Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘मावळ’साठी राष्ट्रवादीचा आज थेरगावात मेळावा
श्रीरंग बारणे यांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन
िपपरी, २५ मार्च / प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे नगरसेवक श्रीरंग बारणे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या (गुरुवारी)

 

पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. थेरगाव येथील बाळकृष्ण मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता होणाऱ्या या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या आझम पानसरे यांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याचा सस्पेंन्स आजही कायम राहिला. त्यामुळे उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पालकमंत्री अजित पवार, अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील, निरीक्षक घनश्याम शेलार, शिरुरचे उमेदवार आमदार विलास लांडे, आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. पानसरे यांच्या उमेदवारीच्या दृष्टीने उद्याचा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर शिवसेनेतर्फे गजानन बाबर आणि श्रीरंग बारणे यापैकी उमेदवार कोण हेही स्पष्ट होणार आहे. पानसरे यांच्याकडे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून तसे स्पष्ट करण्यात आलेले नाही. विलास लांडे यांच्या शिरुरमधील उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र, मावळची उमेदवारी गुलदस्त्यात आहे. पक्षाचे प्रवक्ते मदन बाफना यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मावळात दणदणीत शक्तिप्रदर्शन केले. दुसरे इच्छुक प्रशांत ठाकूर यांनी मतदारसंघातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास घाईघाईने सुरुवात केली.
दुसरीकडे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाचा विचार सुरु असल्याचेही बोलले जात आहे. एकूणच राष्ट्रवादीच्या वर्तुळात प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर, पानसरे यांचे तिकीट धोक्यात आल्याची भावना झाल्याने िपपरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पदाचे राजीनामे देण्याचा पवित्रा काल घेतला. मात्र, पानसरे यांनी अटकाव केल्याने हे राजीनामानाटय़ वेळीच थांबले. दरम्यान, पक्षाध्यक्ष शरद पवार आणि पानसरे यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.