Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
क्रीडा

कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधारपदासाठी गांगुलीसह तीन जण स्पर्धेत
कोलकाता, २५ मार्च / पीटीआय
दक्षिण आफ्रिकेत १८ एप्रिलपासून होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात कोलकाता नाइट रायडर्स संघाने सौरव गांगुलीला कायमस्वरुपी कर्णधारपद देण्यात येणार नसल्याचे आज स्पष्ट केले आहे. या निर्णयाने गांगुलीला मोठा धक्का बसला असून कायमस्वरूपी कर्णधारपदावरून त्याला पायउतार व्हावे लागणार आहे. बुकॅनन गांगुली याच्या फिटनेसवर चांगलेच नाराज होते. त्यामुळे त्यांनी गांगुली बरोबरच वेस्य इंडिजचा ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्कुलम, ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉज यांना विभागून देण्याचे ठरविले आहे.

डॅनियल व्हेटोरीवर जबाबदारीचे ओझे
नेपियर, २५ मार्च / पीटीआय

कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून जबाबदारी पार पाडताना न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हेटोरीची चांगलीच दमछाक होत आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत पराभूत होण्यापासून संघाला वाचविण्याचे मोठे आव्हान व्हेटोरीवर आहे. व्हेटोरी म्हणतो की, शारीरिकदृष्टय़ा मी फिट आहे. मानसिकदृष्टय़ा मात्र फिट राहणे कधीही सोपे नसते. एकाचवेळी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू म्हणून जबाबदारी पार पाडणे हे मोठे आव्हान असते.

आयपीएल इंग्लंडबाहेर गेल्याने ब्रिटीश मीडिया नाराज
लंडन, २५ मार्च/ पीटीआय

ट्वेंन्टी-२० च्या ‘फास्टफूड’ खेळाची लज्जत लुटण्याबरोबरच पैशांची खाण असलेली इंडियन प्रीमिअर लीग इंग्लंबाहेर गेल्याने ब्रिटीश मीडिया नाराज झाली असून त्यांनी याबद्दल हळहळसुद्धा व्यक्त केली आहे. इंग्लंडमधील ‘ दी टाईम्स’ या वृत्तपत्राने ’ दक्षिण आफ्रिकेतील पोषक वातावरणात आयपीएल गेली’ अशी ‘हेडलाईन’ दिली आहे. तर बातमीच्या शेवटी आयपीएल ही पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होत नसली तरी ती द. आफ्रिकेत कशी काय होऊ शकते. हे सारे अनाकलनीय आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट चाहत्यांना सुवर्णसंधी - स्मिथ
जोहान्सबर्ग, २५ मार्च/पीटीआय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेद्वारे येथील चाहत्यांना विविध देशांमधील खेळाडूंचे अव्वल दर्जाचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने आज येथे सांगितले.गतवर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या राजस्तान रॉयल्स संघाकडून स्मिथ खेळला होता. आयपीएल स्पर्धेत मी गतवर्षी सहभागी झालो होतो,एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या संघामधील खेळाडू या स्पर्धेत एकत्र खेळतात त्यावेळी त्यांच्यात समन्वय असतो.

आयपीएलला उशीर झाल्याने पीटरसन-फ्लिन्टॉफला फटका
लंडन, २५ मार्च/पी.टी.आय.

इंडियन प्रीमियर लिगमधील सर्वात महागडे खेळाडू म्हणून बोलबाला झालेल्या इंग्लंडच्या केव्हिन पीटरसन आणि फ्लिन्टॉफ यांना आयपीएल स्पर्धा आठ दिवस उशिरा सुरू होणार असल्याने मोठा फटका बसणार आहे. स्पर्धा आठवडाभर उशिरा सुरू होणार असल्याने हे दोघेही या स्पर्धेत केवळ १४ दिवसच खेळू शकणार आहेत आणि त्यामुळेच त्यांना दीड लाख पौंडाचा (२१९५११ अमेरिकन डॉलर्स) फटका बसणार आहे.

आय.डी.बी.आय., देना बँक विजयी
मुंबई, २५ मार्च/क्री.प्र.

