Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मुरमाड जमिनीत उन्हाळी भुईमूगाचे पीक!
मंचर, २५ मार्च/वार्ताहर

तुषार सिंचन (स्प्रिंकलर) पद्धतीने कमी पाण्यात जमिनीची प्रतवारी चांगली राहून उत्पादनात वाढ होत आहे. याचा प्रत्यय शेतकऱ्यांना हळूहळू येऊ लागला आहे. त्यासाठी स्प्रिंकलरद्वारे शेतीला पाणी देण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये वाढीस लागल्याचे चित्र आंबेगाव तालुक्यात दिसू लागले आहे.

 

घोडनदीचे मुबलक पाणी, िडभा धरण उजव्या, डाव्या कालव्याला सातत्याने चालू असलेले पाणी यामुळे जमिनींना वारंवार भरपूर पाणी देऊन जमीन नापीक होऊ लागली आहे. भरपूर पाणी असल्यामुळे वर्षभरात चार पिके आंबेगाव तालुक्यातील शेतकरी घेतात. त्यामुळे जमिनीला अजिबात विश्रांती मिळत नाही. सातत्याने पिकांना पाणी देऊन जमिनीचा पोत खराब होत आहे.
मंचर-घोडेगाव रस्त्यावर लांडेवाडी येथील शेतकरी पिल्लाजी तुकाराम ढेरंगे यांनी हलक्या मुरमाड जमिनीत भुईमुगाचे उन्हाळी पीक घेतले आहे. भुईमूग पिकामध्ये सहा फूट अंतरावर स्प्रिंकलरद्वारे पाण्याचे तुषार उडवून भुईमूग पिकाला पाणी देत आहे. स्प्रिंकलर पाण्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. योग्य पाणी मिळाल्यामुळे जमिनीचा पोत खराब होत नाही. आणि पीक उत्पादनात वाढ होत असल्याचे शेतकरी पिल्लाजी ढेरंगे यांनी सांगितले.
स्प्रिंकलर पाण्यामुळे वीज आणि पाण्याची बचत होते. स्प्रिंकलरद्वारे उडणाऱ्या पाण्यामुळे पिकांच्या पानावर पाणी पडत असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत नाही. तसेच स्प्रिंकलर किंवा ठिबक पद्धतीसाठी सरकारचे अनुदान आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, असे पिल्लाजी तुकाराम ढेरंगे यांनी सांगितले.