Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

तलावांच्या कात्रजमध्येच पाण्यासाठी वणवण
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेल्या कात्रजच्या तलावाने एकेकाळी संपूर्ण शहराची तहान भागवली आहे. परंतु आज कात्रजवासियांनाच पाण्यासाठी झुंजावे लागत आहे. कात्रज उपनगर महापालिकेत समाविष्ट होऊन सुमारे १० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. तसेच महापालिकेने मोठय़ा प्रमाणावर

 

खर्च करून केलेल्या प्रयत्नांना योग्य नियोजनाअभावी अपयश आले आहे.
कात्रजमध्ये गावठाण, राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि जांभुळवाडी असे तीन तलाव आहेत. ज्यांची पाणीसाठा क्षमता मोठी आहे. हा पाणीसाठा उपनगराची सुमारे ६-८ महिने तहान भागवू शकतो. त्यामुळे जलाशयांवर जलशुद्धीकरण प्रकल्प राबविल्यास उपनगराचा पाणीप्रश्न सुटण्यास व शहराच्या मुख्य पाणीपुरवठा प्रणालीवरचा भार कमी करण्यास नक्कीच मदत होईल. गेल्या काही दिवसात नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन परिसरातील काही सूज्ञ नागरिक आणि सामाजिक संस्थांनी स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली काही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या प्रकल्पावर अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. सदर अहवालात महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती मोरे यांनी दिली. अहवालानुसार नियोजनबद्ध पद्धतीने प्रकल्प राबविल्यास उपनगर ६-८ महिने पाणी प्रश्नासंदर्भात स्वावलंबी होऊ शकेल. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जलशुद्धीकरण आणि वितरण प्रणाली उभी करण्यासाठी सुमारे एक ते दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. असे असले तरी या जलाशयांचा पाणीसाठा पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. यामुळे वर्षांतील सुमारे ४-५ महिने उपनगराचा सध्या पाणीपुरवठा करीत असलेल्या जलवाहिनीशिवाय पर्याय नाही.