Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उमेदवार जाहीर न झाल्यान बारामतीतील युतीचे कार्यकर्ते नाराज
बारामती, २५ मार्च/वार्ताहर

बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवारांची अद्यापपर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे भाजप व सेना युतीच्या

 

पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
भाजप-सेना युतीच्या जागा वाटपामध्ये बारामती लोकसभेची जागा भाजपकडे आहे, २३ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीला आता फक्त एक महिनाच उरला असून अद्यापपर्यंत भाजप उमेदवाराची अधिकृत घोषणा न झाल्यामुळे भाजप-सेना युतीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
याउलट मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी प्रचार कार्यात आघाडी घेवून या मतदार संघातील दोन प्रचार फे ऱ्या पूर्ण केल्या आहेत, शिवाय राज्याचे जलसंपदा, स्वच्छता व पाणी पुरवठा तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
भाजपकडूनसुद्धा महिला उमेदवार देण्याचा प्रयत्न होत असून पवार कुटुंबीयांचे जुने विरोधक काकडे यांच्या घरातील सुनेला किंवा भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षा संगीता राजे िनबाळकर यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार दिगंबर भेगडे यांच्याशी संपर्क साधला असता पक्ष श्रेष्ठीकडून एक दोन दिवसामध्ये अधिकृत उमेदवाराची घोषणा होईल, अशी माहिती त्यांनी सांगितली. बारामती लोकसभा मतदार संघ हा शरद पवार यांचा सुरक्षित मतदार संघ असल्यामुळे सुप्रिया सुळे यांना मताधिक्य किती अधिक मिळेल, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न राहील, तर भाजपकडून सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य रोखण्याचा प्रयत्न होईल, दरम्यान भाजपच्या उमेदवारांची घोषणा न झाल्यामुळे ही बाब गुलदस्त्यातच आहे.