Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दुर्मिळ गंधर्वस्वर आता ‘सीडी’वर
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

सुमारे सत्तर वर्षांपूर्वी कराचीच्या शेठ लखमीचंद ईशरदास यांच्या घरच्या मैफलीत नटसम्राट बालगंधर्वानी गायलेलं नाटय़संगीत आता संगीतरसिकांसाठी सीडीवर प्रकाशित होत आहे.
शेठजींचे नातू पुण्याचे मुकेश नारंग यांनी स्वत:च्या संग्रहातला हा ठेवा आता रसिकांसमोर आणायचे ठरवले आहे. या निमित्ताने ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीशी बोलताना नारंग म्हणाले, ‘‘माझ्या

 

आजोबांचा हा ठेवा वंशपरंपरेने माझ्यापर्यंत आला आहे.
पण संगीतातल्या पुढच्या पिढीपर्यंत हे गाणं पोहोचलं पाहिजे. जे कोणी या गायकीचा अभ्यास करतात. त्यांना या संग्रहाचा उपयोग झाला पाहिजे.
या दृष्टीने मी यापूर्वी मा. कृष्णरावांचं गाणं सीडीवर आणलं आहे आणि आता बालगंधर्वाचं गाणंही सीडीवर येत आहे.’’ या सीडीच्या अंतरंगाबद्दल बोलताना ‘बालगंधर्वाची तीन - तीन मिनिटांची गाणी आपल्याला माहीतच आहेत पण एक एक गाणं, सात-आठ किंवा दहा - पंधरा मिनिटांपर्यंत असं या सीडीवर आलेलं आहे.
मराठी नाटय़संगीताप्रमाणे दोन हिंदी भजनेही यात आहेत असे सांगून नारंग यांनी या प्रकाशनाच्या कार्यक्रमासंबंधीही माहिती दिली.
येत्या शनिवारी २८ मार्च २००९ या दिवशी सकाळी १० वाजता एस.एम. जोशी हॉल (नवी पेठ) येथे ख्यातनाम गायिका श्रीमती जयमाला शिलेदार यांच्या हस्ते सीडी-प्रकाशन होणार आहे. या वेळी डॉ. दिग्विजय वैद्य आणि कीर्ती शिलेदार यांचे गायनही होणार आहे.
‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम आणि सुविख्यात हार्मोनियमवादक पं. पुरुषोत्तम वालावलकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून अध्यक्षस्थानी प्रख्यात चित्रकार रवि परांजपे हे आहेत.