Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शहरातील कुत्र्यांची संख्या २१ हजार ४७९!
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

पुणे शहरात पाळीव व भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती आहे, हा प्रश्न नेहमीच गाजत असतो. महापालिकेने या प्रश्नाचे अधिकृत उत्तर आता दिले असून शहरात २१ हजार ४७९ कुत्री

 

असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
भटक्या कुत्र्यांनी शेकडो नागरिकांना चावे घेतल्याचे तसेच बालकांना जखमी केल्याचे प्रकार गेल्या महिन्यात शहरात मोठय़ा प्रमाणात घडले. कोथरूडमधील डीपी रस्ता ते सागर कॉलनी या रस्त्यावर एकाच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यावेळी शंभराहून अधिक जणांना चावे घेतले होते. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच आंदोलनाचाही प्रयत्न केला होता.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत माहिती मिळविण्यासाठी नगरसेवक गोरडे यांनी चालू महिन्याच्या सर्वसाधारण सभेला काही लेखी प्रश्न दिले असून त्यांची उत्तरे प्रशासनाकडून देण्यात आली आहेत. पशुगणनेनुसार पुणे शहरात कुत्र्यांची संख्या किती या त्यांच्या प्रश्नाला २१ हजार ४७९ असे उत्तर देण्यात आले आहे. पशुगणनेत मोकाट कुत्र्यांची संख्या समाविष्ट असते का, या प्रश्नाला ‘होय’ असे उत्तर देण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचे काम महापालिकेने ‘ब्ल्यू क्रॉस सोसायटी’ या संस्थेला दिले आहे. अशी कुत्री ओळखण्यासाठी त्यांचे कान कापले जातात. संस्थेला दरवर्षी बारा लाख रुपये दिले जातात, अशीही उत्तरे गोरडे यांच्या विविध प्रश्नांना देण्यात आली आहेत.
प्रशासनाने दिलेली ही आकडेवारी चुकीची असून त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक कुत्री शहरात आहेत, असा दावा गोरडे यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. भटकी कुत्री पकडणे, कुत्रे चावलेल्या नागरिकांवर औषधोपचार, महापालिका रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध करून देणे, कुत्रे पकडण्यासाठी गाडीची मागणी केली असता ताबडतोब गाडी पाठविणे या सर्व कामांमध्ये प्रशासनाला अपयश आले असून शहरात कुत्री चावण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत, असे ते म्हणाले. आमच्या वॉर्डातील पिसाळलेले कुत्रे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर कार्यकर्त्यांनी पकडून दिले आणि नंतर गाडी आली. असेच प्रकार सर्वत्र सुरू असल्याच्या तक्रारी आहेत, असेही गोरडे यांनी सांगितले.