Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्रचारासाठी सार्वजनिक भिंती रंगविण्यास बंदी
पुणे, २५ मार्च/खास प्रतिनिधी

राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आपले चिन्ह व नाव मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता शासकीय, तसेच खासगी इमारतींच्या भिंती रंगविता येणार नाहीत. अशा भिंती रंगविल्या तर आचारसंहितेचा बडगा उगारला जाऊ शकतो. महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीच्या जाहिरात

 

फलकांचाही प्रचारासाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत विभागीय आयुक्तांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र कदम, पुणे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीणसिंह परदेशी, पिंपरीचे आयुक्त आशिष शर्मा, मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास खारगे, पुण्याचे निवडणूक अधिकारी आर. एन. जोशी, शिरूरचे निवडणूक अधिकारी आर. के. गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजीवकुमार आदी उपस्थित होते.
निवडणूकविषयक प्रचारासाठी शासकीय मालकीची जागा, इमारत, शाळा यांचा वापर करता येणार नाही. महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीच्या जाहिरात फलकांवर प्रचाराचा मजकूर लिहिता येणार नाही, तसेच खासगी मालकीच्या जागेत फलक व बॅनर्स लावण्यापूर्वी कायदेशीर परवानगी घेतली आहे, याची दक्षता घेण्याची सूचना बंड यांनी बैठकीत केली. सार्वजनिक मालकीच्या जागा व खासगी इमारतींच्या भिंतींवर प्रचारकी मजकूर लिहून त्या रंगविण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यावरही लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाची निवडणूक ‘हायटेक’ असणार आहे. उमेदवारांचा प्रचार केबल व एसएमएसद्वारे होणार आहे. ही बाब विचारात घेऊन मोबाईल कंपन्यांकडून एसएमएस पाठविणाऱ्यांची यादी, संख्या, वारंवारिता व क्रमांक ही माहिती गोळा करावी. त्याचा निवडणूक खर्चात समावेश होईल याचीही दक्षता घेतली जावी, असे बंड यांनी सांगितले.
शहरात लाल व पिवळा दिवा लावलेल्या मोटारी फिरतात. या मोटारी पोलिसांनी अडविल्यावर संबंधित अधिकारी हुज्जत घालतात. निवडणूक काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सत्यपालसिंह यांनी केले.
आचारसंहिता भंगाची तक्रार झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी याची तत्काळ दखल घ्यावी, असे जिल्हाधिकारी दळवी यांनी या वेळी सांगितले. हद्दपारीच्या प्रकरणांमध्ये संबंधितांवर नोटीस बजावून तत्काळ सुनावणी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षां उंटवाल-लढ्ढा यांनी आभार मानले.