Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
राज्य

हत्तींच्या कत्तली आणि स्त्रीभ्रूण हत्या ही चिंतेची बाब -चितमपल्ली
नागभूषण पुरस्कार प्रदान

नागपूर, २५ मार्च / प्रतिनिधी

मानवाने केलेल्या हत्तींच्या बेसुमार कत्तली आणि स्त्रीभ्रूण हत्येमुळे सध्या सामाजिक आरोग्याचा धोका निर्माण झाला असून यापुढे नैसर्गिक संतुलन साधण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाल्याची हाक वनमहर्षी डॉ. मारुती चितमपल्ली यांनी दिली आहे. चितमपल्ली यांना नागभूषण अ‍ॅवॉर्ड फाऊंडेशनचा नागभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

विमानातील तांत्रिक बिघाडामुळे दुबईच्या प्रवाशांचा खोळंबा
संतप्त प्रवाशांचा गोंधळ
नागपूर, २५ मार्च / प्रतिनिधी
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दुबईला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरच खोळंबले होते. कंपनीने प्रवाशांची कुठलीही दखल न घेतल्याने संतप्त प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. नागपूरहून दुबईसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान आठवडय़ातून तीनदा रवाना होते. मुंबईवरून सकाळी १० वाजता येणारे विमान अहमदाबाद मार्गे दुबईला जाते.

लष्करातील महिला डॉक्टरची नागपूरमध्ये आत्महत्या
नागपूर, २५ मार्च / प्रतिनिधी

लष्करात कॅप्टन असलेल्या एका विवाहित डॉक्टर महिलेचा नागपुरात माहेरी औषधी इंजेक्शन टोचून घेतल्याने मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. विश्वकर्मा नगरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून अजनी पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली. डॉ. भारती आनंद झिंगाडे हे मृत महिलेले नाव आहे. ती लष्करात कॅप्टन असून पुण्यातील लष्करी रुग्णालयात डॉक्टर आहे.

साखर र्निबधांमुळे ऊस उत्पादकांच्या खिशाला कात्री

राजेंद्र जोशी
कोल्हापूर, २५ मार्च

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदारराजाचा रोष टाळण्यासाठी केंद्र शासनाने साखरेच्या साठय़ावर र्निबध आणले आहेत. यामुळे साखरेच्या बाजारातील तेजीचा लाभ उठवित यंदाच्या हंगामात उसाला चांगला दर मिळेल अशा अपेक्षेत असलेल्या ऊस उत्पादकांना एक मोठा झटका बसणार असून अंतिम बिलाअखेरीस त्याचा दराचा अंदाज टनाला ३०० रुपयाने चुकेल असे प्राथमिक चित्र आहे.

अखेर नियामक मंडळाला ‘बाहेरचा रस्ता’!
देवरुख चित्रविक्रीप्रकरण
सचिन पटवर्धन
देवरुख, २५ मार्च

सभासदांना अंधारात ठेवून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमूल्य चित्रसाठय़ाची विक्री करणारे विद्यमान अध्यक्ष प्रकाश सप्रे यांच्या नेतृत्वाखालील नियामक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे. नियामक मंडळींना सभासदांनीच अशाप्रकारे बाहेरचा रस्ता दाखविला असल्याने वादग्रस्त ठरून नियामक मंडळच बरखास्त होण्याची संस्थेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी काळी घटना ठरली आहे.

धुळ्यात रोहिदास पाटील समर्थकांकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन
धुळे, २५ मार्च / वार्ताहर

काँग्रेसच्या उमेदवारीमुळे निर्माण झालेला वाद धुळे लोकसभा मतदारसंघात चव्हाटय़ावर आला असून पक्षाने डावलल्याने नाराज झालेल्या आ. रोहिदास पाटील समर्थकांनी बुधवारी येथे काँग्रेस भवनासमोर काँग्रेसच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. काँग्रेसने केलेल्या अन्यायाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या नाराजीचा फटका उमेदवार आ. अमरीश पटेल यांना बसून भाजप-सेना युतीचे प्रतापदादा सोनवणे यांना फायदा होण्याची धास्ती काँग्रेस पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

महाबँकेच्या सहकार्याने २६ ग्रामीण युवक बनले संगणक तंत्रज्ञ
नाशिक, २५ मार्च / प्रतिनिधी

