Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्रचाराची परवानगी नसल्यास कारवाईचे आयुक्तांचे आदेश
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

निवडणुकीतील प्रचारासाठी योग्य त्या सर्व परवानग्या घेणे पक्षांवर बंधनकारक असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शासकीय भिंती तसेच खासगी मिळकतींवर विनापरवाना रंगकाम केल्यास कारवाई केली जाईल, तसेच प्रचार फलक लावलेल्या मिळकतींचा संपूर्ण कर

 

भरलेला असणेही आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आज अधिकारी व खातेप्रमुखांची बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त उमाकांत दांगट, मच्छिंद्रनाथ देवणीकर तसेच वरिष्ठ अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. खासगी मिळकती, शासकीय मिळकती आणि सार्वजनिक जागांवर लावलेल्या मोठय़ा प्रचार फलकांची, तसेच कापडी फलकांची परवानगीच्या अनुषंगाने शहानिशा करून घ्यावी, असे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले.खासगी वा शासकीय भिंती विनापरवाना रंगविल्याचे आढळल्यास निवडणूक अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईचे आदेश द्यावेत, असेही आयुक्तांनी सांगितले. ज्या मिळकतींवर प्रचार फलक वा कापडी फलक लावलेले असतील त्या मिळकतींचा पूर्ण मिळकत कर भरलेला असणे आवश्यक आहे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
चारजणांवर गुन्हे दाखल
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या संरक्षक भिंतीवर जाहिराती रंगविल्याबद्दल माने ज्वेलर्स, आर्यन स्कूल, नानल निवास बालाजीनगर, अजिंक्य क्लासेस व कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूट आणि हॉलिडे फंकी यांच्यावर आज गुन्हे दाखल करण्यात आले.