Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दरपत्रकावरील नऊ औषध कंपन्या ठरल्या ‘अपात्र’!
वैद्यकीय शिक्षण खात्याचा निर्णय
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांना औषध पुरवठा करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दरपत्रकावरील औषध कंपन्यांपैकी महाराष्ट्रातील सहा कंपन्यांना ‘अपात्र’, तर हैदराबाद, बंगळुरू आणि अमृतसर येथील तीन कंपन्यांना वैद्यकीय शिक्षण खात्याने ‘काळ्या

 

यादीत’ टाकले आहे.
रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये राज्यातील, तसेच परराज्यातील कंपन्यांचा समावेश आहे. शासनाच्या दरानुसार ज्या कंपन्या औषध पुरवठा करतात, तसेच अटींचे पालन करणाऱ्या कंपन्या याच औषध खरेदीच्या दरपत्रकावर (रेट कॉन्ट्रॅक्ट) घेण्यात येतात. त्यानुसार तीनशेहून अधिक कंपन्या सध्या राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना औषध पुरवठा करतात. दरम्यान, काही कंपन्या ‘अपात्र’ असूनही वैद्यकीय शिक्षण खात्याने दरपत्रकावर घेऊन औषध खरेदीचे त्यांना कंत्राट दिले आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध करून हा प्रकार सर्वप्रथम उघडकीस आणला. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या औषध खरेदी सेलकडून विविध कंपन्यांची चौकशी करण्यात आली.
याबाबत वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव भूषण गगराणी यांनी ‘लोकसत्ता’ला अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘ताळेबंदातील फेरफार, त्यातील काही त्रुटी आणि तोटय़ातील असलेल्या महाराष्ट्रातील सहा कंपन्यांना ‘अपात्र’ ठरविले. त्यात मेसर्स सिमंधर हर्बल प्रॉडक्ट्स लि. मुंबई, श्री भराडी आयुर्वेद फार्मा लि. पुणे, आदित्य कॅप्सुल प्रा. लि. नागपूर, श्री हर्बल रेमिडीज औरंगाबाद, शिव हर्बल रीसर्च लॅब लि. नागपूर अशा सहा कंपन्यांचा समावेश आहे, तसेच अमृतसरची जॅक्सन लॅबोरेटरीज लि., एस. एम. फार्मास्युटिकल्स प्रा. लि. बंगळुरू आणि स्मिथ अ‍ॅन्ड क ेन्न्ोर फार्मास्युटिकल्स प्रा. लि. हैदराबाद अशा तीन कंपन्यांना मात्र ‘ब्लॅक लिस्ट’ (काळ्या यादीत) टाकण्यात आले आहे. या तीन कंपन्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई क रण्यात आली आहे. त्यांना आता यापुढे कोणत्याही स्वरूपाचे कंत्राट देता येणार नाही वा घेण्यासाठी अर्ज करता येणार नाही.’
अपात्र ठरविण्यात आलेल्या, तसेच काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपन्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या औषध खरेदी सेलकडून पत्र पाठवून रेट कंत्राटवरून त्यांना काढण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे, तसेच त्यांना नेमक्या कोणत्या कारणांसहित काढून टाकण्यात आले हेदेखील कळविले आहे, असेही उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले.