Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भटकरांची संगणकक्रांती करणार दहा हजार शाळांचा कायापालट!
पुणे, २५ मार्च/खास प्रतिनिधी

परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी आता नवीन ध्यास घेतला आहे. संगणक, माहिती-तंत्रज्ञानाद्वारे ‘केजी टू पीजी’पर्यंतच्या शिक्षणाचा कायापालट! त्याच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरातील १० हजार शाळांमधील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत क्रांती घडणार आहे. अगदी

 

एकशिक्षकी शाळेपासून शहरातील चकाचक खासगी शाळांचा त्यामध्ये समावेश राहील.
डॉ. भटकर यांनी स्थापन केलेल्या एज्युकेशन टू होम (ईटीएच) संशोधन प्रयोगशाळेला येत्या शुक्रवारी (दि. २७) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने संगणकाधारित शिक्षणाचा हा प्रकल्प आज जाहीर करण्यात आला. ‘केंद्र सरकारच्या वतीने शाळांमध्ये संगणक’ ही योजना राबविण्यात येत आहे; परंतु त्यामध्ये फक्त संगणक उपलब्ध करून दिले जातात. ‘ईटीएच’च्या प्रकल्पाची व्याप्ती त्यापेक्षा अधिक आहे. संगणकाधारित व्यवस्था, संगणकप्रणाली आदींच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शाळांच्या व्यवस्थापनामध्येही संगणकाधारित घटकांचा समावेश करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाला पूरक उपक्रम, साहित्य संगणकाधारित नेटवर्कच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे भारनियमनावर तोडगा काढण्यासाठी आठ तासांचा बॅक-अप असलेली संगणकव्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘आयटी’च्या आधारे कोणताही प्रकल्प राबवायचा म्हटला की, त्यासाठी खूप खर्च येतो, चकाचक वर्गखोल्या आदी अद्ययावत सुविधांची गरज असते, हा गैरसमज दूर करीत ‘ईटीएच’च्या प्रकल्पामुळे शिक्षणामध्ये क्रांती घडेल, असा विश्वास डॉ. भटकर यांनी व्यक्त केला. ‘ईटीएच’च्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त काही उत्पादनांची घोषणाही डॉ. भटकर यांनी केली. गृहव्यवस्थापनासाठीचे ‘डिजिटल होम’, सर्जनशील कल्पनांना व्यासपीठ मिळवून देणारे ‘इनोव्हेशन पोर्टल’ आदींचा त्यामध्ये समावेश आहे.
संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी होणाऱ्या समारंभात डॉ. एन. शेषगिरी, के. पी. पी. नंबियार, सी. शिवशंकरन, एफ. सी. कोहली आणि पी. पी. छाब्रिया यांना संगणक-इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात केलेल्या पायाभूत कामगिरीबद्दल कृतज्ञता म्हणून जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विवेक सावंत, डॉ. पंडित विद्यासागर, अरुणा कटारा, ए. जयकुमार आणि जयशंकरन पिल्ले यांना ‘ईटीएच एज्युकेशन’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
डिजिटल दप्तर!
संगणकाधारित शिक्षणव्यवस्था विकसित करताना त्याचा श्रीगणेशा दप्तरापासून करण्यात येणार आहे. जगभरातील कंपन्यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प किमतीमध्ये लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहेत; परंतु त्याच्याही पुढे जाऊन डॉ. विजय भटकर यांनी ‘डिजिटल दप्तर’ या प्रकल्पाची घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या दप्तरातील सर्व साहित्य ‘डिजिटल’ स्वरूपात रूपांतरित करण्याचे आव्हान या प्रकल्पाच्या माध्यमातून पेलण्यात येईल.