधुरिमा पोहण्याचा वर्ग संपवून घरी आली होती. थकून कोचावर बसलेल्या मधूला समोरच्या काचेच्या शोकेसमध्ये ओळीने लावून ठेवलेली तिची गेल्या तीन वर्षांतली पोहण्याच्या विविध स्पर्धेतली पदके दिसली. त्यांच्याच पलीकडे आणखी एका शोकेसमध्ये तिची कराटेमध्ये मिळालेली पदके दाटीवाटीने उभी होती. थकलेल्या मधूला आवराआवरी करून शाळेत जायचे होते. परीक्षेतही नेहमीच तिचा नंबर पहिल्या पाचात असायचा. आई कौतुकाने शीलाआत्याला सांगत होती की, ‘गाण्याच्या वर्गात मधूने अगदी कमालच केली. अहो, कुमार गंधर्वाची निर्गुणी भजने गाऊन तिने ‘स्वरराज’ संगीत स्पर्धेत पहिला नंबर मिळवला. माझं स्वप्न होतं लहानपणी गायिका होण्याचं ते मधूनं पूर्ण केलं.’ आईचा आवाज बोलताना भावनांनी कापरा झाला. नववीची परीक्षा जवळ आली होती. अभ्यासाचं दडपण मधूच्या मनावर खूप होतं. त्यात पोहण्याच्या स्पर्धा, गायनाची तालीम आणि कराटेचा सराव; कुठेच स्वत: कमी पडू नये यासाठी ती धडपडत होती. तिचा सगळा दिवस कधी संपतो तिला कळायचं नाही. रात्री अंथरुणावर कधी पडते असं होऊन जायचं. शरीर इतकं थकायचं की, काही त्राणच उरायचं नाही दिवस संपेपर्यंत आणि या सगळय़ा ओढाताणीचा मनावर प्रचंड ताण येऊन डोकं बधिर होऊन जायचं. तरी मधू जिद्दीनं सगळं रेटत होती. कराटे हा बाबांचा प्रिय विषय. बाबांची इच्छा होती की, तिनं भारतीय पातळीवर कराटेत नैपुण्य मिळवावं. तिला स्वत:ला ‘धरमतर’ खाडी पोहून जाण्याची जबरदस्त इच्छा आणि ईर्षां होती. राहिला अभ्यास. तो करून नंबर आणला नाही तर फारच लाजीरवाणी गोष्ट होती. एके दिवशी संध्याकाळी घरी येऊन मधू अभ्यासाला बसली. ती काय वाचतेय त्याचा अर्थच तिला कळत नव्हता. डोकं भणभणायला लागलं. तिला अचानक खूप रडू यायला लागलं. समोरच्या काचेच्या शोकेसवर एक दणका देऊन ती फोडून टाकावी आणि स्पर्धेतली सगळी पदके खिडकीतून रस्त्यावर फेकावी वाटायला लागलं. आपल्याला नक्की काय होतंय तिला कळेना. दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून ती ढसढसा रडायला लागली.कोलकात्याहून आलेली तिची बाबीआत्या गेले काही दिवस तिचा दिनक्रम, ओढाताण बघत होती. एवढय़ाशा जिवावर काय काय लादलं गेलंय म्हणून हळहळत होती. रडणाऱ्या मधूला जवळ घेऊन ती म्हणाली,‘‘मधुरिमा, तुला रसगुल्ले आवडतात ना? आज शाळेला आणि सगळय़ा क्लासना बुट्टी मार. आपण रसगुल्ले करूया. ‘खुशी’ कुत्रीला अंघोळ घालूया आणि संध्याकाळी तिला घेऊन बागेत फिरायला जाऊया.’’ त्या दिवशी मधू इतकी आनंदात होती की, काही विचारूच नका. एकावेळी अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. कधी स्वत:ची इच्छा म्हणून, तर कधी इतरांची इच्छा म्हणून. मग आपल्या क्षमतेपेक्षा आपण जास्त कष्ट घेत राहतो. परिणामी आपला मेंदू आणि शरीर दोन्ही थकतं. अशा वेळी नेहमीच्या धावपळीपासून एखादा दिवस दूर राहिलं तर तुमच्या मनाला, बुद्धीला व शरीराला विश्रांती मिळेल. नव्या जोमाने पुन्हा पूर्वीचे उद्योग सुरू करता येतील. आजचा संकल्प : मी आवडीची एखादी साधीसोपी गोष्ट करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com