ग्रामीण उद्योजकतेचा विकास करताना बेरोजगारांना जुजबी स्वरूपाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य देऊन त्यांना रोजगार निर्मितीस लावण्याचा वसा घेतलेल्या ‘महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत’ (एम.से.टी.) ग्रामीण भागातील २६ संगणक तंत्रज्ञ तयार होत असून तीव्र स्पर्धेच्या युगात ते या महिना अखेरीस स्वतच्या पायावर समर्थपणे उभे राहू शकणार आहेत.उत्तर महाराष्ट्र, ठाणे आणि रायगडसह सात जिल्हयांचे कार्यक्षेत्र असलेल्या एमसेटीचे प्रशिक्षण केंद्र नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयासमोरील बँकेच्या शाखेत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्याची विष घेऊन आत्महत्या
अमरावती, २५ मार्च / प्रतिनिधी

येथील गाडगेनगर भागातील डॉ. प्रशांत विजय सुने यांनी त्यांच्या निवासस्थानी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. डॉ. प्रशांत सुने यांनी रात्री दोन वाजता एन्डोसल्फान हे किटकनाशक प्राशन केले. पहाटे त्यांच्या कुटुंबातील लोकांनी अत्यवस्थ अवस्थेत त्यांना येथील डॉ. अनिल बोंडे यांच्या रुग्णालयात दाखल केले. उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. प्रशांत सुने हे तिवसा येथे वैद्यकीय अधिकारी होते. त्यांनी मृत्युपूर्वी तीन पानांचे पत्र लिहून ठेवले. या पत्रात मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये, पोलिसांनी या आत्महत्येच्या प्रकरणात कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्रास देऊ नये आणि आत्महत्येविषयीचे तपशील प्रसार माध्यमांना दिले जाऊ नये, असे नमूद आहे. डॉ. प्रशात सुने यांच्या कुटुंबात आईवडील आणि तीन भाऊ आहेत. चार महिन्यांपूर्वीच त्यांना तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी मिळाली होती. डॉ. सुने यांनी नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तोतया जकात कर्मचाऱ्याकडून व्यापाऱ्यास लुबाडण्याचा प्रयत्न
अकोला, २५ मार्च/ प्रतिनिधी

जकात कर्मचारी असल्याची बतावणी व्यापाऱ्याची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न शहीद भगतसिंग चौकात मंगळवारी रात्री झाला. व्यापारी, आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखून विरोध केल्यामुळे तोतया क र्मचाऱ्यांनी पळ काढला. सिंधी कँप परिसरात राहणारे कापडाचे व्यापारी रवी अलिमचंदानी बाहेरगावहून अकोल्यात परतले असता भगतसिंग चौकात तीन ते चारजणांनी त्यांना अडवले. जकात कर्मचारी असल्याची बतावणी करून पिशवी तपासण्यासाठी त्यांनी मागितली. मंगळवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. अलिमचंदानी यांना संशय आल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मागितले. ओळखपत्र दाखवण्यास नकार देऊन त्यांनी अलिमचंदानींशी वाद घालायला सुरुवात केली. हमरीतुमरीवरही ते आले. हा प्रकार पाहून परिसरातील नगारिकही गोळा झाले. त्यानंतर मात्र तोतया कर्मचाऱ्यांची बोबडी वळली आणि त्यांनी तेथून पळ काढला. याविषयी माहिती मिळताच नगरसेवक हरीष अलिमचंदानी, शाम गुरबानी, रमेश कोठारी हेदेखील तेथे पोहोचले. त्यांनी जकात कं त्राटदार कोणार्क संस्थेच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यांनीही ते संस्थेचे कर्मचारी नसल्याचे सांगितले. रवी अलिमचंदानी याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांकडे तक्रार केली. आमदार गोवर्धन शर्मा यांचीही भेट घेऊन हा सर्व प्रकार अलिमचंदानी व इतरांनी सांगितला.