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित केलेल्या ५४ व्या सर बेनेगल रामराव आंतर बँक क्रिकेट स्पर्धेच्या सीनियर गटात आय.डी.बी.आय., देना बँक आणि महाराष्ट्र बँकेने विजयी सलामी दिली. साखळी सामन्यातील पहिल्याच लढतीत आय.डी.बी.आय.ने यजमान रिझव्‍‌र्ह बँक संघावर ५१ धावांनी विजय मिळवला तर देना बँकेने युनियन बँकेवर ६४ धावांनी मात केली. अन्य एका लढतीत बँक ऑफ महाराष्ट्रने बँक ऑफ इंडियावर सनसनाटी विजय मिळवला.

आशियाई पॉवरलिफ्टिंगसाठी संदीप आवारीला हवी मदत
मुंबई, २५ मार्च/ खास प्रतिनिधी

जमशेदपूर येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल फेडरेशन कप पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदकासह ‘स्ट्राँगमन ऑफ इंडिया’ हा किताब मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या संदीप आवारी याची उदयपूर येथे मे २००९ मध्ये होणाऱ्या ‘आशियाई पॉवरलिफ्टींग’ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ठाणे येथे सामान्य परिस्थितीत वाढलेल्या संदीपने सलग तीनवेळा राष्ट्रीय विजेतपद पटकावले असून राज्य व राष्ट्रीय पातळीवर आज त्याचा दबदबा निर्माण झाला आहे.

आयपीएलचा अंतिम सामना दरबान येथे खेळवावा - पोलॉक
जोहान्सबर्ग, २५ मार्च/ पीटीआय

सुरक्षिततेच्या कारणामुळे आपले बस्तान भारतातून दक्षिण आफ्रिकेत हलविल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचा उपांत्य व अंतिम सामना डर्बन येथे व्हावा, अशी इच्छा आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक याने व्यक्त केली आहे. दरबानचे हवामान खेळण्यास अनुकूल असल्याने येथे अंतिम सामन्याच्या आयोजनाचा विचार करण्यात यावा, असे त्याने म्हटले आहे. आयपीएल स्पर्धेच्या काळात संपूर्ण देशभर जोरदार थंडी असताना केवळ डर्बनचे हवामान ऊबदार असण्याची शक्यता आहे. स्थानिक चाहते या स्पर्धेला कितीसा प्रतिसाद देतील याविषयी पोलॉकने शंका उपस्थित केली . आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्वच खेळाडूंशी आफ्रिकेतील चाहते फारसे परिचित नाहीत. त्यामुळे विविध संघांच्या फ्रँन्चायझी घेतलेल्यांनी खेळाडूंचा दर्शकांना परिचय होईल, असे कार्यक्रम घ्यावेत असे पोलॉकने सुचविले आहे. खेळाडूंशी परिचित व्हायला थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. पाच आठवडे चालणाऱ्या या महासंग्रामात ५९ सामने होणार आहेत. त्यामुळे खेळाडूंचा खरा कस या स्पर्धेत लागेल. सहा ठिकाणी हे सामने होणार आहेत. मात्र ही सहा ठिकाणे अद्याप घोषित करण्यात आलेली नाहीत.

इंडियन ओपन बॅडमिंटन : सायनासह भारतीय बॅडमिंटनपटूंची आगेकूच
हैदराबाद, २५ मार्च/पीटीआय
भारताच्या बी. चेतन आनंदने विजयी सलामी दिल्यानंतर सायना नेहवालसह अन्य तीन बॅडमिंटनपटूही इंडियन ओपन बॅडिमटन स्पर्धेत आज विजयी झाले आहेत.
दुसऱ्या मानांकित सायनाने चीनच्या च्यू येन डाफनेचा २१-६, २१-१० असा २१ मिनिटांमध्ये सहज फडशा पाडत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तिच्याबरोबरच अनुप श्रीधर, आनंद पवार, आणि अरविंद भट्ट यांनीही विजय मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.अनुप श्रीधरने पहिल्या फेरीत सचिन राणाला २१-३, २१-७ अशी धूळ चारली तर दुसऱ्या फेरीत अंशुमन हझारीकावर २१-८, २१-८ असा सहज विजय संपादन केला. आनंद पवारने पहिल्या फेरीत वेंकटेश प्रसादला २१-६, २१-१३ असे नमविले तर दुसऱ्या फेरीत चीनच्या केई वॉनवर २४-२२, २१-१९ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. भारताच्या बी.चेतन आनंदने मलेशियाच्या चोंग चिह लोएक याच्यावर १४-२१, २१-९, २२-२० असा रोमहर्षक विजय मिळविला. आनंद भट्टने दोन्हीही फे ऱ्यांमध्ये विजय मिळवित तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

