Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
विशेष

..आता नुकसानभरपाई देण्याची तयारी!
अण्वस्त्रधारी राष्ट्रांमध्ये फ्रान्सचा समावेश फार पूर्वीपासून आहे. अणुतंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापर करण्याच्या हेतूने अमेरिका, रशियाप्रमाणे फ्रान्सनेही मोठय़ा प्रमाणात अणुचाचण्या केल्या होत्या. १९६६ ते १९९६ या ३० वर्षांच्या कालावधीत फ्रान्सने २०० च्या आसपास अणुचाचण्या केल्या. या अणुचाचण्या अल्जेरिया आणि फ्रेंच पोलीनेशियामध्ये करण्यात आल्या. फ्रान्सने केलेल्या अणुचाचण्यांमुळे सुमारे दीड लाख लोकांना विविध दुर्धर आजारांनी ग्रासले आहे. अणुचाचण्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लष्करी आणि नागरी कर्मचाऱ्यांचा यामध्ये अंतर्भाव आहे.

बेरीज-वजाबाक्यांची गणितं आणि खडाखडी
एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, काकासाहेब गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ अशा देश गाजविलेल्या, राजकारणाबरोबरच देशाच्या सामाजिक इतिहासाची काही पाने लिहिणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना निवडून आणणारा मतदारसंघ म्हणून पुणे मतदारसंघाची ओळख आहे. तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पुणे मतदारसंघ असला तरी केवळ लाटेत वाहत न जाणारा, विचारशील असा मतदार पुण्यात असून त्यामुळेच येती निवडणूकही रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोव्याच्या कर्तृत्वशालिनी