नौदलातील नौका आता होणार स्मार्ट
पुणे, २५ मार्च/खास प्रतिनिधी

सातासमुद्रापलीकडील आव्हानांचा सामना करण्याची क्षमता विकसित करताना संरक्षण संशोधन व विकास खात्याच्या (डीआरडीओ) कामगिरीच्या जोरावर भारतीय नौदलाच्या नौका आता स्मार्ट होणार आहेत. दिघी येथील संरक्षण संशोधन संस्थेत (आर अ‍ॅण्ड डीई) आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी नौदलाच्या मटेरियल्स विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल दिलीप देशपांडे यांनी ही माहिती दिली. संस्थेचे संचालक बी. राजगोपालन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. ‘नौकांची रचना ही नौदलाच्या प्रगतीमधील समस्या ठरते आहे. त्यामुळेच ती सुधारण्याबाबत संशोधन करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गंज चढणे, अधिक वजनामुळे वेग आणि आक्रमकतेवर विपरित परिणाम होणे अशा समस्या आहेत. त्यावर पदार्थविज्ञानाच्या जोरावर उत्तर शोधण्यात येत आहे. ‘आर अ‍ॅण्ड डीई’ने अत्यंत हलक्या वजनाचे काही पदार्थ विकसित केले आहेत. रणगाडय़ाचाही भार पेलू शकतील, असे पूल त्याद्वारे तयार करण्यात आले आहेत. याच पदार्थाचा वापर करून आता नौकांची बांधणी करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. पाणबुडय़ांच्या निर्मितीमध्येही अशाच प्रकारच्या पदार्थाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळेच पाणबुडय़ा अधिक वेगवान व आक्रमक ठरू शकतील,’ अशी माहिती या वेळी देण्यात आली.

मूर्तीजापूर तालुक्यातील ६९ हजार जनावरांवर उपासमारीचे सावट
मूर्तीजापूर, २५ मार्च / वार्ताहर

निसर्गाच्या लहरीपणामुळे मूर्तीजापूर तालुक्यात नापिकी सोबतच ६९ हजार ४३ जनावरांवर उपासमारीचे सावट दिसून येऊ लागल्याने शेतकरी-पशुपालक वर्गासमोर गुरांच्या चाऱ्याची समस्या उभी राहिली आहे. तेव्हा जास्त चारा डेपो आणि गुरांच्या छावण्या उभारण्याची शेतकरी संघर्ष कृती समितीद्वारे मागणी केल्या जात आहे. विद्यमान स्थितीतील चारा टंचाई आणि भविष्यातील तरतुदीच्या चिंतेने पशुपालकांवर गुरे विकण्याची पाळी आली असल्याचे बाजारा-बाजारामधून विक्रीस आलेल्या गुरांच्यावाढत्या संख्येवरून दिसून येत आहे. प्रामुख्याने कत्तलखाने वालेच खरेदीदारांमध्ये दिसून येत आहे. यावर्षी तालुक्यात खरीप आणि रब्बी पिकांनाही अल्प पावसामुळे फटका बसल्याने चाऱ्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमीच झाले. त्यामुळे चाऱ्याचे भावही वाढले आहेत. तालुक्यात ४१ हजार १७४ बैल व गायी, ५ हजार ५१४ म्हशी, २२ हजार ३५५ शेळ्या अशी ६९ हजार ४३ पशुधनाची संख्या आहे. मात्रयंदाच्या हंगामात केवळ ९४ हजार ८० मेट्रिक टनच चारा उत्पादन झाले. तो जनावरांच्या उपरोक्त संख्येच्या तुलनेत अत्यल्प ठरत आहे. यंदा पाऊस न झाल्यास उपलब्ध चारा या पशुधनांना कुठल्याही स्थितीत पुरणार नाही.

