Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

गुढीपाडव्यासाठी नक्षी आणि आरसे लावलेल्या गाठी बाजारात आल्या असून त्या लक्ष वेधून घेत आहेत.

विद्यापीठाचा अर्थसंकल्प आचारसंहितेच्या कचाटय़ात
पुणे, २५ मार्च/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका पुणे विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई विद्यापीठाप्रमाणेच न्याय लावला, तर अंदाजपत्रक, नवीन महाविद्यालय-अभ्यासक्रमाचा प्रस्ताव वा राज्यातील मतदाराला प्रभावित करू शकेल, असा कोणताही निर्णय अधिसभेच्या माध्यमातून जाहीर करता येणार नाही! मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीस आजपासून प्रारंभ झाला. त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आचारसंहितेचा अधिसभेवर काय परिणाम होईल, अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर मुंबईचे उपजिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी एस. एम. भागवत यांनी १९ मार्च रोजी उत्तर दिले आहे.

पुणे पॅटर्नचे काय?
लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आज मंजूर झाला खरा. पण हा ठराव होत असतानाच आता ‘पुणे पॅटर्न’चे काय, असा प्रश्न उपस्थित करून अनेकांनी नेत्यांची भंबेरी उडविली. महानगरपालिका निवडणुकीत ‘दादां’च्या आदेशानुसार आम्ही कलमाडींच्या विरोधात काम केले. त्यांच्याच आदेशानुसार पुणे पॅटर्नची स्थापना करून महापालिकेत सत्ताही मिळविली.

नाव मोठं लक्षण खोटं
मुकुंद संगोराम

पीएमपीएमएल हे नावच फक्त भारदस्त आहे. पूर्वीच्या पीएमटीचा कारभार जेवढा भोंगळ होता, तेवढाच भोंगळपणा आता भारदस्त नाव धारण केलेल्या नव्या व्यावसायिक संस्थेचाही आहे, हे लक्षात आलेले आहे. पुण्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या पीएमटी बसेसची अवस्था आजही तेवढीच बेकार आहे, जेवढी ती पाच दहा वर्षांपूर्वी होती. केवळ बसेसच्या संख्येत वाढ झाली, म्हणजे कारभार सुधारला, अशा भ्रमात राहून पीएमपीएमएल या संस्थेने जे काही उद्योग सुरू केले आहेत, ते त्या संस्थेच्या परंपरेशी सुसंगतच आहेत.

पस्तीस वर्षांनंतर झालेल्या सुनावणीत ‘आरोपी’ ठरले निर्दोष !
नितीन पवार

देशात १९७४ मध्ये झालेल्या रेल्वेच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी पुण्याच्या रेल्वे कामगारांनी सभा घेतल्याबद्दल आणि नंतर मोर्चा काढल्याबद्दल भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी त्यानंतर तब्बल पस्तीस वर्षांनी गेल्या आठवडय़ात झाली आणि बहुसंख्य साक्षीदारच निवृत्त किंवा निवर्तलेले असल्याने पुण्याच्या न्यायालयाने ‘आरोपीं’ची निर्दोष मुक्तता केली. हे आरोपी होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि माजी महापौर शांताराम दिवेकर! एका विशेष कारणासाठी शिवाजीनगर न्यायालयात गेलो होतो. सगळ्या दरवाजांवर नव्यानेच बसवलेला पोलिसी पहारा दिसला.

प्रतीक्षा संपली.. नॅनो ३१ मार्चला पुण्यात दाखल
२५ ते ३० हजार ग्राहकांकडून चौकशी ५ माहिती सांगण्यासाठी खास प्रशिक्षित कर्मचारी ५ स्टेट बँकेच्या शाखांमध्ये मिळणार नोंदणी अर्ज

पुणे, २५ मार्च/ प्रतिनिधी

जगातील सर्वात स्वस्त मोटार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टाटा नॅनो’ चे ३१ मार्चला पुण्यात आगमन होत असून आतापर्यंत टाटा मोटर्सच्या पुण्यातील पंडित ऑटोमोबाईल, बी. यू. भंडारी ऑटो आणि प्रथम ऑटो या तीन वितरकांकडे २५ ते ३० हजार ग्राहकांनी चौकशीसाठी फोन केले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नॅनोचे नोंदणी शुल्क भरण्यासाठी अनेक ग्राहक उत्सुक आहेत मात्र पुण्यात नॅनोची नोंदणी ३ एप्रिल पासून सुरू होणार आहे.

‘गाथा ज्ञानाची’ उपक्रमाचे उत्तमनगरला बक्षीस वितरण
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

‘लोकसत्ता’ गाथा ज्ञानाची - माहिती पर्यावरणाची या उपक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ उत्तमनगर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात नुकताच पार पडला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एम. बी. पाकले यांच्या हस्ते उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देण्यात आले. ‘लोकसत्ता’च्या उपक्रमात चेतना चांडेग्रा या विद्यार्थिनीस तिसरा क्रमांक मिळाला. कार्यक्रमात १४ विद्यार्थ्यांना नवनीत अ‍ॅटलास पुस्तके देण्यात आली. विद्यालयातील ८८ विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’च्या उपक्रमात सहभाग घेतला होता. ‘लोकसत्ता’च्या विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापिका पाकले यांनी या वेळी केले. कार्यक्रमास ‘लोकसत्ता’चे रामदास शिंदे, प्रभू देसाई, विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दुरुस्तीकामामुळे आज विविध भागांत पाणी नाही
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

खडकवासला धरणातील जॅकवेल येथील विद्युतविषयक तातडीची दुरुस्ती कामे गुरुवारी (२६ मार्च) केली जाणार असल्यामुळे त्या दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत विविध भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी दुपारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. वारजे परिसर- पौड रस्ता, उजवी व डावी भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रस्ता परिसर, सूस रस्ता, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे महामार्ग परिसर, कर्वेनगर डहाणूकर कॉलनी, गांधी भवन, महात्मा सोसायटी. विद्यानगर भाग- धानोरी, कळस, विमाननगर, विद्यानगर परिसर. या सर्व भागांना शुक्रवारी (२७ मार्च) सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होईल.

