Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

राजकीय गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’
नवी मुंबई/प्रतिनिधी-
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवी मुंबईतील असल्याने शहर पोलिसांची डोकेदुखी मोठय़ा प्रमाणावर वाढली असून, निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत ऐरोली व बेलापूर हे विधानसभेचे दोन मतदारसंघ मोडतात. यापैकी ऐरोली मतदारसंघ संवेदनशील मानला जात असल्याने या भागात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे. विशेषत: काही राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांना जेरबंद करण्याची तयारीही पोलिसांनी सुरू केली आहे.

जेएनपीटी ट्रस्टींचा सत्कार
उरण/वार्ताहर :
येथील जवाहरलाल नेहरू पोर्टच्या ट्रस्टींची दोन वर्षांची मुदत संपुष्टात आली असल्याने त्याच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. केंद्रीय नौकानयन विभागाचे सेक्रेटरी एपीव्हीएम सर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ट्रस्टींना स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. जवाहरलाल नेहरू बंदरातील १८ ट्रस्टींचा २००७ ते २००९ या दरम्यानचा दोन वर्षांंचा कालावधी संपुष्टात आला. या दोन वर्षांंत कार्यरत असलेल्या १८ ट्रस्टींना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये जेएनपीटीच्या विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून सहकार्य केल्याबद्दल जेएनपीटी चेअरमन यांनी ट्रस्टींचे आभार मानले. उपस्थित ट्रस्टींना नौकानयन विभागाचे सेक्रेटरी सर्मा यांच्या हस्ते स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रेल्वे ट्रान्सपोर्टचे चिफ सेक्रेटरी एन. जैन, वरिष्ठ आयएसआय, आयपीएस, जेएनपीटी, मुख्य प्रबंधक शिबैन कौल व इतर विविध विभागांचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

हजार सीसीच्या वाहनांना पर्यटक वाहन परवानगी देण्यावर बंदी
बेलापूर/वार्ताहर :
हजार सीसी (इंजिन क्षमता) व त्यापेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या वाहनांना पर्यटक वाहन म्हणून परवाना देण्यास शासनाने बंदी घातल्याची माहिती नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे अशा प्रकारचा परवाना घेऊन एकरकमी मोटार वाहन कर भरल्यास मिळणारी सूट व उत्पादन शुल्कात मिळणारी सवलत यांचा गैरफायदा घेणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. शासनाने १९९७ साली मोटार वाहन अधिनियम १९८८ ची पूर्तता करणाऱ्या वाहनांना पर्यटक वाहन म्हणून परवाना देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काळाच्या ओघात थोडासा खिशात पैसा खळखळू लागल्याने जो तो अडीच-तीन लाखांची एखादी दुसरी गाडी घेऊन कॉल सेंटर व तत्सम कंपन्यांना चिकटवू लागला, तसेच या गाडय़ा टप्पा वाहतुकीतही वापरल्या जाऊ लागल्याने स्थानिक स्तरावर टप्पा वाहतूक करणाऱ्या टॅक्सी व रिक्षा यांची अडचण होऊन बसली. त्याबाबत अनेक रिक्षा व टॅक्सीचालक संघटनांनी वारंवार शासन दरबारी पत्रव्यवहार केला होता. अखेर शासनाने याची दखल घेत मागील महिन्यात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एक हजार सीसीच्या व त्यापेक्षा जास्त सीसीच्या वाहनांना (उदा. टाटा इंडिका, सेंट्रो, टाटा मॅजिक, मारुती आदींना) पर्यटक वाहन म्हणून परवाना देण्यावर बंदी घालण्यात आली. अशा प्रकारची वाहने थेट प्रवासी वाहतूक कंपन्या किंवा मोठी हॉटेल्स यांच्या नावे नोंदीत असतील, तरच त्यांना पर्यटक परवाना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अशा प्रकारचा परवाना घेऊन शासनाचा कर बुडवून गाडय़ा खासगी वापरासाठी वापरल्या जात होत्या. त्यावर आता बंधन येऊन उपरोक्त परवानाधारक गाडय़ांना केवळ पर्यटकांचीच वाहतूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन पनवेलमध्ये दवाखान्यावर दरोडा;
५८ हजारांचा ऐवज लंपास
पनवेल/प्रतिनिधी :
नवीन पनवेलमधील सेक्टर सहा येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. नरेंद्र गोविंद नाईक यांच्या नचिकेत क्लीनिकमध्ये मंगळवारी रात्री चार तरुणांनी दरोडा टाकून ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. नवीन पनवेलच्या एका टोकाला काहीशा ओसाड भागात असणाऱ्या या क्लिनिकमध्ये २४ ते २७ वयोगटातील चार तरुण पोटदुखीचा बहाणा करून आत शिरले. यावेळी डॉ. नाईक एकटेच होते. या चौघांनी डॉक्टरांना दमदाटी व मारहाण करून नोकिया मोबाइल, मंगळसूत्र, दोन नथी आणि ४० हजार रुपये रोख असा एकूण ५८ हजार रुपयांचा माल लंपास केला. डॉक्टरांनी रात्री साडेनऊ वाजता या चौघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या आरोपींवर गुन्हा दाखल केला. डॉक्टरांनी केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी या चौघांचे रेखाचित्र काढले असून, त्याआधारे पुढील तपास चालू आहे.

तुर्भे येथे डंपरच्या अपघातात दोन ठार, एक जखमी
बेलापूर/वार्ताहर :
भरधाव वेगातील डंपरने रस्त्यावरील पादचाऱ्यांना ठोकर मारल्याने तुर्भे येथील दगडखाण परिसरात झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली. या अपघातात एक १० वर्षांंची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. वनिता नवले (३२), उषा गवसे (३३) असे या अपघातात मृत पावलेल्या महिलांचे नाव असून, आशा गवसे (१०) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. वनिता व उषा येथील एका सामाजिक संस्थेत काम करीत असून, दगडखाण परिसरातील कामगारांच्या मूलभूत गरजा व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या या परिसरात येत असत. काम संपून घरी परतत असताना अंबे दगडखाणीच्या रस्त्यावर हा अपघात झाला. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, फरार डंपरचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.