गोव्याची राजधानी पणजीतील धेंपो हाऊसमधले प्रेक्षागृह गर्दीने फुलून गेले होते; पण आज इथली गर्दी नेहमीसारखी देशी-परदेशी तंत्रज्ञ, राजकारणी, उद्योगपती वा उद्योजकांची नव्हती निमित्त होते गोव्याच्या कर्तृत्वशालिनी महिलांच्या गौरव समारंभाचे व सिद्धहस्त लेखिका माधवी देसाई यांनी या महिलांवर लिहिलेल्या, कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘सूर्यफुलांचा प्रदेश’ व ‘स्वयंसिद्धा आम्ही’ (माणिक प्रकाशन, कोल्हापूर) या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोव्यातील तरुण उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांनी या समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारून या सर्व महिलांचा सत्कार सोहळा आयोजित केला हे विशेष ज्येष्ठ रंगकर्मी व बाल रंगभूमीच्या प्रणेत्या सुलभा देशपांडे व संगीत विशारद- निर्मात्या- दिग्दर्शक- लेखिका मधुरा जसराज या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आवर्जून उपस्थित होत्या. सुलभा देशपांडे, मधुरा जसराज आणि नीलाताई धेंपो यांच्या हस्ते ‘सूर्यफुलांचा प्रदेश’, तसेच त्याचे इंग्लिश भाषांतर ‘द लॅण्ड ऑफ सनफ्लावर्स’ (शिवशैल प्रकाशन, गोवा) व ‘स्वयंसिद्धा आम्ही’चे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. वयाच्या ७६ व्या वर्षी गोव्याच्या कर्तृत्वशालिनी महिलांच्या कार्याची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याचा प्रकल्प मोठय़ा जिद्दीने पार पाडणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिका माधवी देसाईंनी आपली भूमिका विषद करताना म्हटले, ‘वय साथ देत नसताना हे धाडस मी करू शकले ही त्यामागे आहे त्या आदिमातेची प्रेरणा व तुम्हा सर्व गोमंतकन्यांची स्फूर्तिदायक यशोगाथा. गोमंतभूमीतल्या कुटुंबातल्या स्त्रीला पुरुषप्रधान संस्कृती असूनही नेहमी मान देण्यात आला आहे. देवदासीची अनिष्ट प्रथा कायद्याने प्रथम बंद केली गेली ती गोव्यात गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथल्या स्त्रीला शिक्षण मिळाले, करिअर करून अर्थार्जन करण्याच्या अनेक वाटा खुल्या झाल्या. पारतंत्र्यातल्या गोव्यात स्त्रिया दिवसाउजेडी पडायला घाबरत विकास करून घेण्यासाठी गोव्यातली कुटुंबे मुंबई-पुण्याकडे स्थलांतरित होत होती; पण आता चित्र बदलले. इथली स्त्री शिक्षणामुळे समर्थ, स्वावलंबी झाली; पण केवळ करिअर, कमाई करून वैयक्तिक विकास साधण्यापुरते मर्यादित ध्येय न ठेवता ती कायदा, सुरक्षा, राजकारण, प्रशासन, कलाशिक्षण, तसेच सामाजिक विकासाच्या क्षेत्रात उतरली. ग्रामीण भागातल्या अल्पशिक्षित महिलांनी ‘बायल्यांचो साद’सारख्या विविध संघटना उभारल्या, बचत गटांची बांधणी करून उद्योग व समाजसेवी उपक्रम सुरू केले. त्यांचे प्रातिनिधिक चित्रण केल्याशिवाय हा ग्रंथ पूर्ण झाला नसता म्हणून ‘स्वयंसिद्धा..’मध्ये त्यांची दखल घेणे गरजेचे ठरले. यासाठी श्रीनिवास धेंपो यांनी दिलेल्या भरीव आर्थिक पाठबळाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. मधुरा जसराज यांनी महाराष्ट्रीय मातीत जन्मलेल्या पण गेली अनेक वर्षे गोव्यातील बांदिवडे इथे महालक्ष्मी मंदिराच्या सान्निध्यात वास्तव्य करून स्थानिक जनजीवन व गोमंतकीय संस्कृतीशी एकरूप झालेल्या आपल्या बहिणीचे, माधवीताईंचे अभिनंदन केले. आपल्या भावपूर्ण भाषणात त्यांनी ग्रंथाची शक्तिस्थळे विशद करताना त्यातून सतत उलगडत जाणारा गोमंतकाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक पाश्र्वभूमीचा पट स्त्रियांची अभ्यासपूर्ण व उठावदार व्यक्तिचित्रणे, तसेच माधवीताईंच्या सुभाषितमय भाषाशैलीचे विशेष स्पष्ट केले, तसेच पुस्तकातले काही उतारेही वाचून दाखवले. सुलभाताई देशपांडेंनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना अशा प्रकारच्या स्त्रियांच्या कार्याची नोंद घेणाऱ्या ग्रंथांचे महत्त्व स्पष्ट केले. श्रीमती नीला धेंपो, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांचीही समचोचित भाषणे मराठीतूनच झाली हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ मानावे लागेल. प्रसिद्ध चित्रकार हर्षदा केरकर, सोनिया रॉड्रिग्ज-सभरवाल, राष्ट्रपतीपदक विजेत्या डीवायएसपी नॉर्मा टॉरॅकॉट्टो, पोलीस ऑफिसर्स मारिया मोन्सेरात, एॅनी गळतगे, कर्तव्यदक्ष सरकारी वकील सरोजिनी सार्दिन, गोव्याच्या पहिल्या महिला खासदार संयोगितादेवी राणे, आमदार समाजसेविका संगीता परब, ज्येष्ठ राजकारणी- समाजसेविका फिलिप्स फारिया, आदर्श माता सरस्वती पार्सेकर, समाजसेवी डॉक्टर ललना बखले, पर्वतांवर हल्ला करणाऱ्या क्रशर्सविरुद्ध लढय़ाचे नेतृत्व करणाऱ्या छाया गवस, नामवंत तियात्र आर्टिस्ट फातिमा अनिल अशा विलक्षण जीवन जगलेल्या, गोमंतकन्यांचा सन्मानचिन्ह व पुस्तकांचा संच देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रचला आगोणकर यांनी पसायदान सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.