एसकेएफमध्ये ‘ब्लॉक क्लोजर’ आजपासून सुरू
पिंपरी, २५ मार्च / प्रतिनिधी

चिंचवड येथील एसकेएफ या बहुराष्ट्रीय कंपनीमधील टेक्सटाईल विभागात मंगळवार (२५ मार्च) पासून ेँसुरु झाला आहे. तर आटोमॅटिव्ह बेअरिंग युनिट (एबीयू)मध्ये (२६ मार्च) पासून सलग ३१ मार्च पर्यंत ‘ब्लॉक क्लोजर’ करण्यात येणार आहे. एसकेएफ व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यामध्ये नुकताच वेतनवाढीचा करार झाला. या करारांतर्गत आर्थिक मंदी अथवा यंत्रसामग्राची देखभाल करण्यासाठी प्रत्येक महिन्यातून सहा दिवस व दिवाळी आणि मे महिन्यात जादा प्रत्येकी सहा दिवस ब्लॉक क्लोज करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या करारानंतर पहिल्यादांच ब्लॉक क्लोजरला सुरुवात झाली आहे. टेक्सटाईल खात्यात १३० कामगार तर एबीयू विभागात २५० कामगार कार्यरत आहेत. या ब्लॉक क्लोजर कालावधीतील मूळ वेतन अधिक महागाई भत्ता पगार म्हणून दिला जाणार आहे . यामुळे कामगारांमध्ये कपात किंवा स्वेच्छानिवृत्ती योजनांबाबत कंपनीमध्ये चर्चा सुरू आहे. तथापि टेक्सटाईल उद्योगाला उतरती कळा लागल्याने टेक्सटाईल कामगारांच्या नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घरफोडय़ा करणाऱ्या शिवाजी रणदिवेला अटक
शिरूर, २५ मार्च/वार्ताहर

अनेक घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांना हवा असणारा शिवाजी रमेश रणदिवे (वय २५ वर्षे, रा. इंदिरानगर, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठय़ा शिताफीने शिरूर येथे अटक केली. त्याच्या अटकेने शहर व परिसरातील घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबतची अधिक माहिती देताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ए. पी. आय. किशोर म्हसवडे म्हणाले की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एस. बी. कवडे, पप्पू हिंगे, रमेश भिसे, दत्ता मसळे यांच्या पथकाने गुप्तपणे माहिती मिळवून शिवाजी रणदिवे यास शिरूर शहरातील यशवंत वसाहतीमागील पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या डोंगरावर मोठय़ा शिताफीने पकडले. रणदिवे याचे सहकारी अनिल चौरे, विशाल अडागळे, बाळू अडागळे, शशिकांत शिंदे, राहुल यादव सर्व रा. इंदिरानगर, शिरूर यांनाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. या सर्वावर शिरूर व मंचर पोलीस ठाण्यात घरफोडय़ा व चोरी संदर्भात विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रणदिवे व त्याच्या सहकाऱ्यांनी काही घरफोडींची कबुली दिली आहे.

सुनील जाधव कुटुंबीयांच्या मदतीसाठी कृती समिती
पाटस, २५ मार्च/वार्ताहर

दिवंगत सुनील गोविंद जाधव यांच्या कुटुंबीयांस शासनाची आर्थिक मदत मिळावी व मुलास शासकीय सेवेत घ्यावे, या मागणीसाठी जिल्हा नाभिक संघटनेने सुपे (ता.बारामती) येथील बैठकीत कृती समितीची स्थापना केली. ‘गुडमॉर्निग’ पथकाच्या कारवाईत हृदयविकाराच्या झटक्याने सुनील जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या सुपे येथील दशक्रियाविधीस नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष निढाळकर, प्रसिद्धिप्रमुख कृष्णकांत जगताप, ग्रामस्थ तसेच जिल्ह्य़ातील नाभिक समाजबांधव सलूनची दुकाने बंद ठेवून मोठय़ा संख्येने उपस्थित होते. घरातील प्रमुख सुनील जाधव यांच्या निधनाने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळल्याची भावना अनेकांनी याप्रसंगी व्यक्त केली. दशक्रियाविधीनंतरच्या बैठकीत सुभाष निढाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दहाजणांची कृती समिती स्थापन करण्यात आली. दिवंगत सुनील जाधव कुटुंबीयांस शासनाकडून आर्थिक मदत व मुलास शासकीय सेवेत घ्यावे, या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. बारामती शहर व ग्रामीण नाभिक संघटना, तळेगाव ढमढेरे तसेच खडकी (ता.दौंड) येथील नाभिक संघटनेने एकूण २१ हजार ७२० रुपयांची रोख मदत जाधव कुटुंबीयांना दिली. मागणीबाबत शासनाकडून निर्णय न झाल्यास जिल्ह्य़ातील समाजबांधव तोंडाला व डोक्याला काळी पट्टी बांधून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याचे बारामती तालुका ग्रामीण नाभिक संघाचे उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी सांगितले.