Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जॅमिंग रजिस्टर’ला नागरिकांकडून प्रतिसाद
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

शहराच्या कोणत्याही भागात झालेल्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने सुरू केलेल्या ‘जॅमिंग रजिस्टर’ या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेकडून सुरू असलेली रस्त्यावरील कामे, वीजकपातीमुळे सिग्नल बंद पडणे, तसेच ‘पीएमपी’ बस बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे या रजिस्टरमधील नोंदींवरून स्पष्ट

 

झाले आहे.
जॅमिंग रजिस्टरमध्ये गेल्या तीन दिवसांत एकोणीस ‘वाहतूक कोंडी’च्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या नोंदींनुसार खडकी बाजारातील पोलीस लाईनसमोर, सहकारनगर येथे शिवदर्शन चौकात, बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोरील चौकात, कल्याणीनगर येथील एबीसी फार्महाऊस चौकात, वारजे येथे पुलाखाली, चांदणी चौकात, बाणेर रस्त्यावरील अभिमान श्री चौकात, शिवाजीनगर येथे स.गो. बर्वे चौकात, हडपसर येथे गांधी चौकात, स्वारगेट येथील गिरीधर भवन चौक, बुधवार चौकात, रामवाडी जकात नाका, तसेच सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर नागरिकांनी वाहतूक शाखेला दूरध्वनीवरून संपर्क साधला व कोंडीविषयी माहिती दिली.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील याबाबत म्हणाले, ‘वाहतूक कोंडी होण्यामागची कारणे व त्यावरील उपाययोजना करण्यासाठी ‘जॅमिंग रजिस्टर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता रजिस्टरमध्ये माहिती संकलित केल्यानंतर वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा अभ्यास केला जाणार आहे. गेल्या तीन दिवसांत नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला असून, त्यांनी दूरध्वनीवरून कळविलेल्या प्रत्येक स्थळाला वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे.’
‘वाहतूक शाखेकडे यापूर्वी फक्त ६५ वॉकीटॉकी होते. आता त्यांची संख्या वाढवून १०५ करण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागात वाहतूक कोंडी झाल्याची खबर नागरिकांनी दिल्यावर तत्काळ तेथे नेमणुकीस असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला संपर्क साधणे सोपे जात आहे,’ असेही पाटील म्हणाले.
रिक्षांवर दंडात्मक कारवाई
‘पीएमपी’ बसथांब्यांवर रिक्षांना बंदी घालण्याच्या योजनेची वाहतूक शाखा व पीएमपीकडून कालपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. शहरातील प्रमुख बावीस ठिकाणी ही कारवाई करण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे दीडशे रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी आज दिली.