Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वेतन न दिल्यास उपोषणाचा ‘एमफोर्ज’कामगारांचा इशारा
पिंपरी, २५ मार्च / प्रतिनिधी

चिंचवड येथील एम फोर्ज व्यवस्थापनाने कामगारांचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन येत्या आठ दिवसांत न दिल्यास कंपनीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला

 

आहे.
कंपनी व्यवस्थापनाकडे कामगारांचा मागील दोन महिन्यांचा थकित पगारा देण्यात यावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली होती;परंतु कंपनीने कामगारांची आर्थिक कोंडी करण्याच्या हेतूने पगार देण्यास टाळाटाळ करत आहे. असा आरोप कामगार संघटनेचे सचिव अर्जुन चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान, आर्थिक मंदी व वाहन उद्योगातील कामाच्या तुटवडय़ामुळे कंपनी दिवसेंदिवस आर्थिक संकटात जात आहे असे कारण पुढे करुन व्यवस्थापनाने हा उद्योग एप्रिल महिन्यापासून बंद करण्याची राज्य सरकारकडे परवानगी मागीतली होती.मागील आठवडय़ात कामगार आयुक्त अरविंद कुमार यांनी व्यवस्थापनाचा अर्ज फेटाळल्यामुळे कंपनी व्यवस्थापन कामगारांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे,असे सागंण्यात आले. यासंदर्भात कामगार उपायुक्त अनिल लाकस्वार व अतिरिक्त कामगार आयुक्त पगार यांच्या कामगारांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन दिले आहे. कामगारांचा हा प्रश्न आठ दिवसात मार्गी न लावल्यास उपोषण करण्यात येईल व यातून औद्योगिक शांततेला बाधा आल्यास व्यवस्थापन व कामगार कार्यालय जबाबदार राहतील, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.