Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पुणे पॅटर्नचे काय?
लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आज मंजूर झाला खरा. पण हा ठराव होत असतानाच आता ‘पुणे

 

पॅटर्न’चे काय, असा प्रश्न उपस्थित करून अनेकांनी नेत्यांची भंबेरी उडविली.
महानगरपालिका निवडणुकीत ‘दादां’च्या आदेशानुसार आम्ही कलमाडींच्या विरोधात काम केले. त्यांच्याच आदेशानुसार पुणे पॅटर्नची स्थापना करून महापालिकेत सत्ताही मिळविली. आता त्याच कलमाडींसाठी आम्ही मते कशी मागायची हे सांगा, असा रोखठोक सवाल एकाच वेळी अनेक कार्यकर्त्यांनी केल्याने नेते मंडळींमध्ये चांगलीच चलबिचल झाली. अखेर ज्या दादांनी कलमाडींच्या विरोधात काम करायला सांगितले व ज्या साहेबांनी ‘कारभारी बदला’ असा आदेश दिला. त्याच साहेब आणि दादांनी आता कलमाडींना विजयी करण्याचा आदेश दिला आहे, असे उत्तर देऊन त्यांनी आपली सुटका करवून घेतली. तथापि, तरीही पुणे पॅटर्नचे भवितव्य काय, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.
कर्ज देताय ? विचार करा..
बहुराष्ट्रीय बँकांच्या कर्ज आणि ठेवींच्या नवनवीन योजना सातत्याने ‘लाँच’ होत असतात. गोड आवाजात, मधाळ भाषेचा वापर करत ‘सर, सर’ करत कर्ज घ्या म्हणून मोबाईलवर आग्रह करणाऱ्या त्या ‘कँपेनर्स’ ग्राहकांना (की सावजाला) अक्षरश: अनेकदा हैराण करतात. अनेकदा त्यांना कटविण्यासाठी मग काही जण युक्तया प्रयुक्तयाही योजतात. तरी त्या काही पिच्छा सोडत नाहीत. पण कधीतरी या ललनांनाही शेरास सव्वाशेर भेटतोच की! तसाच एक ‘शेर’ एका बँकेच्या कर्ज योजनेसाठी आग्रह धरणारीला मंगळवारी भेटला. कर्ज योजनेसाठीचा ‘कॉल’ महापालिकेतील एका गटनेत्याला त्याच्या मोबाईलवर आला. त्यावेळी हा नेता पत्रकार कक्षात गप्पाटप्पा करत बसला होता. पलीकडून इंग्रजी भाषा सुरू झाली. गटनेता भडकलाच. मला इंग्रजी समजत नाही.. मराठीत बोला.. गटनेत्याने सुनावले. मग पलीकडून हिंदी भाषा सुरू झाली. ती ऐकून तर गटनेता आणखीनच चिडला. ‘अहो मराठीत बोला म्हणून सांगितलं ना तुम्हाला..’ नेत्याने ठणकावले. मग तोडकी मोडकी मराठी पलीकडून सुरू झाली. पलीकडून कर्जाचा प्रस्ताव मांडला जाऊ लागला. नेत्याने तो शांतपणे ऐकून घेतला आणि म्हणाला, ‘मॅडम आता एक गोष्ट करा. मी राजकारणी आहे आणि नगरसेवक आहे.. तेव्हा तुमचे जे कोणी साहेब असतील, मॅनेजर असतील, त्यांना आधी विचारा की, नगरसेवकाला ‘लोन’ देता येईल का आणि ते जर ‘हो’ म्हणाले, तर मग मला पुन्हा फोन करा.’ समोर बसलेला एक पत्रकार म्हणाला, ‘अहो, तिला सांगा प्रचार साहित्य खरेदी करायचे आहे. त्यामुळे पैसे लागणार आहेतच. तेव्हा लवकर ‘लोन’ द्या.’ नेत्याने मग हसत हसत तेही पलीकडे सांगितले की, पैसे देणारच असाल, तर लवकर द्या. मला निवडणूक प्रचार साहित्य खरेदी करायचे आहे. त्यावर एकच हंशा झाला आणि पलीकडून झटकन फोनही बंद झाला. तुम्ही आता विचारात पडला असाल की कोण हा नेता. तर त्याचे उत्तर सोपे आहे हो अगदी. हिंदी भाषा ऐकल्यावर ‘दिलसे’ संतापलेला आणि मराठीचा आग्रह धरणारा कोण असू शकतो या महाराष्ट्रात.. ? अगदी बरोबर तोच. तुमच्या मनात जे नाव आले तोच!