Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘एसएनडीटी’चे निकाल चार महिने खोळंबले
पुणे, २५ मार्च / खास प्रतिनिधी

परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांमध्ये निकाल जाहीर करण्याचे कायदेशीर बंधन असताना एसएनडीटी विद्यापीठामधील पहिल्या सत्राच्या परीक्षांचे निकाल मात्र तब्बल चार महिने खोळंबले आहेत. दुसऱ्या सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या तरीही निकालच हाती न पडल्याने

 

विद्यार्थिनींबरोबरच शिक्षकवर्गही बुचकळ्यात पडला आहे.
एसएनडीटीमधील दुसरे, तिसरे वर्ष आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्रान्त परीक्षा गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्यात आल्या. विद्यापीठ कायद्यामधील नियमानुसार ४५ दिवसांमध्ये त्याचा निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. दरम्यानच्या काळात दुसऱ्या सत्राच्या एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. परंतु, पहिल्या सत्राचा निकालच जाहीर न झाल्याने दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी नेमक्या कोणत्या विषयांना बसायचे, कोणत्या विषयांसाठी परीक्षाअर्ज भरायचे, अशी संभ्रमावस्था विद्यार्थिनींमध्ये आहे. शिक्षकांकडेही त्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. एसएनडीटी विद्यापीठामधील परीक्षा नियंत्रकपद रिक्त होते. त्यामुळे उद्भविलेल्या तांत्रिक व व्यवस्थापकीय समस्येमुळे निकाल लावण्यास विलंब झाला. गेल्या काही दिवसांमध्ये परीक्षा नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढील काळात लवकरात लवकर निकाल जाहीर केले जातील, असे विद्यापीठाकडून सांगितले जात आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निकालातील विलंबाबद्दल आणि विद्यापीठातील बेकायदेशीर कारभाराबद्दल टीका करण्यात आली. ‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकाल त्वरित जाहीर करावेत आणि कुलपती कार्यालयाकडे या विलंबाचा खुलासा करावा,’ अशी मागणी शहरप्रमुख आनंद कुलकर्णी यांनी केली.