Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

श्रेष्ठ काय, ज्येष्ठत्व की कर्तृत्व?
नंदूरबार मतदारसंघासाठी काँग्रेसकरवी अपेक्षेनुसार माणिकराव होडल्या गावित यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. नंदूरबार हा जिल्हा आदिवासीबहुल. पर्यायाने सुरुवातीपासून हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव. काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून देशात ज्या काही मोजक्या मतदारसंघाचा आवर्जून उल्लेख होतो त्यात नंदूरबारचा क्रमांक वरचा. देशात कोणतीही लाट आली, राजकीय प्रचंड उलथापालथ झाली अथवा वारे कोणत्याही विशिष्ट दिशेने जोराने वाहत असले तरी त्याचा तसूभरही परिणाम येथील मतदारांवर होत नाही, असा आजवरचा सार्वत्रिक अनुभव.

‘दाखवायचं’ काम
भाऊसाहेब : काय म्हन्तो परचार, भावराव..
भाऊराव : उमेदवारांची घोषणा झाल्यावर लगोलग प्रचाराला सुरूवात झाली आहे. भेटीगाठींचा धडाका सुरू आहे.
भाऊसाहेब : हां, आता म्हैना बी न्हाई उरला, तवा लोकांन्ला भेटाया पायजेच.
भावडय़ा : पण, सध्या लोकांना भेटण्यापेक्षा आपल्याच पक्षातल्या मंडळींना भेटण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतोय.
भाऊसाहेब : त्ये का?
भाऊराव : नाराजी दूर करायला.
भाऊसाहेब : अजूनबी हायच का त्ये झेंगाट..

‘राज्यघटना व कायद्याचे ज्ञान हवे’
लोकसभेसारख्या सर्वोच्च प्रतिनिधीगृहात आपला प्रतिनिधी पाठविताना मतदारांनी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा व अभ्यासू तर असावाच पण देशपातळीवर ज्या समस्या आहेत, त्यांची जाण या प्रतिनिधीला असलीच पाहिजे. देशाची आर्थिक व्यवस्था, सामाजिक परिस्थिती बाबत तर त्याला पुरेशी माहिती हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकसभेद्वारे वेगवेगळे कायदे अस्तित्वात येतात, म्हणून प्रत्येक सभासदाला कायद्याचे ज्ञान, राज्यघटनेतील तरतुदींचा अभ्यास व अर्थशास्त्राबाबत माहिती असली पाहिजे.

औद्योगिकरणाबाबत घोषणांचा कोरडा पाऊस!
प्रश्न जिव्हाळ्याचे
वार्ताहर / धुळे
औद्योगिक विकास होत असला किंवा नसला तरी एकामागून एक घोषणा केल्या की जनता, उद्योजक व त्या-त्या भागातले नेतेही आपसूक जोडले जातात. या तंत्राचा वापर करून थेट मालेगावपासून ते नंदुरबापर्यंतच्या पट्टय़ातील राजकीय नेत्यांनी आपले बलस्थान मजबूत राखण्यात आजवर यश मिळवले आहे. या राजकीय इतिहासाची अनुभूती गेल्या चार दशकांतील अयशस्वी औद्योगिकीकरणातून येऊ शकते.

आदर्शचा वसा जपणारे दोंडवाडे गाव
दत्ता वाघ / शहादा

प्रत्येक शासकीय योजनेच्या अंमलबजावणीस भरभरून प्रतिसाद देतानाच योजनेतील विचारांचा गाभा ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचा मनापासून प्रयत्न करण्यात येणारे गाव म्हणून तालुक्यातील दोंडवाडे या तापी नदीकाठावरील गावाची ओळख झाली आहे. या लहानशा गावाने अनोखे परिवर्तन घडवून सुसंस्कृत व सुदृढ विचाराची पिढी निर्माण करण्याचा चंग बांधलेला आहे. कोमलसिंग गिरासे यांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांचीही साथ लाभत आहे. स्वच्छता, आरोग्य या संकल्पना प्रत्यक्षात राबवून आता महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात समरस होऊन गावात शांतता, सलोखा व एकता प्रस्थापित करण्याबरोबरच प्रामाणिकपणाही जपला आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेचा ‘फार्स’पुन्हा जैसे थे परिस्थिती
जळगाव / वार्ताहर

गेल्या १२ मार्चपासून शहरात प्रभावीपणे राबविण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम वास्तवात केवळ एक फार्स असल्याचे दिसू लागले असून अनेक ठिकाणी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहिम आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या आदेशान्वये सुरू झाली.

व्यक्तिमत्त्व विकास - २१
सौंदर्याची व्याख्या

माणूस जन्माला येतो तेव्हा दोन गोष्टी उपजत घेऊन येतो. एक म्हणजे त्याचे रूप आणि दुसरे त्याचे व्यक्तिमत्त्व. रूपाचे देखणेपण आपल्या हातात नसले तरी नीटनेटकी, आकर्षक राहणी, रूपाला शोभेसा पेहराव आणि हसतमुख राहण्याची वृत्ती हे त्या रूपाला अधिक आकर्षक बनवते. व्यक्तिमत्त्वातले काही गुणदोष आपल्या आई-वडिलांकडून आपल्याला मिळतात. पण ‘स्वभावाला औषध नाही’ ही म्हण तितकीशी खरी नाही. आपली वैचारिक क्षमता आपल्या उत्तम वाचनाने, सुसंगतीने वाढू शकते.

जळगावमध्ये भाजपच्या मदतीला राष्ट्रवादीचे असंतुष्ट
घडामोडी
जळगाव, अमळनेर / वार्ताहर

अपेक्षेप्रमाणे जळगाव लोकसभा मतदार संघासाठी अखेर भाजपने आयात केलेल्या ए. टी. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने राष्ट्रवादीचे मूळ असलेल्या दोन उमेदवारांमध्येच मुख्य लढत होणार आहे. क्रांती सेनेसह बसपनेही रिंगणात उतरण्याचे जाहीर केल्याने सध्या तरी चौरंगी लढत अटळ आहे.

घरफोडी प्रकरणी पाच संशयितांना पोलीस कोठडी
येवला / वार्ताहर

शहरातील एका घरफोडी प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली असून संशयितांना येवला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
येवला बसस्थानका जवळील दीपकिरण फोटो स्टुडिओमधून ४ मार्च रोजी संगणक, कॅमेरा, मोबाईलफोन, सीम कार्ड असा १ लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची फिर्याद दीपक खरे यांनी येवला शहर पोलिसात दिली. दरम्यान, पिंटू परदेशीने सदर मोबाईल सीम कार्ड जामनेर येथे विकले असल्याची माहिती नाशिक क्राईम ब्रँचने मिळविली. पोलीस तपासात फारूक शेख, युनुस कासम शेख यांना ताब्यात घेण्यात आले. चोरीचा माल संशयितांनी निजाम शेख कमरुद्दीनकडे लपविला होता. शिवाय या घरफोडीतील वस्तू असलेली बॅग रामचंद्र जाधव यांच्या बुरूडगल्लीतील दुकानात पोलिसांनी मिळाली. घरफोडी प्रकरणातील मुख्य संशयित पिंटू तथा प्रल्हाद परदेशी, फारूक शेख, युनूस शेख यांच्यासह चोरीचा माल विकत घेतल्याच्या कारणावरून निजाम शेख कमरुद्दीन व रामचंद्र जाधव आदी पाच जणांनी येवला शहर पोलिसांनी अटक केली.

रिक्षा अपघातात महिला ठार
शहादा / वार्ताहर

शहादा ते धडगाव रस्त्यावर पिंपरी फाटय़ानजीक अ‍ॅपेरिक्षाची सायकलस्वरात धडक बसल्याने रिक्षा उलटून त्यात एक महिला जागीच ठार तर दोन महिला जण जखमी झाल्याची घटना घडली.
जिगूबेन भरवाड (४५, रा. चिखली) हे मृत्यू झालेल्या महिलेचे आहे तर रेणूबाई पवार व शामीबाई शेमळे या दोन महिला जखमी झाल्या. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.