Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नाव मोठं लक्षण खोटं
मुकुंद संगोराम

पीएमपीएमएल हे नावच फक्त भारदस्त आहे. पूर्वीच्या पीएमटीचा कारभार जेवढा भोंगळ होता,

 

तेवढाच भोंगळपणा आता भारदस्त नाव धारण केलेल्या नव्या व्यावसायिक संस्थेचाही आहे, हे लक्षात आलेले आहे. पुण्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या पीएमटी बसेसची अवस्था आजही तेवढीच बेकार आहे, जेवढी ती पाच दहा वर्षांपूर्वी होती. केवळ बसेसच्या संख्येत वाढ झाली, म्हणजे कारभार सुधारला, अशा भ्रमात राहून पीएमपीएमएल या संस्थेने जे काही उद्योग सुरू केले आहेत, ते त्या संस्थेच्या परंपरेशी सुसंगतच आहेत. गेल्या आठवडय़ात तिकीट छपाईपोटी देणे असलेली रक्कम अकरा कोटींवर पोहोचल्याची बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा कुणालाही त्याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. डबघाईला आलेली संस्था अशी जी तिची ख्याती आहे, ती आजही कायम असल्याबद्दल अनेकांनी सुस्काराच सोडला असेल. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होतो आहे आणि तो सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे एवढा एकच उपाय आहे, हे समजले असले तरी ते वळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुण्यातील रस्त्यांची रूंदी वाढणे शक्य नाही आणि त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत घट होणेही शक्य नाही. आपण काय करतो आहोत आणि आपल्याला काय करायचे आहे, हेच समजून घेण्याची क्षमता नसलेले अधिकारी केवळ राजकीय आश्रयाने काम करत असतील, तर या व्यावसायिक संस्थेचं पंपाळं वाजायला फारसा वेळ लागणार नाही. आधीच वाहने खूप, त्यात नॅनोची भर अशा अवस्थेत पुण्यातील रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांचा वेग दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. कोणत्याही शहराचा विकास तेथील वाहतुकीच्या वेगाशी निगडित असतो. पुण्यात हा वेग वाढविण्यासाठी वाहतूक पोलीस जेवढा प्रयत्न करत आहेत, त्याच्या विरुद्ध प्रयत्न पीएमपीएमएल ही संस्था करत आहे. पैसे न देता महापालिका मुद्रणालयाकडून कोटय़वधी रुपयांची तिकिटे छापून घेणाऱ्या या संस्थेला व्यवसाय म्हणजे काय, हे कधी कळण्याची शक्यता नाही. महापालिकेच्या ताब्यातून तिची सुटका करणाऱ्या राजकारण्यांनी ही संस्था म्हणजे चराऊ कुरण केले आहे. कोणतीही सार्वजनिक वाहतूक संस्था नफ्यात नसते. पण म्हणून तिने जाणूनबुजून तोटाही करता कामा नये. परंतु या संस्थेकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नाही. कोणत्या कंपनीच्या बसेस खरेदी करायच्या, हे जर सरबराईच्या दर्जावर अवलंबून राहणार असेल, तर यापेक्षा आणखी वेगळे काय घडणार? व्यवसाय करायचा तर तो व्यावसायिक नीती पाळून केला पाहिजे, एवढे सूत्र सोडून बाकी सारे काही या कंपनीत सुखेनैव सुरू आहे. लागेबांधे आणि हितसंबंध यासाठी येथील सारी यंत्रणा अहोरात्र राबते आहे. यंत्रणेला प्रवाशांच्या गरजांशी आणि त्यांच्या अडचणींशी काहीही घेणेदेणे नाही. त्यामुळेच प्रवाशांच्या दुर्दैवाचे फेरे संपत नाहीत. पालिकेत कारभारी बदलला तरी या संस्थेच्या कारभारात जराही बदल झाला नाही, याचा अर्थच या सगळ्या अकार्यक्षमतांवर पांघरूण घालण्यासाठी कुणी तरी पुढाकार घेत आहे. आता सामान्य पुणेकराला विमान वाहतुकीच्या दरापेक्षा अधिक दर असणाऱ्या रिक्षा परवडेनाशा झाल्या आहेत आणि अतिशय भोंगळ कारभार असलेल्या पीएमपीएमएल सारख्या सार्वजनिक वाहतुकीवरचा विश्वास उडाला आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संस्थेच्या पुनरुज्जीवनाचा नवा आराखडा तयार करायला हवा. राजकीय लठ्ठालठ्ठीत या संस्थेचा आणि पर्यायाने सामान्य पुणेकराचा जो घात होत आहे, तो आता न परवडणारा आहे. प्रत्येक पैशाचा हिशोब देणारी पारदर्शकता या व्यावसायिक संस्थेतही नाही, हे तर उघड सत्य आहे. पारदर्शकताच नाही, तर कार्यक्षमता तरी कोठून येणार?
mukundsangoram@gmail.com