बुद्धिबळ : टोपालोव्हविरुध्द आनंदची दोन्ही डावात बरोबरी
नाईस(फ्रान्स), २५ मार्च/पीटीआय

भारताचा ग्रॅन्डमास्टर विश्वनाथन आनंद याला अंबर चषक ब्लाईन्ड फोल्ड व रॅपीड बुध्दिबळ स्पर्धेत आज व्हॅसेलीन तोपालोव्हविरुध्दच्या दोन्ही डावात बरोबरी स्वीकारावी लागली, मात्र त्याने अन्य दोन खेळाडूंसमवेत आघाडीस्थान कायम राखले. या स्पर्धेत आनंद, नॉर्वेचा मॅग्नुस कार्लसन व अर्मेनियाचा लिवॉन आरोनियन यांनी प्रत्येकी ११.५ गुण घेतले आहे. कार्लसन याने युक्रेनच्या सर्जी कर्जाकिन याच्यावर १.५-०.५ अशी मात केली.आरोनियन याने रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर मोरोजेवीच याला १.५-०.५ अशाच फरकाने हरविले. आनंद व तोपोलोव्ह यांनी आज प्रत्येकी एक गुणाची कमाई केली. रशियाचा व्लादिमीर क्रामनिक याने दहा गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. त्याने आज युक्रेनच्या व्हॅसिली इव्हानचुक याच्यावर विजय संपादन केला. पीटर लेको याने तिसरे स्थान घेतले आहे. त्याचे साडेनऊ गुण झाले आहेत. गाटा कामस्की व तोपालोव्ह यांचे प्रत्येकी साडेआठ गुण झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा आंद्रे नेल निवृत्त
दरबान: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आंद्रे नेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आज निवृत्तीची घोषणा केली. आपल्या आठ वर्षांच्या छोटय़ा कारकीर्दीत नेलने दोन्ही क्रिकेट प्रकारात १००पेक्षा अधिक बळी मिळविले. नेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००१मध्ये पदार्पण केले होते तर त्याच वर्षी कसोटी क्रिकेटमध्येही तो प्रथमच खेळला. नेलने सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना मला भरून येते आहे. गेली आठ वर्षे आपल्या देशासाठी खेळताना माझे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले. मला प्रोत्साहन व पाठिंबा दिल्याबद्दल मी कर्णधार स्मिथ, प्रशिक्षक मिकी आर्थर, विनी बार्नेस व सहकाऱ्यांचा खूप आभारी आहे.

सोनी, डब्ल्यूएसजीला आयपीएलचे ८२०० कोटींचे हक्क
मुंबई, २५ मार्च / क्री. प्र.

पूर्वीची सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजन आणि आताची मल्टी स्क्रीन मीडिया आणि वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप यांनी डीएलएफ इंडियन प्रीमियर लीगच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळविले आहेत. आगामी नऊ वर्षांसाठी म्हणजेच २०१७पर्यंत ८२०० कोटींचा हा करार आहे. गेल्या वर्षी याच दोन कंपन्यांनी दहा वर्षांसाठी जो करार केला होता, त्यापेक्षा हा नवा करार दुप्पट आहे. यात मल्टी स्क्रीन मीडियाला आयपीएलच्या ५९ सामन्यांचे ऑडिओ व्हिज्युअलचे भारतातील हक्कही मिळाले आहेत.