Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अंतुलेच्या उमेदवारीवर ठरणार राष्ट्रवादीचा ‘मावळ’चा उमेदवार
पानसरे यांच्यावर टांगती तलवार कायम
पिंपरी,२५ मार्च / प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री बॅ.ए.आर.अंतुले हे रायगडमधून कॉंग्रेसचे उमेदवार असणार की नाही यावर ‘मावळ’साठी कोणाला उमेदवारी द्यायची ते राष्ट्रवादी ठरविणार आहे.आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत प्रदेश राष्ट्रवादीच्या बैठकीत मावळ संदर्भात स्वतंत्र चर्चा झाली. दरम्यान, अंतुले यांनी

 

निवडणूक लढविण्यास नकार दिल्याचे समजते.
या मतदारसंघात प्रारंभी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आझम पानसरे,प्रदेशप्रवक्ते मदन बाफना यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर होती.शिवसेनेकडून माजी आमदार गजानन बाबर यांच्या बरोबर कॉंग्रेसचे नगरसेवक श्रीरंग बारणे यांना विचारणा झाल्यापासून सर्व समीकरण बदलले.पानसरे यांना राष्ट्रवादीतील एका मोठय़ा गटाचा विरोध आहे व तो गट सरळ -सरळ बारणे यांना मदत करणार असे लक्षात येताच राष्ट्रवादीनेही माजी खासदार रामशेठ ठाकूर व कांॅग्रेसचे पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचे नाव चर्चेत आणले.विधान परिषदेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनाही विचारणा केल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा संभ्रम अधिकच वाढला.शिवसेना कोणाला उमेदवारी देते यावर आपला उमेदवार निश्चित करायचे असेही ठरले.ठाकूर यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे,अशा बातम्या आल्याने पानसरे समर्थकांनी सरळ राजीनाम्याच्या धमक्या दिल्याने हा गुंता अधिकच वाढत गेला.
आज या विषयावर प्रदेश राष्ट्रवादीमध्ये धमासान चर्चा झाली.पक्षातील एकमेव अल्पसंख्याक मुस्लिम चेहरा उमेदवार म्हणून पानसरे यांना उमेदवारी द्यायला हवी,अशी तरफदारी करण्यात आली.मात्र याचवेळेस कॉंग्रेसने रायगडमधून बॅं.अंतुले यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत.रायगड जिल्ह्यातील तीन तालुके ‘मावळ’ला व तीन रायगड मतदारसंघाला जोडलेले आहेत.तिकडे अंतुले यांची उमेदवारी द्यायचा निर्णय कॉंग्रेसने घेतला तर मुस्लिम म्हणून पानसरे यांना ‘मावळा’तून उमदवारी दिली तर त्याचा वेगळाच संदेश मतदारांत जाण्याची शक्यता आहे, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.त्यामुळे पानसरे यांना उमेदवारी द्यायची की नाही ते अंतुले यांच्या उमेदवारीवर अवलंबून आहे.
दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही यापूर्वी पानसरे यांना तशी कल्पना दिली होती,असेही आज समजले.मुलाखतीच्या वेळेस पिंपरी-चिंचवड शहरात दोन-दोन खासदारकीचे उमेदवार कशाला असे पालकमंत्री अजित पवार यांनी विचारले होते.बाहेरचा उमेदवार दिला तरी तो निवडून आणायचा,मग तो कोणी का असेना, अशी तंबीही त्यांनी मेळाव्यांतून दिल्याने पानसरे यांचा पत्ता काटणार हे जवळपास निश्चित समजले जाते.शिवसेनेने बारणे यांना उमेदवारी दिल्यास शहरातील गावकी-भावकी व मराठा लॉबी पानसरे यांच्या मागे कितपत ठामपणे उभी राहते या विषयी साशंकता पक्षातील नेत्यांनीच व्यक्त केल्याने ही शक्यता अधिक वाढली.
पर्याय म्हणून प्रशांत ठाकूर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणायचा व नंतर त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याचा प्रदेश कार्यकारिणीचा प्रयत्न सुरु होता.प्रत्यक्षात ठाकूर यांनी आज पक्ष प्रवेश केलाच नाही.घाटाखालचा आग्री समाजाचा उमेदवार पिंपरी-चिंचवड शहरात बिलकूल चालणार नाही असा आक्षेप घेण्यात आला.पानसरे यांना डावलून ठाकूर यांना उमेदवारी देण्यापेक्षा सरळ आमदार जगताप यांनाच रिंगणात उतरविण्याची नवी खेळीही राष्ट्रवादीकडून केली जात आहे;परंतु पानसरे समर्थक त्यासाठी राजी होतील की नाही याची खात्री नसल्याने तो निर्णय घ्यायचे धाडसही नेत्यामध्ये नाही.
शिवसेनेने राष्ट्रवादीचा उमेदवार बाबर की बारणे हे जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवले आहे.समोर कोण उमेदवार असेल त्यावर आपला उमेदवार जाहीर करण्याची ठाकरे यांची व्यूहरचना आहे.बारणे यांच्या नुसत्या चर्चेनेच पानसरे यांचे नाव बदलायला राष्ट्रवादी तयार झाली यात काही तरी रहस्य दडल्याचे उध्दव ठाकरे यांना जाणवल्याने त्यांनीही शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करणे थांबविले.पानसरे यांना उमेदवारी दिली तर बारणे यांना मैदानात उतरवायचे व ठाकूर असतील तर बाबर यांना हिरवा सिग्नल द्यायचा असे ठरले आहे.आमदार जगताप असल्यावर शिवसेनेकडून बारणे लढणार नाहीत व बाबर त्या तुलनेत कमी पडतील असे पवार काका पुतण्यांचे गणित आहे,असेही सांगण्यात आले.