Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्रतीक्षा संपली.. नॅनो ३१ मार्चला पुण्यात दाखल
२५ ते ३० हजार ग्राहकांकडून चौकशी ५ माहिती सांगण्यासाठी खास प्रशिक्षित कर्मचारी ५ स्टेट बँकेच्या शाखांमध्ये मिळणार नोंदणी अर्ज
पुणे, २५ मार्च/ प्रतिनिधी

जगातील सर्वात स्वस्त मोटार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टाटा नॅनो’ चे ३१ मार्चला पुण्यात

 

आगमन होत असून आतापर्यंत टाटा मोटर्सच्या पुण्यातील पंडित ऑटोमोबाईल, बी. यू. भंडारी ऑटो आणि प्रथम ऑटो या तीन वितरकांकडे २५ ते ३० हजार ग्राहकांनी चौकशीसाठी फोन केले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नॅनोचे नोंदणी शुल्क भरण्यासाठी अनेक ग्राहक उत्सुक आहेत मात्र पुण्यात नॅनोची नोंदणी ३ एप्रिल पासून सुरू होणार आहे.
पुण्यात टाटा नॅनोची एक्स शोरूम किंमत पुढीलप्रमाणे राहणार आहे. नॅनो (नॉर्मल) रुपये,१,३०,१४७, दुसरे मॉडेल (नॉन मेटॅलिक) १,५५,६२४, मेटॅलिक मॉडेल १,५८,६८४ आणि टॉप मॉडेल (एलएक्स -युरो३) १,८१,२६३ रुपये. असे या वितरकांकडे चौकशी केले असता सांगण्यात आले.
अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी टाटा नॅनो पुणेकरांना ३१ मार्चला बघायला मिळणार आहे. टाटा नॅनोचे उत्पादन सध्या कंपनीच्या पंतनगर येथील उत्पादन प्रकल्पात सुरू असून तेथून काही नॅनो पुण्याकडे निघाल्या आहेत असे प्रथम ऑटोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्यातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमध्ये टाटा नॅनोच्या नोंदणीसाठीचे अर्ज उपलब्ध होणार आहेत. या अर्जाची किंमत तीनशे रुपये असून ग्राहकांना या अर्जासोबत तीन हजार रुपये नोंदणी शुल्क म्हणून भरावे लागणार आहेत. ३ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत स्टेट बँकेत टाटा नॅनोची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या ग्राहकांना टाटा नॅनोची जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक लाख नॅनोची लॉटरी पद्धतीने प्रथम विक्री केली जाणार आहे. नोंदणी केलेल्या ग्राहकांना जोपर्यंत नॅनो मिळत नाही तोपर्यंत ग्राहकांनी भरलेल्या तीन हजार रुपयांच्या शुल्कावर टाटा मोटर्सकडून व्याजदेखील दिले जाणार आहे. हहह.ळं३ंल्लंल्ल.ूे या वेबसाईटवर टाटा नॅनोच्या किमती संबंधी तसेच या मोटारी विषयीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुण्यातील वितरकांनी टाटा नॅनोची सविस्तर माहिती सांगण्यासाठी कंपनीने प्रशिक्षण दिलेले कर्मचारी नव्याने भरती केले असून ग्राहकांकडून उपस्थित होणाऱ्या शंकांचे निरसन हे प्रशिक्षित कर्मचारी करणार आहेत असेही कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.