ऋतुरंग परिवारतर्फे ‘पहाट पाडवा’
नाशिकरोड, २५ मार्च / वार्ताहर

येथील ॠतुरंग परिवारातर्फे २७ मार्च रोजी ‘पहाट पाडवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यंदाच्या मैफलीचे आकर्षण शास्त्रीय संगीताचा स्वरसाज ल्यालेल्या कलापिनी कोमकली या असणार आहेत. नाशिक- पुणे रस्त्यावरील दत्तमंदिर चौकात ॠतुरंग भवनात पहाटे पाच वाजता कोमकली यांची शास्त्रीय गीतांची मैफल होणार आहे.लहानपणापासूनच कोमकली यांच्यावर लोरीपासून पंडित कुमार गंधर्व यांच्या ‘होरी’ चे संस्कार झाले आहेत. पंडित कुमारजींच्या स्वरोच्चारातील नजाकत कलापनी यांना साकारताना पाहून समोरचा दर्दी त्याच तन्मयतेने गहिवरतो. निर्गुणी भजनांचे समृध्द स्वर थेट रसिकांच्या ऱ्हदयाला भिडतात. नुकताच त्यांना स्वित्र्झलड आणि मॉस्कोमधील प्रतिष्ठीत सोहळ्यात गायनाचा सन्मान मिळाला आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच त्यांची ‘सगुण निर्गुण’ ही भजनांची सिडी नुकतीच प्रकाशित झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या कोमकली यांच्या मैफलीस उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा मे-जूनमध्ये
नाशिक, २५ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीमुळे येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.लिब., एम.बी.ए., बी.बी.ए, वृत्तपत्रविद्या व जनसंपर्क पदवी, पदविका, सहकार व्यवस्थापन पदवी, पदविका या अभ्यासक्रमाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा २३ एप्रिल ऐवजी मे-जूनमध्ये महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होणार आहेत.प्रात्यक्षिक परीक्षा पाच ते १४ मे या कालावधीत तर लेखी परीक्षा २० ते ३१ मे या कालावधीत होणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विज्ञान विषयक शिक्षणक्रम व संगणक विज्ञानविषयक पदवी, पदविका व प्रमाणपत्र शिक्षणक्रमांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा मे-जून मध्ये होणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर किंवा अभ्यास केंद्र, परीक्षा केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विद्यापीठातर्फे मुंबईत विशेष पदवीप्रदान समारंभ
नाशिक, २५ मार्च / प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २८ मार्च रोजी कुलपती तथा राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या हस्ते ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. जी. एस. सैनानी यांना डी.लिट् तर भारतीय दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल कोहली यांना डी.एसस्सी ने गौरविण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांनी दिली.विद्यापीठातर्फे स्थापनेपासून दुसऱ्यांदा हा विशेष दीक्षान्त समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मुंबई येथील सह्य़ाद्री अतिथी गृह येथे सकाळी साडेअकरा वाजता हा सोहळा होणार असून यावेळी मॅरेथन शिक्षक पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार डॉ. जी. बी. परूळकर, डॉ. ए. एम. वरे, डॉ. व्ही. एम. देसाई, डॉ. एम. एस. रावत आणि डॉ. पी. व्ही. साठे यांना देण्यात येणार असल्याचे फडके यांनी सांगितले. विद्यापीठातर्फे आयोजित या विशेष पदवी प्रदान कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुनील फुगारे यांनी केले आहे.

डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयास
पुलगाव, २५ मार्च / वार्ताहर

येथील ग्रामीण रुग्णालयाने २००७-२००८ या वर्षांत आरोग्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी डॉ. आनंदीबाई जोशी गौरव हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वर्धा जिल्ह्य़ात सलग दुसऱ्यांदा प्राप्त केला.
या पुरस्काराचे वितरण जागतिक महिला दिनी वर्धा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुंजन किन्नू यांच्या अध्यक्षतेखाली लोक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पा तायडे, अधिकारी डॉ. अरुण आमले, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक गंभीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.डी नारळवार यांनी तो स्वीकारला.

धामणगाव येथे घराच्या खोदकामात गुप्तधन सापडले
मजुरास अटक
बुलढाणा, २५ मार्च / प्रतिनिधी

बुलढाणानजिक धाड-धामणगाव येथे घराचे खोदकाम करताना मजुरास गुप्तधन सापडले. त्याने दोन दिवसांपूर्वी या गुप्तधनातील चांदी विकली व दारू पिऊन गावात धिंगाणा केल्याने हा प्रकार उघड झाला. घर मालकाने तातडीने धाड पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी या मजुरास अटक करून चौकशी सुरू केली आहे. धामणगाव व येथील गोपाल मोतीराम पायधन यांच्या घराचे खोदकाम करीत असताना या कामावरील मजूर किसन रामभाऊ तायडे यास दोन दिवसांपूर्वी ४५९ ग्रॅम चांदी व १ ग्रॅम सोने सापडले. या गुप्तधनातील ३३ ग्रॅम चांदीचे कडे घेऊन किसन सोनाराकडे गेला. त्यापैकी १ ग्रॅम चांदी विकली. मिळालेल्या पैशातून तो दारू पिऊन गावात परतला. गावात आल्यानंतर गावकऱ्यांना शिव्याशाप देण्याच्या प्रयत्नात त्याने गुप्तधन सापडल्याचे सांगितले. हा प्रकार घरमालक गोपाल पायधन यांना समजला त्यांनी धाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी दुय्यम ठाणेदार पाचरणे, मंडळ अधिकारी एस.बी. चव्हाण, तलाठी राजपूत यांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला व आरोपीची कसून चौकशी सुरू केली आहे.