Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘हृदयासाठी हृदयापासून’ दोन एप्रिलपासून आकाशवाणीवर
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

हृदयविकारासंबंधी सर्वागीण माहिती समाजापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला ‘हृदयासाठी हृदयापासून’ हा नावीन्यपूर्ण नभोवाणी कार्यक्रम दोन एप्रिलपासून दर गुरुवारी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी राज्यातील सर्व आकाशवाणी

 

केंद्रांवरून प्रसारित होणार आहे.
कार्यक्रमाचे निर्माते आनंद माडगूळकर यांनी आज ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, कार्यक्रमाचे संयोजक किरण बारटक्के उपस्थित होते. माडगूळकर म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव आणि व्यसनाधीनता वाढत आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार उद्भवण्याचे प्रमाण वाढले आहे. याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. कार्यक्रमाच्या दहा मिनिटांच्या प्रसारणात हृदयविकाराच्या झटक्यामुळे उद्भवलेल्या सत्य घटनांवर आधारित प्रसंग श्रोत्यांना ऐकविला जाईल. त्यानंतर हृदयविकाराविषयी श्रोत्यांच्या मनातील शंका, विविध प्रश्न श्रोत्यांच्या वतीने माडगूळकर डॉ. हिरेमठ यांना विचारतील व त्याची समाधानकारक उत्तरे डॉ. हिरेमठ श्रोत्यांना देतील. हे करताना हृदयविकाराची भीती श्रोत्यांना वाटणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे माडगूळकर म्हणाले. डॉ. हिरेमठ म्हणाले की, देशात हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.सध्या अकरा टक्क्य़ांवर असलेले हे प्रमाण येत्या दहा वर्षांत चाळीस टक्क्य़ांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हृदयविकार रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. हर्षदा माडगूळकर (उरगीकर) यांनी कार्यक्रमाचे संवाद व शीर्षकगीत लिहिले आहे.