Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

वाहतूक प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधी थंड
प्रतिनिधी / नाशिक

विविध महामार्गाद्वारे शहरातून मार्गस्थ होणाऱ्या मालमोटारी व खासगी वाहनांमुळे वाढलेला ताण, द्वारका चौकातील अभूतपूर्व कोंडी, शालीमार व मायकोसारख्या अनेक चौकांच्या आकारामुळे अंतर्गत वाहतुकीस उपलब्ध होणारी कमी जागा, अर्धवट स्थितीत राहिलेले गंगापूर रस्त्याचे दुहेरीकरण, लुप्त होऊ लागलेले पदपथ.. नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न बिकट बनविणारी ही काही प्रातिनिधीक उदाहरणे म्हणता येतील. वाहतुकीच्या छोटय़ा-मोठय़ा प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्या सोडविणे फारसे अवघड नाही. परंतु, त्याकरिता लोकप्रतिनिधी, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस यंत्रणा अशा सर्वानी संयुक्तपणे काम करणे आवश्यक आहे. आज द्वारका, मुंबईनाका, इंदिरानगर, राजीवनगर, आडगाव नाका, अमृतधाम परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना अक्षरश जीव मुठीत धरून राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो. जिथे नागरिकांची अशी अवस्था होत असेल तर तिथे शाळकरी विद्यार्थ्यांचे काय, याचा विचार केला जात नाही.

कृषी कर्जमाफी योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ
नाशिक / प्रतिनिधी

कृषी कर्जाची व्याजासह एकरकमी परतफेड केल्यास राज्य सरकारच्या २० हजार पर्यंतच्या कृषी कर्ज सवलतीस पात्र होण्यासाठी सहकारी संस्था व बँकांमार्फत नोटीस पत्र पाठविले जात आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, गहु पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे या कृषी कर्जमाफीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. गारपिटग्रस्तांना दिलासा देण्याच्या उद्देशाने दुगाव येथे आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांनी ही भावना व्यक्त केली.

कळवणमध्ये राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांच्या भूमिकेला महत्त्व
नाशिक / प्रतिनिधी

युती असो वा आघाडी, प्रत्येक मतदार संघात कोणत्यातरी एका गटाकडून नाराजीचा सूर लावण्यात येत असताना दिंडोरी मतदार संघही त्यास अपवाद नाही. राष्ट्रवादीने आ. नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी दिल्यानंतर कळवणचे आ. ए. टी. पवार समर्थक नाराज झाले असले तरी स्वत: पवार यांनी मात्र पक्षाचा निर्णय आपणास मान्य असल्याचे सांगितल्याने नाराज समर्थक कोणती भूमिका घेतात, याकडे राष्ट्रवादीचे लक्ष आहे. युतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नांदगाव, कळवणनंतर निफाड, ओझर, पिंपळगाव या परिसरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे सुरू केले आहे.

बाबुराव बागूल स्मृतिदिनी विविध कार्यक्रम
प्रतिनिधी / नाशिक

विद्रोही साहित्यिक बाबुराव बागूल यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘रिपब्लिकन पँथर्स जाती अंताची चळवळ’ या सामाजिक संघटनेच्यावतीने येत्या २७ तारखेला बाबुराव बागूल अभिवादन सभा, शाहिरी जलसा व कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे निमंत्रकर विजय बागूल यांनी दिली. या दिवशी सकाळी ९ वाजता विहितगाव बौद्ध विहार येथे अभिवादन सभा होणार असून सभेस प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी सेवा संघाचे राज्य सचिव प्रा. श्रावण देवरे, साहित्यिक नंदकिशोर साळवे, बाबुराव बागुलांच्या कन्या प्रा. शोभा बागूल उपस्थित राहणार आहेत. मुख्य सभेनंतर नाशिक शहरातील वडाळागाव येथे सकाळी ११ वाजता, राजीवनगर येथे दुपारी १२.३० वाजता, गौतमनगर येथे दुपारी १.३० वाजता छोटेखानी अभिवादन सभा व शाहिरी जलशाचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कवी कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारक येथे कवी संमेलन होणार आहे. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

नाशिक फिजिशिअन्स असोसिएशन अध्यक्षपदी डॉ. नारायण देवगावकर
नाशिक / प्रतिनिधी
नाशिक फिजिशियन्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऱ्हदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. नारायण देवगावकर यांची अविरोध करण्यात आली आहे. १२५ पेक्षा जास्त सदस्य असलेल्या या संघटनेची नुकतीच एमराल्ड पार्क मध्ये बैठक झाली. देवगावकर हे गेली २५ वर्षे शहरात कार्यरत असून हृदयविकार, मधुमेहाशी संबंधित २५ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम केले आहे. डायबेटीक क्लब सारखे अनेक अभिनव उपक्रम ते रुग्णांसाठी सातत्याने राबवित आहेत. या सर्व कामाची दखल घेऊन संघटनेच्या सर्व सदस्यांनी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. डॉ. राहूल पाटील (सरचिटणीस), डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. माधुरी किर्लोस्कर (उपाध्यक्ष), डॉ. रमेश पवार (सहसचिव), डॉ. रामदास डुंबरे, डॉ. समीर शहा (खजिनदार) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.