Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कॉम्प्रेसरमध्ये गॅस भरताना स्फोट; दोन गंभीर जखमी
पुणे, २५ मार्च / प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या तळमजल्यामध्ये असलेल्या सारस्वत बँकेच्या ‘रिकव्हरी’ विभागात आज दुपारी अडीचच्या सुमारास अचानक स्फोट झाला. वातानुकूलित यंत्राच्या कॉम्प्रेसरमध्ये गॅस भरताना हा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कामगार गंभीर जखमी तर बँकेतील दोन कर्मचारी किरकोळ

 

जखमी झाले.
जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये या घटनेमुळे काहीकाळ घबराट निर्माण झाली. स्नो लाईन कंपनीचे समीर दिघे (वय ३०, रा. एरंडवणे) आणि संतोषकुमार भारती (वय २५, रा. तपोधाम, वारजे माळवाडी) असे दोन कामगार या दुर्घटनेत जखमी झाले असून सारस्वत बँकेचे कर्मचारी प्रदीप कुंभार आणि नरेश प्रधान हे किरकोळ जखमी झाले. दिघे व भारती या दोघांना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बंडगार्डन ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुहास नाडगौडा आणि समर्थ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुतराव डफळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारस्वत बँकेची सोमवार पेठ शाखा ही जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या तळमजल्यावर आहे. बँकेच्या कार्यालयामध्ये बसविण्यात आलेल्या एअरकंडिशनरच्या (एसी) नियमित तपासणीचे काम ‘स्नो लाईन’ नावाच्या कंपनीतर्फे केले जाते. या कंपनीचे कर्मचारी दिघे व भारती हे दोघे आज दुपारी एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये अमोनिया गॅस भरण्यासाठी आले होते. गॅस भरत असताना दुपारी अडीचच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या वेळी बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला काचेचा दरवाजा तुटला. बँकेच्या रिकव्हरी विभागाचे मुख्य व्यवस्थापक भालचंद्र खाराईत यांनी तत्काळ याबाबत अग्निशामक दलाला खबर दिली.